Wednesday 22 October 2014

इतिहासाची रंगरंगोटी!

सूर्यकांत पळसकर


केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इतिहासाची रंगरंगोटी करण्याचा घाट घातला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडे रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले आहे. मोदी सरकारला भारताचा संपूर्ण इतिहासच आरएसएसच्या विचारांनी रंगवून घ्यायचा आहे. आधी प्राचीन भारताचा इतिहास रंगविला जाईल, असे दिसते. प्राचीन इतिहास नव्याने लिहिण्यासाठी एक संशोधन प्रकल्प संस्कृत विभागाने जाहीर केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी काही निष्कर्षही विभागाने जाहीर केले आहेत. ‘आर्य हे मूळचे भारतीयच आहेत. ते बाहेरून भारतात आले नसून, भारतातून जगाच्या इतर भागात गेले. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे सापडलेली प्राचीन सिंधू संस्कृती ही मूळची आर्यांचीच संस्कृती आहे.' हा या निष्कर्षांचा गोषवारा सांगता येईल. इतिहासातील पुरावे पाहून निष्कर्ष काढण्याची प्रथा जगभरातील इतिहासकार पाळतात. दिल्ली विद्यापीठाने मात्र आधी निष्कर्ष जाहीर केले आहेत.


अलीकडेच गुजरातच्या राज्यपालपदी बसलेले भाजपाचे कडवे नेते ओ.पी. कोहली यांच्या खास उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा झाली. ‘इतिहास संशोधना'चा हा प्रकल्प हाती घेण्याची गरज का भासली याची तीन प्रमुख कारणे संस्कृत विभाग प्रमुख रमेश भारद्वाज यांनी जाहीर केली. ती अशी :
१. प्राचीन हस्तलिखिते आणि मजकुरांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संस्कृती ही परकीय संस्कृती नाही हे स्पष्ट होते.
२. फ्रेंच आणि संस्कृत भाषेच्या उच्चारात मोठे साम्य आहे. फ्रेंचमध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या नियमांचाही प्रत्यय येतो.
३. प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतात. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, आर्य हे भारतातून जगाच्या इतर भागात स्थलांतरित झाले. 
ऋग्वेद हा संस्कृत भाषेतील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्यापेक्षा कोणतेही प्राचीन हस्तलिखित उपलब्ध नाही. मग, भारद्वाज आणखी कोणत्या प्राचीन हस्तलिखिताबाबत बोलत आहेत? फ्रेंच ही मराठी भाषेप्रमाणेच एक आधुनिक भाषा आहे. मराठी जशी प्राकृतापासून बनली, तशी फें्रच ही व्हल्गर लॅटिनपासून बनली. ऋग्वेदानंतर सुमारे ३  हजार वर्षांनी फ्रेंच भाषा अस्तित्वात आली. व्याकरणकार पाणिनीचा जन्मही ऋग्वेद लिहिला गेल्यानंतर २ हजार वर्षांनी झाला. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, फ्रेंच भाषेचा जन्म झाला तेव्हा संस्कृत भाषा मृत झालेली होती आणि पाणिनीने संस्कृताचे व्याकरण लिहिले तेव्हा फ्रेंच भाषेचा जन्मही झालेला नव्हता! असे असले तरी वैदिक संस्कृत, पाणिनी आणि फ्रेंच भाषा  या तिघांचा मेळ घालण्यात येत आहे. या लोकांच्या पांडित्याला सलामच केला पाहिजे.

‘प्राचीन संस्कृतमधील अनेक शब्द पाश्चात्त्य अभिजात भाषांत आढळून येतातङ्क, हे वाक्य भारद्वाज यांनी ‘आपण काही तरी महान शोध लावल्या'च्या थाटात उच्चारलेले दिसते. ही शुद्ध लबाडी आहे. मुळात आर्य आक्रमणाचा सिद्धांतच या भाषिक साम्याच्या पायावर उभा आहे. प्रख्यात जर्मन विद्वान मॅक्समुल्लरने हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला. मॅक्समुल्लर भाषाशास्त्रज्ञ होता. तो संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतात आला होता. प्राथमिक नात्यासंबंधींच्या शब्दांचा अभ्यास करताना त्याला लॅटिन आणि संस्कृतातील साम्य दिसले. उदा. संस्कृतात आईला मातृ म्हणतात. या शब्दात म, त आणि र हे वर्ण येतात. लॅटीनमध्ये आईला मदर म्हणतात. त्याच्या स्पेलिंगमध्ये म, त आणि र हे तीन वर्णच आहेत. संस्कृतात वडिलांना पितृ आणि भावाला भ्रातृ म्हणतात. लॅटिनमध्ये ही नामे अनुक्रमे फादर आणि ब्रदर अशी आहेत. या शब्दांतही वर्णांचे पूर्णतः साम्य आहे. इतरही अनेक समान वर्ण असलेले शब्द त्याला आढळून आले. त्यातून मॅक्समुल्लरने आर्यआक्रमणाचा सिद्धांत मांडला. याच साम्याचा आधार घेऊन दिल्ली विद्यापीठाचा संस्कृत विभाग (पर्यायाने मोदी सरकार) आता ‘आर्य हे भारतातून बाहेर गेले', असा निष्कर्ष काढणार आहे.

मॅक्समुल्लरने भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये एक पॅटर्न शोधून काढला. या भाषांनी दोन वर्तुळे केली आहेत. मधल्या भागात हिंदी आणि तिच्या बोली भाषांचे वर्तुळ असून, बाहेरच्या बाजूने पंजाबी, सिंधी, काश्मिरी, गुजराथी, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी या प्रादेशिक भाषांचे वर्तुळ आहे. या सर्व भाषा एकमेकांच्या बहिणी आहेत!  या पॅटर्नमधून मॅक्समुल्लरने अंतर्वर्तुळ-बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला. आर्यांनी भारतात टोळ्या टोळ्यांनी असंख्य आक्रमणे केली. आधी आलेल्या टोळ्या सप्तसिंधूंच्या प्रदेशात स्थिर झाल्या होत्या; मात्र नंतर आलेल्या टोळ्यांनी त्यांना गंगेच्या खो-यापर्यंत खाली ढकलले. मागाहून आलेल्या टोळ्यांनी आधी आलेल्या टोळ्यांच्या भोवती कडे केले. मधल्या भागातील आर्यांच्या भाषेतून हिंदी आणि तिच्या बोली भाषा तयार झाल्या, तर बाहेर कडे करून राहिलेल्या आर्यांच्या भाषांतून प्रादेशिक भाषा तयार झाल्या, असे मॅक्समुल्लर म्हणतो. आर्य इथलेच आहेत, असा दावा करायचा असेल, तर मॅक्समुल्लरचा हा सिद्धांत खोडून काढावा लागेल. 
हडप्पा येथील उत्खननात सापडलेला बैलाची मुद्रा असलेला शिक्का.  
आणखीही अनेक मुद्दे आहेत. सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. या उलट ऋग्वेदातील आर्यांच्या संस्कृतीला घोड्याशिवाय अस्तित्वच नाही. सिंधू संस्कृती शहरांची संस्कृती आहे. या उलट भटक्या आर्यांचा मुख्य देव इंद्र हा ‘पुरंदर' म्हणजे शहरे उद्ध्वस्त करणारा आहे. सिंधू संस्कृतीत शेती होत होती; त्यामुळे कालवे आणि धरणे होती. इंद्र मात्र बांधलेले कालवे उद्ध्वस्त करणारा आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने सप्तसिंधूंचे पाणी मुक्त केले, अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारे या दोन्ही संस्कृतींचे मूळ रंगरूप कुठल्याच बाबतीत जुळत नाही. 

Thursday 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

Wednesday 15 October 2014

नोबेल, गांधी आणि सत्यार्थी!

नोबेल पारितोषिक पावन झाले 

-सूर्यकांत पळसकर 

महात्मा गांधी यांना ६ वेळा नॉमिनेशन मिळूनही नोबेल पारितोषिक नाकारण्याचे पाप नोबेल समितीने केले होते. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल देऊन आता समितीने या पापाचे क्षाळण केले, असे समजायला हरकत नाही. कैलाश सत्यार्थी हे गांधीवादी आहेत. या पूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग, तिबेटींचे नेते दलाई लामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी  नेत्या ऑन सॉन स्यू की या गांधीवाद्यांना नोबेल मिळाले आहे. पण हे सारे विदेशी होते. कैलाश सत्यार्थी यांच्या रूपाने भारतीय गांधीवाद्यालाही हा पुरस्कार आता मिळाला. एवढे नोबेल मिळविणारा गांधीविचार हा जगातील एकमेव विचार आहे.

१९३७ साली गांधीजींचे पहिल्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन झाले. त्यापुढच्या सलग दोन वर्षी त्यांना पुन्हा नॉमिनेशन मिळाले. १९४७ सालीही त्यांना नॉमिनेशन मिळाले. पण प्रत्येकवेळी समितीने त्यांना पारितोषिक नाकारले. गांधी हे विचारांनी "राष्ट्रवादी" आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दैवदुर्विलास पाहा, गांधी हे "राष्ट्रवादी" नाहीत, असा आरोप करीत नथुराम गोडसे याने त्यांची पुढच्याच वर्षी हत्या केली. गांधीजींचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते की, रुढ विचारांच्या चौकटीत ते बसतच नव्हते. म्हणूनच नोबेलवाल्यांना ते कडवट राष्ट्रवादी वाटत होते, तर हिन्दुत्वाद्यांना ते राष्ट्रवादी वाटतच नव्हते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९४८ साली त्यांना मरणोत्तर नोबेल देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला होता. पण, त्यात नियम आडवे आले. गांधीजींचा कोणत्याही संघटनेशी कायदेशीरित्या संबंध नव्हता. कोणत्याही संघटनेचे साधे सदस्यत्वही त्यांच्या नावे नव्हते. त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते; त्यामुळे त्यांना कोणी रितसर वारसच नव्हता. मग नोबेलचे स्मृतीचिन्ह आणि रक्कम देणार कोणाला? गांधींचे हे नोबेलही हुकले. पण नोबेल समितीने एक केले, त्या वर्षी कोणालाच नोबेल दिले नाही. "शांततेचे नोबेल पारितोषिक देता येईल, असा कोणीही जिवंत माणूस पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही", असे नोबेल समितीने त्या वर्षी जाहीर केले. ही गांधीजींना श्रद्धांजलीच होती.

पण, बरेच झाले, गांधींना नोबेल मिळाले नाही ते. संतवृत्तीने जगलेल्या या महापुरुषाने आयुष्यात सर्व प्रकारच्या लौकिक उपाध्या नाकारल्या. नियतीने त्यांना नोबेलच्या उपाधीपासूनही दूर ठेवले. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल मिळाल्याने गांधीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आज नोबेल पारितोषिकही पावन झाले आहे. 

Thursday 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ