Friday 19 December 2014

गीता आणि गाथा!

-सूर्यकांत पळसकर


श्रीमद्भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याविषयीचे सूचक विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. गीता कोणी वाचत नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यावर नुकतीच व्यक्त केली. भारत हा बहुभाषिक आणि बहुपंथीय देश आहे. त्यामुळे भारताचा अधिकृत राष्ट्रीय ग्रंथ कोणता व्हावा, याचा निर्णय घेणे सोपे नाही. गीता हा निःसंशय महान ग्रंथ आहे.  तथापि, राष्ट्रीय ग्रंथाचा बहुमान मिळावा, असे इतरही अनेक ग्रंथ या देशात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हा त्यातीलच एक ग्रंथ होय. 

सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय ग्रंथाचा मुद्दा काढला, त्याच्या सुमारे दीडशे वर्षे आधी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्स्टड्ढक्शन सर अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना भारताचे ‘राष्ट्रीय कवी' असे म्हटले होते. राष्ट्रीय कवीच्या रचनांना राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळणे नैसर्गिकच म्हणायला हवे. तुकोबांना राष्ट्रीय कवी म्हणणारे ग्रँटसाहेब काही लहान असामी नव्हते. अमेरिकेत जन्मलेले ग्रँट ब्रिटिश साम्राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षणतज्ज्ञ होते. लंडनच्या एडिनबर्ग विद्यापीठात ते प्राचार्य होते. ब्रिटिश सरकारने नंतर त्यांना भारतात पाठविले. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर, प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि विधान परिषदेचे सदस्य अशा अनेक जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. मुंबईत असतानाच तुकोबांचे अभंग त्यांच्या वाचनात आले. अभंग वाचून ग्रँटसाहेब भारावून गेले. जानेवारी १८६७च्या ‘फोर्टनाईटली रिव्ह्यू'मध्ये त्यांनी तुकोबांवर एक निबंध प्रसिद्ध केला. तुकोबांच्या काही अभंगांची पद्य भाषांतरेही त्यांनी केली. ग्रँटसाहेब श्रद्धावंत ख्रिश्चन होते. त्यांचा बायबलचा उत्तम अभ्यास होता. तुकोबांच्या अभंगांची बायबलमधील डेव्हिडच्या गीतांशी तुलना करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. बायबलमधील ही गीते ‘डेव्हीड्स साम्स' (David’s psalms) म्हणून प्रसिद्ध आहेत. ही गीते अत्यंत भावगर्भ आहेत. तोच भाव ग्रँटसाहेबांना तुकोबांच्या अभंगांत दिसून आला. ‘सतत देवाच्या जवळ राहिलेल्या व्यक्तीच्या भावनांचा सहज उद्गार', असे वर्णन त्यांनी तुकोबांच्या अभंगांचे केले.

ग्रँटसाहेबांच्या आधीपासून ब्रिटिश अधिका-यांना तुकोबांच्या अभंगांनी आकर्षित केले होते. त्या काळी महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात काम करीत होते. तुकोबांच्या अभंंगांचा वापर करून एतद्देशीय लोकांना ख्रिस्तचरणी आणता येईल, असे अनेक मिशन-यांना वाटत असे. त्या काळी नुकतेच ख्रिश्चन झालेले रे. नारायण वामन टिळक यांचेही असेच मत होते. टिळक हे मूळचे चित्पावन ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी धर्मांतराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते. ब्रिटिश मिशनरी मरे मिचेल (Dr. Murray Mitchell) यांनी याच उद्देशाने तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास केला. १८४९ साली मरे यांनी महिपतीच्या लिखाणाधारे तुकोबांचे संक्षिप्त चरित्र लिहिले. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात ते छापून आले. मरे यांनी तुकोबांच्या अभंगांचा इतका अभ्यास केला, की त्यांना स्वतःलाच अभंग रचता यायला लागले! अर्थात हा सारा खटाटोप धर्मांतरासाठी होता. ग्रँटसाहेबांना मिशन-यांच्या या कारवाया कळल्या होत्या. याचा समाचार त्यांनी आपल्या लेखात घेतला. ग्रँटसाहेबांनी लिहिले की, ‘ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे पटवून देणे दुरापास्त आहे!'

आज तुकोबांची जी गाथा महाराष्टड्ढात उपलब्ध आहे, त्याचे सारे श्रेय ग्रँटसाहेबांनाच जाते. सर बार्टल फ्रिअर हे तेव्हाचे मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. महाराष्ट्रात विखुरलेले तुकोबांचे अभंग एकत्रित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी २४ हजारांचे अनुदान ग्रँटसाहेबांनी गव्हर्नर बार्टल साहेबांकडून मंजूर करून घेतले. विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांची संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रकल्पावर देखरेख करण्याची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित यांच्यावर सोपविण्यात आली. १८६९ साली तुकोबांच्या गाथेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर चार वर्षांनी १८७३ साली दुसरा भाग प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात त्या काळी उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिखितांचा अभ्यास करून हा गाथा प्रसिद्ध झाला. उपलब्ध हस्तलिखितांतील पाठभेदांची नोंदही संपादकांनी करून ठेवली आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने हाच गाथा पुनप्र्रकाशित केला. काही अभंगांचा अपवाद वगळता वारक-यांमध्येही हाच गाथा प्रचलित आहे. अशा प्रकारे तुकोबांचे अभंग जतन करण्याचे महान काम सर अलेक्झांडर ग्रँट यांनी करवून घेतले. या प्रकल्पासाठी ब्रिटिश सरकारने दिलेल्या २४ हजार रुपयांची किंमत आजच्या हिशेबाने किती तरी मोठी होईल. ही मदत केवळ तुकोबांवरील प्रेमातून त्यांनी केली. गो-या साहेबांचे तुकोबांवरचे हे प्रेम त्या काळी महाराष्ट्रातील विद्वान म्हणविणा-या अनेकांच्या पोटदुखीचा विषय झाले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या निरपेक्ष बुद्धीच्या पंडिताने यावर केलेले भाष्यही बघण्याजोगे आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले की, ‘…जो बिचारा शूद्रकवी आपल्या लंगोटेबहाद्दर व घोंगडीवाल्या भक्तमंडळीतच काय तो रमायचा, किंवा फार झाले तर हरदासांच्या कथाप्रसंगी सत्कार पावायचा, त्यास एकाएकी अरबी गोष्टीतील अबू हसनसारखे मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले... असो झाली ती गोष्ट बरीच झाली.'

तुकोबांच्या अभंगांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकारी लेखक, कवी यांची यादी मोठी आहे. जे. नेल्सन फ्रेझर यांनी तुकोबांच्या अभंगांचे ‘पोएम्स ऑफ तुकाराम' या नावाने भाषांतर केले. फ्रेझर यांचाच ‘द लाइफ अँड टीचिंग ऑफ तुकाराम' हा अभ्यासग्रंथही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने हा ग्रंथ पूर्ण होण्याआधीच फ्रेझर यांचे निधन झाले. जेम्स एफ. एडवर्ड्स यांनी नंतर तो पूर्ण केला. १९२२ साली हा ग्रंथ दोघांच्या नावे प्रसिद्ध केला. एडवर्ड्स यांचाही बायबलचा सखोल अभ्यास होता. या सा-या गो-या साहेबांनी आपला धर्म विसरून तुकोबांवर प्रेम केले. अभंगांच्या अभ्यासासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली. भारत सरकारने असेच प्रेम दाखवून तुकोबांना ‘राष्ट्रकवी' म्हणून गौरवायला हवे. 
(लेखक औरंगाबाद लोकमतचे मुख्य उपसंपादक आहेत.)
(प्रसिद्धी : लोकमत १९ डिसेंबर २०१४)