Sunday, 12 July 2015

देव माणूस जाहला

बा. भो. शास्त्री यांनी अभंग पुन्हा जिवंत केला

सूर्यकांत पळसकर 
वारकरी आणि महानुभाव या दोन धार्मिक चळवळींनी मराठी साहित्याचा पाया रचला आहे. सांप्रत महाराष्ट्रात या चळवळींतील चैतन्य मूळ रसासह टिकून आहे. तथापि, त्यातून होणारी साहित्य निर्मिती आता थांबली आहे. निळोबा पिंपळनेरकर आणि बहिणाबाई शिवूरकर हे शेवटचे वारकरी संतकवी. योगायोगाने दोघेही तुकोबांचे शिष्य होते. तुकोबांच्या नंतरच्या काळात महानुभाव चळवळीत लेखन सुरू होते. आजही सुरू आहे. तथापि, चळवळीच्या बंदिस्त परंपरेमुळे ते महाराष्ट्रासमोर आलेच नाही. पंजाबमधील घुमान येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या महानुभावांच्या बंदिस्तपणाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याच वेळी मोरे यांनी महानुभाव परंपरेतील समकालीन साहित्यिक बा. भो. शास्त्री यांच्या नावाचा गौरवाने उल्लेख केला होता. आधुनिक कालखंडात खर्‍या अर्थाने मराठी साहित्यिक म्हणता येतील, अशी मोजून तीन-चार नावे मोरे यांनी शोधून काढली. त्यातील एक नाव बा. भो. शास्त्री यांचे होते. र. वा. दिघे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ ही उरलेली नावे. यावरून 'बाभों'चा अधिकार लक्षात यावा. बहुआयामी आणि विपुल लेखन करणार्‍या बाभोंनी वारकरी परंपरेतील अभंगांना महानुभाव चळवळीत आणण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. अभंग रचना करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. अभंग रचण्यासाठी नुसते कवी असून चालत नाही. पारमार्थिक अधिकारही हवा असतो. सर्वज्ञ चक्रधरांच्या परंपरेत अत्यंत आदराचे स्थान असलेल्या बाभोंना हा अधिकार नक्कीच आहे. 

औरंगाबादजवळील करमाड येथील महानुभाव आश्रमात वास्तव्य असलेल्या बाभोंनी अभंग रचनेसाठी 'भिका' हे सुटसुटीत नाव धारण केले आहे. त्यांच्या अभंगांचा 'भिका म्हणे' या नावाने एक छोटेखानी संग्रह प्रसिद्ध झाला आहे. अभंग लेखनासाठी बाभोंनी जाणीवपूर्वक बोलीभाषा स्वीकारली आहे. अभंगांची साधी शब्दरचना चटकन ओठावर रुळते. अभंग लिहिणारे सर्वच संतकवी समाजसुधारक होते. त्यामुळेच समाजाविषयीचा आत्यंतिक कळवळा हा बहुतांश संतकवींच्या अभंगांचा गाभा राहिला आहे. बाभोंच्या अभंगांतही हाच कळवळा दिसून येतो. त्यामुळे बाभो 'भिका म्हणे देव माणूस जाहला । माणसात आला भल्यासाठी ।।' असे चरण लिहून देवाला माणसांत उभे करतात. 

तुकोबा, निळोबा, बहिणाबाई यांची परंपरा बाभो चालवीत असले तरी, त्यांचे अभंग तुकोबा-बहिणाबाईंच्या काळातील नाहीत. हे अभंग खास बाभोंचे आणि बाभोंच्या काळातील आहेत. अभंग रचना बंद पडून आता जवळपास साडेतीनशे वर्षे होत आली आहेत. या काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील समाज पूर्णपणे बदलून गेला आहे. नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नवी ढोंगे उदयास आली आहेत. या सर्वांचा सडेतोड समाचार बाभो घेतात. बाभोंची लेखनी असे काही आसूड ओढते की, तुकोबांची आठवण व्हावी. स्त्रीभ्रूणहत्या आणि प्रदूषण यासारखे आधुनिक काळातील प्रश्न बाभो आपल्या अभंगांतून प्रखरतेने हाताळतात. मुलींची गर्भातच हत्या करणार्‍या आईला उद्देशून बाभो लिहितात :
भिका म्हणे आई कशी क्रूर झाली ।
गर्भातल्या मुली मारीतसे ।।
आधुनिक जगासमोर प्रदूषणाच्या रूपाने उभ्या राहिलेल्या दानवाचा जन्म मानवी हव्यासातून झाला आहे, हे बाभो शोधून काढतात. माणसाने हव्यास आवरल्यास प्रदूषण आपोआप थांबेल, अशी सुटसुटीत मांडणी ते करतात. बाभो लिहितात : 
किती प्रदूषण करिसी माणसा ।
आपुल्या हव्यासा आवरी तू ।।
गंगा, गोदावरी आणि यमुनेचे ।
गटार कधीचे बनविले ।।
दसर्‍याला रावणदहन करण्याची परंपरा भारतात आहे. या परंपरेच्या निमित्ताने बाभो माणसाच्या ढोंगीपणावर नेमकेपणाने प्रहार करतात. स्वत:तील दुगरुण कायम ठेवून रावण जाळण्यात कोणते शहाणपण? रावणही आपल्यापेक्षा चांगला म्हणायला हवा. त्याने सीतेचे हरण केले तरी तिला स्पर्श केला नाही. तिला शाबूद म्हणजेच पवित्र ठेवले. रावण देवापुढे आपले डोके कापून ठेवायचा. आपण तर देवालाही फसवितो. बाभोंनी अधोरेखित केलेले वास्तव विदारक आहे. या अभंगातील बोलक्या ओळी पाहा : 
दसर्‍याच्या दिशी जाळिती रावण ।
स्वत:त दुर्गुण असुनिया ।।
सीतेचे चरित्र ठेविले शाबूद ।
रावणाने वेद पाठ केले ।।
देवापुढे डोके कापूनि ठेवितो ।
आम्ही फसवितो देवालाही ।।
भिका म्हणे तुम्ही आधी राम व्हावे ।
खुशाल जाळावे रावणासी ।।
स्वतः रावणासारखे दुगुणी राहणाऱ्यास रावण दहन करण्याचा अधिकारच नाही. रावण जाळायचाच असेल, तर आधी स्वतः राम व्हायला हवे. बाभोंच्या अभंगातील हा विचार खरोखरच क्रांतिकारक आहे. 

वैयक्तिक पातळीवर धवल चारित्र्याचा आग्रह धरणारे बा. भो. शास्त्री घराची व्याख्या  करताना भावूक होतात. केवळ छत आणि भिंतींना घर म्हणता येत नाही. घरात वृद्धांचा योग्य सन्मान व्हायला हवा, असा संदेश ते देतात. ‘भिका म्हणे त्याचे घरचि मंदीर । भावनेचे सूर जुळताती ।।' हा चरण या अभंगांतील विचारांवर पावित्र्याचा कळस चढवितो. 

बा. भो. शास्त्री यांच्या तरल मनाची प्रचिती देणारे काही अभंगही या संग्रहात आहेत. एका अभंगात बाभो म्हणतात : 
आज काय झाले माझिया मनाला ।
राहतो एकला अनेकांत ।।
सख्या सांगात्यांचा बदलला सूर ।
कुणाच्या समोर दुःख सांगू ।
भिका म्हणे आता पुरा दैनावलो ।
भाजलो पोळलो देवराया ।।
या अभंगात बाभोंनी व्यक्त केलेली भावना आतड्याला पिळ पाडल्याशिवाय राहत नाही.  बाभो अगतिक होतात, पण हार पत्करीत नाहीत. लढत राहतात. ही लढाई स्वतःशी आणि समाजातील ढोंगाशी, अशी दुहेरी आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही तुकोबांनी व्यक्त केलेली लढाईची भावनाच बाभो पुढे नेताना दिसून येतात. या लढवय्यास आणि त्याच्या लढाईस सलाम. 
(प्रसिद्धी : लोकमत )

No comments:

Post a Comment