Saturday 19 August 2017

तुका आकाशा एवढा

अणुरणीया थोकडा,
तुका आकाशा एवढा ॥
अणूरेणूपेक्षा छोटे तरीही आकाशाएवढे मोठे! अफाट कल्पना आहे तकोबांची. पण कविकल्पना नाही. वास्तव आहे. ही माणसाच्या अस्तित्वाची अनुभूती आहे. जन्माच्या आधी माणसाचे अस्तित्व मातेच्या गर्भात अणूएवढेच असते. मृत्यूनंतर ते पुन्हा विश्वाच्या अफाट पसा-यात सूक्ष्म बनून विलीन होऊन होऊन जाते. सूक्ष्म आणि विशाल या दोन्ही अवस्था एकच आहेत. दोन नव्हे.

विज्ञानही हल्ली हीच संकल्पना मांडत आहे. सर्नच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी अणूंची टक्कर घडवून असे सूक्ष्म कण शोधून काढले जे विश्वाच्या अफाट पसा-याची प्रतिकृती आहेत. त्यांना शास्त्रज्ञांनी "गाॅड पार्टीकल्स" ( God Particles) असे नाव दिले. म्हणजेच जे पिंडी तेच ब्रह्मांडी. जे सूक्ष्म आहे तेच सर्वव्यापी, विशाल आहे. विश्वाची निर्मिती बिगबँगमधून झाली, तेव्हा विश्व अणुएवढेच सूक्ष्म होते. ते नंतर विस्तारत गेले.

माणूस एका खोलीच्या घरात राहू शकतो. पण त्याला मोठ्या घराची आस असते. ऐपत वाढताच तो मोठे घर बांधतो. नंतर तेही त्याला कमी पडते. मग तो आणखी मोठे घर बांधतो. पण कितीही मोठे घर बांधले तरी माणसाचे समाधान होत नाही. राजवाडाही माणसाला कमीच पडतो. कारण माणसाचे अस्तित्व विशाल आहे. संतांचे अस्तित्व तर कुठल्याही महालात, राजवाड्यात मावू शकत नाही. संतांना सामावून घेऊ शकेल, असे घर अजून बांधलेच गेले नाही. संतांना सामावून घेण्यासाठी खुले आकाशच हवे. म्हणून तुकोबा आकाशाएवढे आहेत. म्हणून ज्ञानेश्वर सहजपणे म्हणून जातात -
 हे विश्वची माझे घर,
ऐसी मती जयाची स्थिर,
किंबहुना चराचर,
आपण जाहला ॥