Sunday, 26 July 2015

बाबासाहेब पुरंदरे आणि गोविंद पानसरे

सूर्यकांत पळसकर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे न सापडणारे मारेकरी या दोन गोष्टी सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करून काही संघटना महाराष्ट्रात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच पानसऱ्यांचे मारेकरी सरकारला सापडले आहेत, मात्र त्यांना अटक करण्याची हिंमत सरकार दाखवित नाही, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुरंदरे यांचा महाराष्ट्रा भूषण पुरस्कार आणि कॉ. पानसरे यांची हत्या या घटनांचा थेट संबंध नसला तरी त्यांत एक आंतरिक दुवा आहे. पुरंदरे आणि पानसरे हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्ससीम भक्त असून, दोघेही लेखक आहेत. पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती' हे पुस्तक लोकप्रिय आहे, तर पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. खपाच्या बाबतीत दोन्ही पुस्तके तोडीस तोड आहेत. एकाच विषयावर, एकाच राज्यात, एकाच भाषेत आणि एकाच कालखंडात पुस्तके लिहिणारे हे दोन लेखक. एकाची गोळ्या घालून हत्या होते, तर दुस-याला राज्यातील सर्वांत मोठा पुरस्कार मिळतो! असे का व्हावे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी मराठीचा थोडा साहित्यिक इतिहास धुंडाळून पाहू या. 

इतिहास आणि अद्भूत कथा यांविषयीचे महाराष्ट्राला असलेले वेड अचंबित करणारे आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या उदयकाळीच अद्भूतरम्य आणि ऐतिहासिक कादंब-या निर्माण झाल्या. पुढे त्यांचे स्वतंत्र प्रवाह बनले. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अद्भूतरम्य कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबरी यांची सीमा रेषा अत्यंत धुसर आहे. भालचंद्र नेमाडे यांनी ऐतिहासिक कादंब-यांना याच एका मुद्यावर कडाडून विरोध केला आहे. नेमाड्यांच्या मते, ‘ऐतिहासिक कादंब-या या ऐतिहासिक नसतातच. त्या अद्भुतरम्यच असतात. या कादंब-यांत इतिहासातील पात्रे नुसतीच नावापुरती असतात. या पात्रांभोवतीचे प्रसंग आणि घटना काल्पनिकच असतात.'  नेमाडे यांनी कादंब-यांविषयीच्या आपल्या प्रबंधात या विषयी सविस्तर लिहिले आहे. नेमाडे यांनी हा प्रबंध लिहिल्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. काळ इतका बदलला आहे की, ऐतिहासिक कादंब-यांनाच इतिहास समजले जाऊ लागले आहे. खरे म्हणजे, रणजीत देसाई यांनी शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेल्या ‘श्रीमान योगी' या कादंबरीने अशा प्रकारच्या अद्भूतरम्य इतिहासाची सुरुवात आधीच करून दिली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे नेमाड्यांची ‘कोसला' आणि देसायांची ‘श्रीमान योगी' या दोन्ही कादंब-या एकाच कालखंडात प्रसिद्ध झाल्या. अद्भुताचे लेणे लेवून आलेल्या ‘श्रीमान योगी'चा एकूणच थाट राजेशाही होता. तिच्या महागड्या आवृत्त्या निघाल्या. प्रसारमाध्यमांत ती झळकत राहिली. कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूत मिश्रण ‘श्रीमान योगी'ने मराठीत निर्माण केले. या उलट कोसलाची स्थिती होती. वास्तवाचा पदर धरून आलेल्या ‘कोसला'च्या नशिबी थाटमाट आला नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी तिला दुर्लक्षून टाकले. ही कादंबरी गरिबाघरचे पोर बनून आली. मात्र हे पोर धडधाकट होते. ते जगले आणि वाढले. ‘श्रीमान योगी'च्या बरोबरीने ‘कोसला'च्याही आवृत्त्या निघत राहिल्या. मराठीच्या सुजान वाचकांची ही कृपा. 

कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूतरम्य मिश्रण आणखी नशिले करण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती' या कादंबरीने केले. या मिश्रणात त्यांनी धार्मिकता ओतली. त्यामुळे पुरंदरे यांचे पुस्तक नुसतेच लोकप्रियता, राजमान्यता याचे प्रतिक न राहता अस्मितेचेही प्रतिक बनले. या पुस्तकातील मजकूर इतिहासापेक्षा अद्भूताला अधिक अनुसरतो, या वास्तवाकडे त्यामुळे डोळेझाक झाली. पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सध्या जो वाद सुरू आहे, त्याच्या मुळाशी असलेले हे वास्तव समजून घेतले पाहिजे. मानवी मनाला अद्भूताचे प्रचंड आकर्षण आहे. ‘लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा लोकांना फशी पाडतात. वास्तवात असे काही नसते, हे मग त्यांना पटतच नाही. तानाजीने स्वतःचा प्राण देऊन कोंढाणा किल्ला घेतला हे वास्तव असले तरी त्यात अद्भूत असे काही नाही. लढाईसारखी ती लढाई. पण, या लढाईला ‘यशवंती घोरपडी'ची जोड दिली की, ती अद्भूतरम्य बनते. मनाची पकड घेते. घोरपडीच्या कमरेला दोर बांधून डोंगराचा कडा चढता येणे वास्तवात शक्य नाही, हा विचारही कोणाच्या डोक्यात शिरत नाही. वर नमूद केलेल्या नशिल्या मिश्रणाचा हा परिणाम आहे. वाचकांच्या मनावर ताबा मिळविला की, लेखकाला अंतस्थ हेतूने मनाच्या चार गोष्टी ठोकून देता येतात. पुरंदरे यांनी नेमके हेच केले. त्यांनी उभा केलेला शिवाजी मुस्लिम विरोधी राजकारणाला पुरक होता. राज्यात हिंदुत्ववादी सरकार येताच पुरंदरे यांना महाराष्ट्रा भूषण पुरस्कार जाहीर झाला. शिवचरित्राला दिलेल्या ट्विस्टची पुरंदरे यांना मिळालेली ही बक्षिसी आहे. 

पुरद-यांनी शिवरायांचे जे चित्र उभे केले त्याच्या अगदी विरोधी चित्र पानरस-यांनी उभे केले. पुरंदरे यांचा शिवाजी गो-ब्राह्मण प्रतिपाळक आहे, तर पानसरे यांचा शिवाजी रयतेचा प्रतिपाळक आहे! पानस-यांनी ‘शिवाजी' या नावाभोवती तयार झालेले अद्भूताचे वलय बाजूला सारून वास्तवातला शिवाजी आपल्या पुस्तकात उभा केला. शिवरायांच्या फौजेतच नव्हे, तर अंगरक्षकांच्या ताफ्यातही मुसलमान होते, महाराज आग्य्राहून निसटले तेव्हा त्यांच्या जागी झोपून आपला जीव जोखमीत घालणारा मदारी मेहतर हाही मुसलमानच होता, हे वास्तव पानस-यांनी मांडले. ‘मुस्लिम विरोध' या एकाच तत्त्वावर ज्यांचे समग्र राजकारण उभे आहे, त्यांना असा शिवाजी अगदीच गैरसोयीचा आहे. हे पुस्तक वाचकांत लोकप्रिय असले तरी, माध्यमांत कधी गाजले वाजले नाही. छुप्या पद्धतीने हिंदुत्वाची जातीय भक्ती करणा-या माध्यांनी या पुस्तकालाही ‘कोसला'प्रमाणे दुर्लक्षून टाकले. 

पानस-यांच्या मारेक-यांच्या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी केलेले आरोप अशा व्यापक पाश्र्वभूमीवर तपासून पाहायला हवेत , इतकेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.

जाता जाता...
बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन' ही मराठीतील पहिली कादंबरी आहे, तसेच ती मराठीतील पहिली ‘वास्तववादी' कादंबरीही आहे. बाबा पदमनजी हे ख्रिस्ती धर्म प्रसारक होते. हिंदू धर्मातील त्या काळच्या विधवांचा प्रश्न त्यांनी या कादंबरीत मांडला आहे. पदमनजी यांनी ज्या काळी ही कादंबरी लिहिली, त्याकाळी हिंदू धर्माभिमाणी लेखक ‘मोचनगढ' आणि ‘मंजुघोषा' यांसारख्या अद्भूरम्य, काल्पनिक आणि मनोरंजक कादंब-या लिहित होते. वास्तवाकडे पाठ फिरविणे हा आपला स्वभाव धर्म आहे का?
(प्रसिद्धी : लोकमत औरंगाबाद आवृत्ती २६/०७/२०१५)

No comments:

Post a Comment