Sunday, 26 July 2015

बाबासाहेब पुरंदरे आणि गोविंद पानसरे

सूर्यकांत पळसकर

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे न सापडणारे मारेकरी या दोन गोष्टी सध्या महाराष्ट्रात गाजत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करून काही संघटना महाराष्ट्रात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच पानसऱ्यांचे मारेकरी सरकारला सापडले आहेत, मात्र त्यांना अटक करण्याची हिंमत सरकार दाखवित नाही, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुरंदरे यांचा महाराष्ट्रा भूषण पुरस्कार आणि कॉ. पानसरे यांची हत्या या घटनांचा थेट संबंध नसला तरी त्यांत एक आंतरिक दुवा आहे. पुरंदरे आणि पानसरे हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्ससीम भक्त असून, दोघेही लेखक आहेत. पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती' हे पुस्तक लोकप्रिय आहे, तर पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. खपाच्या बाबतीत दोन्ही पुस्तके तोडीस तोड आहेत. एकाच विषयावर, एकाच राज्यात, एकाच भाषेत आणि एकाच कालखंडात पुस्तके लिहिणारे हे दोन लेखक. एकाची गोळ्या घालून हत्या होते, तर दुस-याला राज्यातील सर्वांत मोठा पुरस्कार मिळतो! असे का व्हावे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी मराठीचा थोडा साहित्यिक इतिहास धुंडाळून पाहू या. 

इतिहास आणि अद्भूत कथा यांविषयीचे महाराष्ट्राला असलेले वेड अचंबित करणारे आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या उदयकाळीच अद्भूतरम्य आणि ऐतिहासिक कादंब-या निर्माण झाल्या. पुढे त्यांचे स्वतंत्र प्रवाह बनले. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अद्भूतरम्य कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबरी यांची सीमा रेषा अत्यंत धुसर आहे. भालचंद्र नेमाडे यांनी ऐतिहासिक कादंब-यांना याच एका मुद्यावर कडाडून विरोध केला आहे. नेमाड्यांच्या मते, ‘ऐतिहासिक कादंब-या या ऐतिहासिक नसतातच. त्या अद्भुतरम्यच असतात. या कादंब-यांत इतिहासातील पात्रे नुसतीच नावापुरती असतात. या पात्रांभोवतीचे प्रसंग आणि घटना काल्पनिकच असतात.'  नेमाडे यांनी कादंब-यांविषयीच्या आपल्या प्रबंधात या विषयी सविस्तर लिहिले आहे. नेमाडे यांनी हा प्रबंध लिहिल्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. काळ इतका बदलला आहे की, ऐतिहासिक कादंब-यांनाच इतिहास समजले जाऊ लागले आहे. खरे म्हणजे, रणजीत देसाई यांनी शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेल्या ‘श्रीमान योगी' या कादंबरीने अशा प्रकारच्या अद्भूतरम्य इतिहासाची सुरुवात आधीच करून दिली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे नेमाड्यांची ‘कोसला' आणि देसायांची ‘श्रीमान योगी' या दोन्ही कादंब-या एकाच कालखंडात प्रसिद्ध झाल्या. अद्भुताचे लेणे लेवून आलेल्या ‘श्रीमान योगी'चा एकूणच थाट राजेशाही होता. तिच्या महागड्या आवृत्त्या निघाल्या. प्रसारमाध्यमांत ती झळकत राहिली. कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूत मिश्रण ‘श्रीमान योगी'ने मराठीत निर्माण केले. या उलट कोसलाची स्थिती होती. वास्तवाचा पदर धरून आलेल्या ‘कोसला'च्या नशिबी थाटमाट आला नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी तिला दुर्लक्षून टाकले. ही कादंबरी गरिबाघरचे पोर बनून आली. मात्र हे पोर धडधाकट होते. ते जगले आणि वाढले. ‘श्रीमान योगी'च्या बरोबरीने ‘कोसला'च्याही आवृत्त्या निघत राहिल्या. मराठीच्या सुजान वाचकांची ही कृपा. 

कादंबरी आणि इतिहास यांचे अद्भूतरम्य मिश्रण आणखी नशिले करण्याचे काम बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती' या कादंबरीने केले. या मिश्रणात त्यांनी धार्मिकता ओतली. त्यामुळे पुरंदरे यांचे पुस्तक नुसतेच लोकप्रियता, राजमान्यता याचे प्रतिक न राहता अस्मितेचेही प्रतिक बनले. या पुस्तकातील मजकूर इतिहासापेक्षा अद्भूताला अधिक अनुसरतो, या वास्तवाकडे त्यामुळे डोळेझाक झाली. पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सध्या जो वाद सुरू आहे, त्याच्या मुळाशी असलेले हे वास्तव समजून घेतले पाहिजे. मानवी मनाला अद्भूताचे प्रचंड आकर्षण आहे. ‘लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा लोकांना फशी पाडतात. वास्तवात असे काही नसते, हे मग त्यांना पटतच नाही. तानाजीने स्वतःचा प्राण देऊन कोंढाणा किल्ला घेतला हे वास्तव असले तरी त्यात अद्भूत असे काही नाही. लढाईसारखी ती लढाई. पण, या लढाईला ‘यशवंती घोरपडी'ची जोड दिली की, ती अद्भूतरम्य बनते. मनाची पकड घेते. घोरपडीच्या कमरेला दोर बांधून डोंगराचा कडा चढता येणे वास्तवात शक्य नाही, हा विचारही कोणाच्या डोक्यात शिरत नाही. वर नमूद केलेल्या नशिल्या मिश्रणाचा हा परिणाम आहे. वाचकांच्या मनावर ताबा मिळविला की, लेखकाला अंतस्थ हेतूने मनाच्या चार गोष्टी ठोकून देता येतात. पुरंदरे यांनी नेमके हेच केले. त्यांनी उभा केलेला शिवाजी मुस्लिम विरोधी राजकारणाला पुरक होता. राज्यात हिंदुत्ववादी सरकार येताच पुरंदरे यांना महाराष्ट्रा भूषण पुरस्कार जाहीर झाला. शिवचरित्राला दिलेल्या ट्विस्टची पुरंदरे यांना मिळालेली ही बक्षिसी आहे. 

पुरद-यांनी शिवरायांचे जे चित्र उभे केले त्याच्या अगदी विरोधी चित्र पानरस-यांनी उभे केले. पुरंदरे यांचा शिवाजी गो-ब्राह्मण प्रतिपाळक आहे, तर पानसरे यांचा शिवाजी रयतेचा प्रतिपाळक आहे! पानस-यांनी ‘शिवाजी' या नावाभोवती तयार झालेले अद्भूताचे वलय बाजूला सारून वास्तवातला शिवाजी आपल्या पुस्तकात उभा केला. शिवरायांच्या फौजेतच नव्हे, तर अंगरक्षकांच्या ताफ्यातही मुसलमान होते, महाराज आग्य्राहून निसटले तेव्हा त्यांच्या जागी झोपून आपला जीव जोखमीत घालणारा मदारी मेहतर हाही मुसलमानच होता, हे वास्तव पानस-यांनी मांडले. ‘मुस्लिम विरोध' या एकाच तत्त्वावर ज्यांचे समग्र राजकारण उभे आहे, त्यांना असा शिवाजी अगदीच गैरसोयीचा आहे. हे पुस्तक वाचकांत लोकप्रिय असले तरी, माध्यमांत कधी गाजले वाजले नाही. छुप्या पद्धतीने हिंदुत्वाची जातीय भक्ती करणा-या माध्यांनी या पुस्तकालाही ‘कोसला'प्रमाणे दुर्लक्षून टाकले. 

पानस-यांच्या मारेक-यांच्या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी केलेले आरोप अशा व्यापक पाश्र्वभूमीवर तपासून पाहायला हवेत , इतकेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.

जाता जाता...
बाबा पदमनजी यांची ‘यमुना पर्यटन' ही मराठीतील पहिली कादंबरी आहे, तसेच ती मराठीतील पहिली ‘वास्तववादी' कादंबरीही आहे. बाबा पदमनजी हे ख्रिस्ती धर्म प्रसारक होते. हिंदू धर्मातील त्या काळच्या विधवांचा प्रश्न त्यांनी या कादंबरीत मांडला आहे. पदमनजी यांनी ज्या काळी ही कादंबरी लिहिली, त्याकाळी हिंदू धर्माभिमाणी लेखक ‘मोचनगढ' आणि ‘मंजुघोषा' यांसारख्या अद्भूरम्य, काल्पनिक आणि मनोरंजक कादंब-या लिहित होते. वास्तवाकडे पाठ फिरविणे हा आपला स्वभाव धर्म आहे का?
(प्रसिद्धी : लोकमत औरंगाबाद आवृत्ती २६/०७/२०१५)

Sunday, 19 July 2015

पंढरपूरचा विठोबा आणि साहित्यिक

सूर्यकांत पळसकर
साहित्य आणि वारकरी चळवळ यांचे अतूट नाते आहे. सर्व वारकरी संत हे कवी होते. मराठी साहित्याचा पाया या संतकवींनीच रचला आहे. आधुनिक काळातही कवी-लेखकांना पंढरपूरच्या विठोबाने भुरळ घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच्या अगदी उलट आपल्या लेखनाने काही लेखकांनी वारकèयांचा रोषही ओढवून घेतला आहे. 

साने गुरुजींचे उपोषण
‘श्यामची आई' या बाल कादंबरीचे लेखक साने गुरूजी यांची विठ्ठलावर गाढ श्रद्धा होती. विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी पंढरपुरातील तणपुरे महाराज मठात १ मे १९४७ रोजी उपोषण सुरू केले. १० मे रोजी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. साने गुरुजी यांच्या उपोषणाचे पडसाद तेव्हा दिल्लीपर्यंत उमटले होते. पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष बनलेल्या गणेश वासुदेव मावळंकर यांनी महात्मा गांधी यांच्याकडे या प्रकरणी रदबदली केली होती. महात्मा गांधी यांनी हस्तक्षेप करून सरकारला कामाला लावले आणि विठोबाची दारे दलितांसाठी खुली झाली. 

ओ विठू यू आर माय बॉफफ्रेंड!
प्रख्यात विदुषी इरावती कर्वे या आधुनिक विचारांच्या होत्या. देव-धर्मावर त्यांचा विश्वास नव्हता. एकदा त्या पंढरपूरला आल्या. आलोच आहोत, तर विठोबाचे दर्शन घेऊया, असे म्हणून त्या मंदिरात गेल्या. विठ्ठलाला पाहिल्यानंतर मात्र त्यांची अवस्था भावविभोर झाली. त्यांनी उत्स्फूर्त उद्गार काढले, ‘ओ विठू, यू आर माय बॉयफ्रेंड!' संत मीराबार्इंनी श्रीकृष्णाला आपला प्रियकर मानले होते. इरावतीबार्इंची भावनिक अवस्था याच पातळीवर गेल्याचे दिसून येते.

दांडेकरांच्या प्रवचनाला अत्र्यांची हजेरी
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक शं. वा. उपाख्य मामासाहेब दांडेकर हे पुण्यातील प्रख्यात एस.पी. कॉलेजात प्राचार्य होते. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. पण, त्याहीपेक्षा ते एक प्रवचनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील लोकप्रिय वक्ते, कवी, पत्रकार आणि महान लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांच्या प्रवचनाला येत असत. दांडेकरांचे ‘वारकरी पंथाचा इतिहास' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी वारकरी सांप्रदायाचा सुमारे हजारभर वर्षांचा इतिहास मांडला आहे. 

मूळ विठ्ठल मूर्ती माढ्यात!
प्रख्यात संशोधक रा.चिं. ढेरे यांचा ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात ढेरे यांनी विठ्ठल हे दैवत आणि पंढरपूर यांचा विस्तृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथात त्यांनी काढलेले काही निष्कर्ष मात्र वादग्रस्त ठरले आहेत. विठ्ठलाची मूळ मूर्ती सोलापूर जिल्ह्यातील माढे येथे असल्याचा दावा ग्रंथात करण्यात आला आहे. अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा त्याने अनेक देवळांचा विध्वंस केला होता. त्याच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी बडव्यांनी विठ्ठलाची मूर्ती माढ्याला हलविली. नंतर ती परत आणलीच नाही, असा दावा ढेèयांनी केला आहे. तसेच विठ्ठल हे दैवत मूळचे कुरुब धनगरांचे असून इतर जातींनी फार नंतर त्याचा स्वीकार केला, असाही एक दावा त्यांनी केला आहे. ढेरे यांचे हे निष्कर्ष संशोधकांत अद्याप तरी मान्य झालेले नाही. तरीही त्यांचा हा ग्रंथ मौलिक समजला जातो.

राजवाड्यांनी जाळले ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीची सर्वांत जुनी प्रत शोधून काढल्याचा दावा केला होता. पदरमोड करून त्यांनी ही प्रत प्रसिद्धही केली. आपली ही प्रत साक्षात ज्ञानेश्वरांच्या काळातील असून, उपलब्ध प्रतींपैकी सर्वांत शद्ध आहे, असा त्यांचा दावा होता. आपल्या या संशोधनाचे वारकरी सांप्रदायात जोरदार स्वागत होईल, असे राजवाड्यांना वाटले होते. तथापि, वारकऱ्यांनी राजवाड्यांची ही ज्ञानेश्वरी स्वीकारण्यास नकार दिला! या प्रकाराने राजवाडे अत्यंत निराश झाले. त्यांनी या प्रतीचे मूळ हस्तलिखितच जाळून टाकले. राजवाड्यांच्या दाव्यातील तथ्यांश तपासण्याचा मार्गच त्यामुळे खुंटला.

यादवांवर वारकरी कोपले!
प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम' आणि ‘लोकसखा ज्ञानेश्वर' या कादंबऱ्या वादग्रस्त ठरल्या. संशोधन करून आपण या संतांची जीवन चरित्रे लिहिल्याचा दावा यादवांनी केला होता. २००९ साली यादव यांची महाबळेश्वर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंर या कादंबऱ्यातील वादग्रस्त मजकुर समोर आला. चिडलेल्या वारकऱ्यांनी संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. यावर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे यादव या संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. अध्यक्षांविणा झालेले एकमेव साहित्य संमेलन अशी त्याची ख्याती झाली! या कादंबऱ्याना न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने या कादंबऱ्या नष्ट करण्याचा आदेश दिला. त्यानंतरच हा वाद संपुष्टात आला.
(प्रसिद्धी  : लोकमत/१८-७-२०१५/औरंगाबाद)  

Sunday, 12 July 2015

देव माणूस जाहला

बा. भो. शास्त्री यांनी अभंग पुन्हा जिवंत केला

सूर्यकांत पळसकर 
वारकरी आणि महानुभाव या दोन धार्मिक चळवळींनी मराठी साहित्याचा पाया रचला आहे. सांप्रत महाराष्ट्रात या चळवळींतील चैतन्य मूळ रसासह टिकून आहे. तथापि, त्यातून होणारी साहित्य निर्मिती आता थांबली आहे. निळोबा पिंपळनेरकर आणि बहिणाबाई शिवूरकर हे शेवटचे वारकरी संतकवी. योगायोगाने दोघेही तुकोबांचे शिष्य होते. तुकोबांच्या नंतरच्या काळात महानुभाव चळवळीत लेखन सुरू होते. आजही सुरू आहे. तथापि, चळवळीच्या बंदिस्त परंपरेमुळे ते महाराष्ट्रासमोर आलेच नाही. पंजाबमधील घुमान येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या महानुभावांच्या बंदिस्तपणाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याच वेळी मोरे यांनी महानुभाव परंपरेतील समकालीन साहित्यिक बा. भो. शास्त्री यांच्या नावाचा गौरवाने उल्लेख केला होता. आधुनिक कालखंडात खर्‍या अर्थाने मराठी साहित्यिक म्हणता येतील, अशी मोजून तीन-चार नावे मोरे यांनी शोधून काढली. त्यातील एक नाव बा. भो. शास्त्री यांचे होते. र. वा. दिघे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ ही उरलेली नावे. यावरून 'बाभों'चा अधिकार लक्षात यावा. बहुआयामी आणि विपुल लेखन करणार्‍या बाभोंनी वारकरी परंपरेतील अभंगांना महानुभाव चळवळीत आणण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. अभंग रचना करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. अभंग रचण्यासाठी नुसते कवी असून चालत नाही. पारमार्थिक अधिकारही हवा असतो. सर्वज्ञ चक्रधरांच्या परंपरेत अत्यंत आदराचे स्थान असलेल्या बाभोंना हा अधिकार नक्कीच आहे. 

औरंगाबादजवळील करमाड येथील महानुभाव आश्रमात वास्तव्य असलेल्या बाभोंनी अभंग रचनेसाठी 'भिका' हे सुटसुटीत नाव धारण केले आहे. त्यांच्या अभंगांचा 'भिका म्हणे' या नावाने एक छोटेखानी संग्रह प्रसिद्ध झाला आहे. अभंग लेखनासाठी बाभोंनी जाणीवपूर्वक बोलीभाषा स्वीकारली आहे. अभंगांची साधी शब्दरचना चटकन ओठावर रुळते. अभंग लिहिणारे सर्वच संतकवी समाजसुधारक होते. त्यामुळेच समाजाविषयीचा आत्यंतिक कळवळा हा बहुतांश संतकवींच्या अभंगांचा गाभा राहिला आहे. बाभोंच्या अभंगांतही हाच कळवळा दिसून येतो. त्यामुळे बाभो 'भिका म्हणे देव माणूस जाहला । माणसात आला भल्यासाठी ।।' असे चरण लिहून देवाला माणसांत उभे करतात. 

तुकोबा, निळोबा, बहिणाबाई यांची परंपरा बाभो चालवीत असले तरी, त्यांचे अभंग तुकोबा-बहिणाबाईंच्या काळातील नाहीत. हे अभंग खास बाभोंचे आणि बाभोंच्या काळातील आहेत. अभंग रचना बंद पडून आता जवळपास साडेतीनशे वर्षे होत आली आहेत. या काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील समाज पूर्णपणे बदलून गेला आहे. नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नवी ढोंगे उदयास आली आहेत. या सर्वांचा सडेतोड समाचार बाभो घेतात. बाभोंची लेखनी असे काही आसूड ओढते की, तुकोबांची आठवण व्हावी. स्त्रीभ्रूणहत्या आणि प्रदूषण यासारखे आधुनिक काळातील प्रश्न बाभो आपल्या अभंगांतून प्रखरतेने हाताळतात. मुलींची गर्भातच हत्या करणार्‍या आईला उद्देशून बाभो लिहितात :
भिका म्हणे आई कशी क्रूर झाली ।
गर्भातल्या मुली मारीतसे ।।
आधुनिक जगासमोर प्रदूषणाच्या रूपाने उभ्या राहिलेल्या दानवाचा जन्म मानवी हव्यासातून झाला आहे, हे बाभो शोधून काढतात. माणसाने हव्यास आवरल्यास प्रदूषण आपोआप थांबेल, अशी सुटसुटीत मांडणी ते करतात. बाभो लिहितात : 
किती प्रदूषण करिसी माणसा ।
आपुल्या हव्यासा आवरी तू ।।
गंगा, गोदावरी आणि यमुनेचे ।
गटार कधीचे बनविले ।।
दसर्‍याला रावणदहन करण्याची परंपरा भारतात आहे. या परंपरेच्या निमित्ताने बाभो माणसाच्या ढोंगीपणावर नेमकेपणाने प्रहार करतात. स्वत:तील दुगरुण कायम ठेवून रावण जाळण्यात कोणते शहाणपण? रावणही आपल्यापेक्षा चांगला म्हणायला हवा. त्याने सीतेचे हरण केले तरी तिला स्पर्श केला नाही. तिला शाबूद म्हणजेच पवित्र ठेवले. रावण देवापुढे आपले डोके कापून ठेवायचा. आपण तर देवालाही फसवितो. बाभोंनी अधोरेखित केलेले वास्तव विदारक आहे. या अभंगातील बोलक्या ओळी पाहा : 
दसर्‍याच्या दिशी जाळिती रावण ।
स्वत:त दुर्गुण असुनिया ।।
सीतेचे चरित्र ठेविले शाबूद ।
रावणाने वेद पाठ केले ।।
देवापुढे डोके कापूनि ठेवितो ।
आम्ही फसवितो देवालाही ।।
भिका म्हणे तुम्ही आधी राम व्हावे ।
खुशाल जाळावे रावणासी ।।
स्वतः रावणासारखे दुगुणी राहणाऱ्यास रावण दहन करण्याचा अधिकारच नाही. रावण जाळायचाच असेल, तर आधी स्वतः राम व्हायला हवे. बाभोंच्या अभंगातील हा विचार खरोखरच क्रांतिकारक आहे. 

वैयक्तिक पातळीवर धवल चारित्र्याचा आग्रह धरणारे बा. भो. शास्त्री घराची व्याख्या  करताना भावूक होतात. केवळ छत आणि भिंतींना घर म्हणता येत नाही. घरात वृद्धांचा योग्य सन्मान व्हायला हवा, असा संदेश ते देतात. ‘भिका म्हणे त्याचे घरचि मंदीर । भावनेचे सूर जुळताती ।।' हा चरण या अभंगांतील विचारांवर पावित्र्याचा कळस चढवितो. 

बा. भो. शास्त्री यांच्या तरल मनाची प्रचिती देणारे काही अभंगही या संग्रहात आहेत. एका अभंगात बाभो म्हणतात : 
आज काय झाले माझिया मनाला ।
राहतो एकला अनेकांत ।।
सख्या सांगात्यांचा बदलला सूर ।
कुणाच्या समोर दुःख सांगू ।
भिका म्हणे आता पुरा दैनावलो ।
भाजलो पोळलो देवराया ।।
या अभंगात बाभोंनी व्यक्त केलेली भावना आतड्याला पिळ पाडल्याशिवाय राहत नाही.  बाभो अगतिक होतात, पण हार पत्करीत नाहीत. लढत राहतात. ही लढाई स्वतःशी आणि समाजातील ढोंगाशी, अशी दुहेरी आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही तुकोबांनी व्यक्त केलेली लढाईची भावनाच बाभो पुढे नेताना दिसून येतात. या लढवय्यास आणि त्याच्या लढाईस सलाम. 
(प्रसिद्धी : लोकमत )