Sunday, 15 September 2013

वर्णव्यवस्थेचा क्रम

ज्या काळी वर्णव्यवस्था अस्तित्वात आली, त्या काळी भारतात राज्य आणि धर्म या दोन संस्था समाज व्यवस्थेचा मुख्य गाभा होता. या गाभ्या भोवती समाज व्यवस्थेची उभारणी झाली होती. त्यानुसार, धर्माची कामे पाहणारा वर्ग (ब्राह्मण), राज्यव्यवस्था पाहणारा वर्ग (क्षत्रिय), व्यापार उदिम पाहणारा वर्ग (वैश्य) आणि सेवा देणारा वर्ग (शुद्र)अशा ४ लोकसमूहांची गरज समाजाला भासली. त्यातून ४ वर्णांची रचना केली गेली, असे दिसते. राज्य आणि धर्म या दोन संस्था प्रमुख असल्यामुळे अर्थातच त्यांना जास्तीचे महत्त्व येत गेले. कालांतराने हे जास्तीचे महत्त्व इतके वाढले की, हेच दोन वर्ग प्रबळ झाले. त्यामुळे, भारतीय पुराणेतिहास म्हणजे याच दोन वर्णांचा इतिहास आहे. खालच्या दोन वर्णांची फारच थोडी माहिती पुराण ग्रंथांत आहे. 

वर्णव्यवस्थेचा क्रम कालौघात हा क्रम बदलत राहिला असावा, अशी एक शक्यता आहे. वर्णव्यवस्थेचा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र असा सांगितला जातो. ॠगवेदातील पुरूषसुक्तातून हा क्रम आला आहे. तथापि, पुरूष सुक्तच मुळात प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते. पुरूषसुक्त हे बरेच मागाहून ॠगवेदात घातले गेले आहे, असे अनेक विद्वानांनी दाखवून दिले आहे. पुराणेतिहासात वर्णव्यवस्थेचा क्रम क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शुद्र असा आहे. पुराणेतिहासातील वर्णव्यवस्थेचा हा क्रम पाहिला म्हणजे पुरूषसुक्ताच्या विश्वसनीयतेला तडा जातो. पुराण काळात राज्यव्यवस्था प्रधान होती. त्यामुळे क्षत्रियांचे महत्त्व वाढले असावे, असे दिसते. साधारणत: ब्रह्महत्या हे सर्वांत मोठे पाप आहे, असे मानण्याचा प्रघात आहे. तथापि, भागवत पुराणात ब्रह्महत्येपेक्षाही राजहत्या हे मोठे पाप असल्याचे वर्णन येते. त्याची संगती लावणे अवघड होऊन बसते. पुराण काळात राजसत्ता केंद्रस्थानी आल्याचा हा परिणाम असावा, असे दिसते. 

परशुराम कार्तवीर्याची हत्या करतो तेव्हा परशुरामचा पिता जमदग्नी त्याची निर्भत्सना करतो. जमदग्नी म्हणतो की, "अवधीन्नरदेवं यत सर्वदेवमयं.." राजाला नरदेव म्हणतात. कारण त्याच्या शरिरात सर्व देवांचा वास असतो. त्याची हत्या करायची नसते. इतकेच नव्हे, तर राजहत्या हे ब्रह्महत्येपेक्षाही मोठे पाप आहे, असे जमदग्नी सांगतो. राजहत्येचे पाप धुवून काढण्यासाठी तीर्थयात्रा करण्याचा आदेश जमदग्नी परशुरामाला देतो. त्यानुसार, परशुराम तीर्थयात्रा करतो. आणि शेवटी महेंद्र पर्वतावर जाऊन ध्यानधारणेत लीन होतो. असे वर्णन भागवतात येते. 

जमदग्नी परशुरामाला म्हणतो : 

राजो मूर्धाभिषिक्तस्य वधो ब्रह्मवधाद् गुरू: ।।
तीर्थसंसेवया चांहो जह्यङ्गच्युतचेतन: ।।४१।।
भागवत महापुराण. स्कंध : ९ वा. अध्याय : १५ श्लोक ४१

अर्थ : सार्वभौम राजाचा वध करणे हे ब्राह्मणाचा वध करण्यापेक्षाही मोठे पाप आहे. हे पाप धुवून काढण्यासाठी भगवंताचे स्मरण करीत तीर्थयात्रा कर.


सूर्यकांत पळसकर

Tuesday, 10 September 2013

Monday, 9 September 2013

भगवान श्रीकृष्णाचा वंश

भारतीय पुराणेतिहासात तसेच आधुनिक इतिहासात महत्त्व असलेले प्रमुख दोन क्षत्रिय वंश आहेत. 

१. सूर्यवंश
२. चंद्रवंश.

सूर्यवंशात प्रभू रामाचा तर चंद्रवंशात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाला यादव, माधव, वाष्र्णेय अशी नावे आहेत. ही सर्व नावे वंशनिदर्शक आहेत. याचे विश्लेषण आपण लेखात पुढे पाहणारच आहोत. 

चंद्रवंश हा भारतातील सर्वांत मोठा राजवंश आहे. सर्वांत यशस्वी राजवंश म्हणूनही याच्याकडेच अंगुलीनिर्देश करावा लागतो. ज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडले तो राजा भरत याच वंशातील आहे. महाभारतातील युद्धाला कारणीभूत असलेले कौरव-पांडव याच राजवंशातील आहेत. इतकेच नव्हे, तर भारती युद्धात सहभागी झालेले बहुतांश राजेही याच वंशातील आहेत. ययाति-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, पुरूरवा-उर्वशी अशा महानायक-नायिकांच्या जोड्या या चंद्रवंशाने भारताला दिल्या. कंस, जरासंध, दुर्योधन, शिशूपाल ही मोठी खलनायक मंडळीही याच वंशाने दिली. परशुरामाशी वैर घेणारे हैहय कुळातील राजे हे चंद्रवंशीच आहेत. नहुष हा चंद्रवंशातील पहिला ऐहिक पुरूष म्हणायला हवा. इंद्राची पत्नी शचि हिची इच्छा धरल्यामुळे नहुषाच्या नशिबी बदनामी आली. तथापि, तो अत्यंत पराक्रमी होता. त्याला ६ मुले होती. राजा ययाति हा त्याचा क्रमांक दोनचा मुलगा. वि. स. खांडेकरांनी आपल्या "ययाति" या कादंबरीत याचेच चरित्र वर्णिले आहे. 

एखाद्या राजाला जेव्हा अनेक कर्तत्ववान मुले असतात, तेव्हा तो वंश विभागला जातो. वंशावळ स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक मुलाच्या नावे वंशावळ दिली जाते. ज्या वंशात जास्त राजकीय घडामोडी घडतात, तो वंश जास्त चर्चेत राहतो. मान्यता पावतो. त्यादृष्टीने चंद्रवंशाच्या दोन मुख्य शाखा ठरतात. पहिली शाखा ययातिचा थोरला मुलगा यदू याच्यापासून तर दुसरी शाखा ययातिचा धाकटा मुलगा पुरू याच्यापासून सुरू होते. भारताचा संपूर्ण पुराणेतिहास या दोघांच्या वंशाचा इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यदू हा शुक्राचार्याची कन्या देवयानी हिचा पूत्र होता. पुरू हा असूर कन्या शरमिष्ठा हिचा पूत्र होता. पुरूच्या वंशात कौरव-पांडव जन्मले. यदूच्या वंशात भगवान श्रीकृष्ण जन्मले. चंद्रवंशात यदूची शाखा  सर्वांत मोठी आहे. यदूच्या वंशजांना यादव म्हटले जाते. यदूचे वंशज म्हणून यादव. यादववंश हा भारताच्या अनेक भागांत पसरलेला आहे. संपूर्ण उत्तर भारत, बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्र एवढ्या मोठ्या भूभागावर आजही यादव वंश आढळतो. महाराष्ट्रातील देवगिरीचे राजघराणे यादव वंशी होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यादववंशीच होत. सिंदखेडच्या जाधव घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला. जाधवराव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज समजले जातात. यादव राजे आपल्याला श्रीकृष्णाचे वंशज समजत. जिजाऊंचे पती शहाजीराजे मात्र सूर्यवंशातील आहेत. 

भगवान श्रीकृष्ण ही चंद्रवंशातील सर्वांत महान व्यक्तिरेखा होय. श्रीकृष्णाला यादव, वाष्र्णेय, माधव अशा उपाध्या महाभारत आणि इतर ग्रंथांत लावलेल्या दिसून येतात. या सर्व उपाध्या श्रीकृष्णाच्या वांशिक परंपरा स्पष्ट करतात. यदूवंशातील हैहय कुळात पुढे वीतिहोत्र राजा झाला. वीतिहोत्र याचा पुत्र मधु. मधुने मोठा पराक्रम गाजविला. त्याच्या नावावरून या वंशाला पुढे माधव हे नाव पडले. म्हणून श्रीकृष्णाला माधव म्हटले जाते. राजा मधुला १०० मुले होती. त्याच्या थोरल्या मुलाचे नाव होते वृष्णि. वृष्णिच्या नावावरून या वंशाला वाष्र्णेय असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्ण हा वृष्णिचा १४ वा वंशज ठरतो. 


Sunday, 8 September 2013

प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते

सूर्यकांत पळसकर

महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जोरदार धुमशान सुरू आहे.पण श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. मुळात प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंध झाल्याशिवाय श्रद्धाळू होताच येत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत ‘मामेकं शरणं’ असा स्पष्ट आदेशच दिला आहे. श्रीकृष्णाचा हा आदेश ‘फार बुद्धी चालवू नकोस’ या पातळीवरचा आहे. श्रद्धेत बुद्धीवर भावनेचा कंट्रोल असतो. बुद्धी वापरली तर देवळातली मूतीं दगड ठरते. भावना वापरली तर मात्र हाच दगड ठेव ठरतो.हे द्वंद्व तुकोबांनी फार सुंदर पद्धतीने मांडले आहे. तुकोबा म्हणतात :

पाषाण देव पाषाण पायरी ।
पूजा एका वरी पाय ठेवी ।।

मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे “मानावे” लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस किंवा विज्ञानवादी श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.

श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? त्याचे निकष काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा, या विष्यीच्या व्याख्या भ्रामक आहेत. आपल्या देवघरातील देवाला साजूक तुपातला नैवेद्य ठेवणे आणि गावकुसाबाहेरच्या मरी आईला बक-याच्या सागुतीचा नैवेद्य ठेवणे या दोन गोष्टींत ‘भावा’च्या पातळीवर कोणताही फरक नाही. पण, श्रद्धा-अंधश्रद्धेचा विषय येतो, तेव्हा यात आपण फरक करतो. देवघरातील देवाचा साजूक तुपातला नैवेद्य श्रद्धा ठरतो, तर म्हसोबाचा बोकडाचा नैवेद्य अंधश्रद्धा! हा दाभोळकर-मानव यांच्या प्रचार तंत्राचा परिणाम आहे का? नैवेद्य म्हणजे आपल्या नित्याच्या जेवणातील देवासाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेला भाग. ज्याचा जो आहार असेल, तोच नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवणे हे नैसगिंक आहे. प्रभूरामाने लंकेवर स्वारी करण्यापूवीं रामेश्वराला मांसाचाच नैवेद्य दाखविला होता.

जादूटोणा विरोधी कायदा श्रद्धेच्या विरोधात नाही; जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे करणे आदी गोष्टींच्या विरोधात आहे, असे म्हटले जाते. जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे आदि सर्व गोष्टी अंनिसने अंधश्रद्धेच्या यादीत टाकल्या आहेत. हा निकष तंतोतंत पाळायचे म्हटले तर आपले सगळे वेद, उपनिषदे, पुराणे अंधश्रद्धेच्या यादीत जाऊन निषिद्ध ठरतील. “अंगात संचार होणे” याचे एकच उदाहरण येथे आपण पाहू या. अंगात येणे, हा प्रकार भारतातील आदिवासी टोळ्यांतील एक प्रथा आहे, असे मानले जाते. पण, ते काही खरे नाही. वैदिक वाङ्मयात संचार होण्याशी संबंधित शेकडो कथा आहेत. बृहदारण्यक उपनिषदातली एक कथा येथे पुराव्यासाठी देतो.

गंधर्वगृहिता पतंचलकन्या!
विदेह देशाचा राजा जनक याने एकदा महायज्ञ केला. कुरू आणि पांचाल देशांतील ब्राह्मण यज्ञाला जमले. जमलेल्या ब्राह्मणांपैकी प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ कोण आहे, हे जाणण्याची जनकाला इच्छा झाली. त्याने प्रत्येक शिंगाला एक पाद बांधलेल्या १ हजार गायी गोशाळेत बांधल्या. (पाद म्हणजे सोन्याचे नाणे.) जनक म्हणाला : ‘ब्राह्मणहो, तुमच्यामध्ये जो ब्रह्मिष्ठ (ब्राह्मणांत सर्वश्रेष्ठ) असेल त्याने या गायी घेऊन जावे!’ कोणाही ब्राह्मणास हिंमत होईना. तेव्हा याज्ञवल्क्याने आपल्या सामश्रवा नामक शिष्याला गायी घेऊन जाण्याची आज्ञा केली. तो गायी नेऊ लागला, तेव्हा इतर ब्राह्मणांना क्रोध आला. ते त्याची परीक्षा घेण्यासाठी धावले. प्रश्न विचारू लागले. जनकाचा होता अश्वल याने आधी प्रश्न केले. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्याने दिली. नंतर जरत्कारूगोत्रोत्पन्न आर्तभाग याने प्रश्न केले. याज्ञवल्क्याने त्यालाही गप्प केले. त्यानंतर लह्याचा पुत्र भुज्यु याने प्रश्न केले. भुज्यु म्हणाला : ‘याज्ञवल्क्या, आम्ही मद्रदेशामध्ये प्रवास करीत होतो. आम्ही कपिगोत्री पतंचलाच्या घरी गेलो. त्याच्या मुलीच्या अंगामध्ये एक गंधर्व येत असे. आम्ही त्या गंधर्वाला विचारले की, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी अंगिरसगोत्री सुधन्वा आहे.’

या कथेतील भुज्यूच्या निवेदनाशी संबंधित मूळ श्लोक असे :

अथ हैनं भुज्युर्लाह्यायनि पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच ।
मद्रेषु चरका पर्यव्रजाम ते पतंचलस्य काप्यस्य गृहानैम ।
तस्यासीद्दुहिता गन्धर्वगृहिता, तमपृच्छाम कोऽसीति ।
सोऽब्रवीत सुधन्वाऽन्गिरस…।
-बृहदारण्यकोपनिषद. अध्याय तिसरा. ब्राह्मण तिसरे. श्लोक पहिला.

पतंचल ब्राह्मणाच्या मुलीच्या अंगात येत असे. ती ‘गन्धर्वगृहिता’ म्हणजे गंधर्वाने पछाडलेली होती. गंधर्व तिच्या मुखातून बोलत असे. असा हा कथाभाग आहे. अशा कथांचे काय करायचे? तुकोबांनी दिलेला दगडाचा दृष्टांत या कथांनाही लागू होतो. त्यांच्यावर पाय देऊन पुढे जायचे की पूजा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझा देव दुसर्यासाठी दगड ठरतो, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जो वाद सुरु आहे, त्यच्या मुळाशी हीच समस्या आहे.

पाच महासती

सूर्यकान्त पळसकर

भारतीय धर्म परंपरेत सात चिरंजीव आणि पाच महासती सांगितल्या जातात. महासतींना पंचकन्या असे म्हटले जाते. अहिल्या, द्रोपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी अशी त्यांची नावे आहेत. या पौराणिक महिलांविषयी एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे.

अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।

अर्थ : अहल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांचे नित्य स्मरण केल्याने महापापांचा नाश होतो.

या पाचही जणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. पण, सौंदर्य हा सतीत्वाचा निकष नाही. सती या शब्दाचा पारंपरिक अर्थ आहे परम पवित्र स्त्री. अशी स्त्री जी आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे. त्यांना कन्या म्हटले जाते हे वरील संस्कृतात स्पष्टपणे दिसते. कन्या म्हणजे कौमार्यभंग न झालेली मुलगी अर्थात कुमारिका. महासती किंवा कन्या या दोन्ही नामांच्या अर्थाच्या दृष्टीने वरील पाचही पौराणिक महिलांचे चरित्र पूर्ण विरुद्ध आहे. या पाचांपैकी कोणीही कुमारिका नाही. त्या सर्वच विवाहित महिला आहेत. तरीही त्यांचा उल्लेख महिला असा न करता कन्या असा केला गेला आहे. तसेच पाचही जणींचे एकापेक्षा जास्त पुरूषांशी शारिरिक संबंध आले आहेत. इतकेच नव्हे, तर कुंती ही कुमारी माता आहे. तरीही त्यांना महासतसी असे संबोधले जाते. त्यांनी भारतीय जनमानसात मानाचे आणि पवित्र स्थान मिळविले आहे. त्यांना महासती आणि पंचकन्या या उपाध्या कोणत्या निकषांच्या आधारे दिल्या गेल्या, हा येथे मुख्य प्रश्न आहे.

पाच जणींच्या चरित्रात काही समान गोष्टी आहेत.
  • या पाचही जणी धाडसी आणि बंडखोर आहेत. धोपट मार्गावरून चालण्याचे त्या नाकारतात. त्यांच्या काळात रूढ असलेल्या परंपरा मोडून त्या कणखरपणे उभ्या राहतात. 
  • परंपरांचा संबंध पाप-पुण्याशी जोडलेला आहे. त्या दृष्टीने पाहता, या महिला प्रसंगी पापाचरण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत, असे दिसते.

  • परंपरांच्या छातीवर पाय दिल्यामुळे या महिलांना खडतर आयुष्याचा सामना करावा लागतो. पण, त्या संकटांसमोर रडत बसत नाहीत. कणखरपणे सामना करतात.

  • धोपट मार्ग सोडून वेगळी वाट निवडल्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. मात्र, त्याबाबत त्या खंत करीत नाहीत.
आता या पाच जणींच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करू या.

अहिल्या
संस्कृतात हिचे नाव अहल्या असे आहे. मराठीत ते अहिल्या असे रूढ आहे. ती गौतम ॠषीची पत्नी होती. दोघांना एक मुलगा झाला. तिच्या सौंदर्याने देवांचा राजा इंद्र मोहित झाला. चंद्राशी संगनमत करून त्याने तिचा उपभोग घेतला. चंद्राने कोंबडा बनून पहाटेपूर्वीच बांग दिली. तांबडे फुटले आहे, असे गृहित धरून गौतम ॠषी गंगेवर स्नानाला निघून गेले. इकडे इंद्र गौतमाचे रूप घेऊन अहिल्येच्या कुटीत शिरला. दोघांनी अंगसंग केला. आपण ज्याला कुटीत घेत आहोत, तो गौतम नसून देवराज इंद्र आहे, असे अहिल्येला कळले होते किंवा नाही? हा मुद्दा वादाचा आहे. एक परंपरा मानते की, अहिल्येला ते माहिती नव्हते. दुस-या परंपरेच्या मते हा गौतम नाही, हे तिला कळले होते. आपल्यावर बोल येऊ नये, म्हणून ती ‘नाथ आपण इतक्या लवकर कसे काय परतलातङ्क असा प्रश्न करून इंद्राला कुटीत घेते. वेषांतर केल्यामुळे अहिल्येला गौतम आणि इंद्र यांच्यातील फरक कळला नसेल, हे गृहीत धरणे बरेच कठीण आहे. अंधार असल्यामुळे अहिल्येला नीट दिसले नसेल, असे मानले तरी अंगसंग करताना तरी तिला हा आपला पती नाही, हे कळलेच असणार. परपुरूषाशी अंगसंग करणे हे पाप आहे, याची जाणीव तिला नव्हती, असेही नव्हे. तरीही इंद्रालाला अडवित नाही.

इंद्रासोबतच्या शय्यागमनाची मोठी किंमत तिला मोजावी लागते. तिच्या नशिबी शिळा होऊन पडून राहण्याचे दु:ख येते. शिळा म्हणजे पाषाण. हे एक रूपक आहे. अहिल्या शिळा झाली म्हणजे पाषाणासारखे कठीण आयुष्य तिच्या वाट्याला आले.

द्रोपदी
द्रौपदी ही द्रुपद राजाची कन्या होती. महाभारतातील युद्धाला तीच एकमेव कारण होती. ती अत्यंत महत्त्वाकांक्षी होती. त्या काळी भारतात धनुष्य बाण हे सर्वांत मोठे शस्त्र होते. कारण दुरून मारा करण्याची शक्ती त्या काळी केवळ धनुष्य बाणातच होती. भारतवर्षांत सर्वांत श्रेष्ठ धनुर्धारी आपला पती व्हावा, अशी तिची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तिने स्वयंवर रचले. मत्सयंत्राचा पण मांडला. त्याकाळचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाने हा पण जिंकला. पुढे अर्जुनासोबत त्याच्या इतर ५ भावांची पत्नी होण्याची वेळ आली तेव्हा द्रौपदी मागे हटली नाही. द्रौपदीच्या काळात भारतात बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्या काळात तिने बहुपतित्व स्वीकारले. ही प्रचंड धाडसाची गोष्ट होती. कौरवांच्या सभेत तिचे वस्त्रहरण होते, तेव्हा ती प्रचंड संतापते. ती मान खाली घालून रडत बसत नाही. आपल्या भाषणाने सभेत बसलेल्या महावीरांना लज्जित व्हायला भाग पाडते. कौरवांचा नाश करण्यासाठी आपल्या पाच पतींना उद्युक्त करते. कौरवांचा नाश होत नाही, तोपर्यंत वेणी घालणार नाही, असा पण ती करते. पुढे संपूर्ण १२ वर्षांच्या वनवासाच्या काळात ती आपले केस बांधित नाही. तिचे मोकळे केस पांडवांना धुमसत ठेवतात. शेवटी कौरवांचा नाश होतो, तेव्हा ती भीमाच्या हातांनी वेणी घालून घेते. भारती युद्धात तिला मोठी किंमत मोजावी लागते. तिचे पाच पूत्र युद्धात मारले जातात.

कुंती
पाच महासतींपैकी कुंती सर्वाधिक बंडखोर आहे. कुंतीच्या कथेमधील अतक्र्य आणि चमत्कारांचा भाग बाजूला काढल्यास जे कथाभाग उरतो, तो प्रचंड विस्फोटक आहे. ती कुमारी माता आहे. कर्ण हा तिचा लग्नाच्या आधीचा मुलगा आहे. तिचे दुर्दैव पाहा. लग्न झाल्यानंतर ती आपल्या नव-यापासून शरीर सुख घेऊ शकत नाही. पंडू हा आजारी आणि अशक्त असतो. पण ती डगमगत नाही. त्यातून ती मार्ग काढते. ती ५ मुलांना जन्म देते. इतकेच नव्हे, तर या मुलांचा जन्म धर्मसंमत ठरविते. कुमारी माता होण्याची मोठी किंमत तिला मोजावी लागते. तिचा मोठा मुलगा कर्ण हा तिचाच दुसरा मुलगा अर्जुन याच्याकडून मारला जातो.

तारा
भारतीय पुराणेतिहासात दोन तारा आहेत. एक तारा ही देवांचा पुरोहित बृहस्पती याची पत्नी आहे, तर दुसरी रामायणातील वानरराज वाली याची पत्नी आहे. दोघींचे आयुष्य खडतर आहे. दोघींचेही अपहरण होते. दोघीही अत्यंत धोरणी आहेत. दोघींपैकी महासती तारा कोणती, याबाबत काहीच स्पष्टता नाही. येथे आपण दोन्ही तारांचा विचार करू या.

१. पुराणांमधील तारा : ही देवांचा पुरोहित बृहस्पती याची पत्नी आहे. भारतातील सर्वांत मोठा क्षत्रिय वंश असलेल्या चंद्रवंशाची ती जननी आहे. ती सौंदर्यवती होती. तिचे सौंदर्य पाहून चंद्र तिच्यावर भाळतो. बृहस्पतीच्या अनुपस्थितीत चंद्र तिचे अपहरण करतो. आपली पत्नी आपल्याला परत मिळावी यासाठी बृहस्पती देवांकडे दाद मागतो. मात्र, तिच्या मुद्यावर देवांमध्ये मतभेद होतात. काही देव बृहस्पतीच्या बाजूने तर काही चंद्राच्या बाजूने होतात. असूर चंद्राची बाजू घेतात. यावरून देव आणि असूरांत घनघोर युद्ध होते. ॠषि अंगिरा शिष्टाई करून ब्रह्मदेवाला मध्यस्थी करायला लावतात. ब्रह्मदेव चंद्राची कान उघाडणी करून बृहस्पतीची पत्नी परत करण्यास सांगतो. चंद्र ताराला बृहस्पतीच्या स्वाधीन करतो. पण, तोपर्यंत उशीर झालेला असतो. ताराच्या पोटात चंद्राचा गर्भ आधीच राहिलेला असतो. ताराला चंद्रापासून मुलगा होतो. त्याचे नाव बुध. तो प्रचंड बुद्धीमान असतो, म्हणून त्याचे नाव बुध असे ठेवले जाते. बुधाची पत्नी इला. बुध आणि इलेचा मुलगा पुरूरवा. पुरूरवा हा पुराणेतिहासातील पहिला चंद्रवंशी राजा होय. त्याचे लग्न उर्वशीशी होते.
१. रामायणातील तारा : ही वालीची पत्नी आहे, ती  अत्यंत मुत्सद्दी आहे. वालीचा प्रभू रामचंद्रांकडून वध झाल्यानंतर ताराचा मुत्सद्दीपणा प्रखरपणे नजरेत भरतो. वाली ठार झाल्यानंतर ती वालीचा भाऊ सुग्रीव याच्याशी लग्न करते. वालीपासून तिला आधीच एक मुलगा असतो. त्याचे नाव अंगद. राज्याचा वारस अंगद होणार असेल, तरच मी तुझ्याशी लग्न करीन, अशी अट ती सुग्रीवासमोर ठेवते. सुग्रीव ती मान्य करतो. पुढे किश्किंधेचे राज्य अंगदाला मिळते. 

मंदोदरी
मंदोदरी ही लंकापती रावणाची पट्टराणी आहे. महासतींमध्ये प्रभूरामचंद्राची पत्नी सीता हिचा समावेश करण्याऐवजी मंदोदरीचा समावेश करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत विचक्षण आहे. मंदोदरी हिच्याबद्दल असंख्य आख्यायिका आहेत. रावण सीतेचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन येतो, तेव्हा रावणाला ती खडे बोल सुनावते. कदाचित मंदोदरीमुळे सीता लंकेत सुरक्षित राहू शकली असावी. रामासोबतच्या युद्धात तिचा पती रावणच नव्हे, तर इंद्रजितासह तिचे सारे पुत्र मारले जातात. युद्धानंतर ती रावणाचा धाकटा भाऊ विभिषण याच्याशी लग्न करते. विभिषणाच्या राज्यातही तीच पट्टराणी असते.

गणपती : वारक-यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता

सूर्यकांत पळसकर

‘‘... तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात...''

वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही. वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. वारकरी संतांनी गणपतीची गणना म्हसोबा, बिरोबा, जखाई-मसाई अशा मद्यमांस भक्षक उपदेवतांच्या यादीत ढकलेले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.

ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा मुख्य ग्रंथ. तो वारक-यांचा पहिला मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. भारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र या रुढीला फाटा देण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात. 

ज्ञानेश्वरीची ही पहिली ओवी अशी : 

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । 
जयजय स्ववेंद्या । आत्मरूपा ।।१।।

ज्ञानदेवांनी इथे गणपतीला बाजूला सारून विश्वनिर्मात्याला पहिले नमन केले आहे. विश्वनिर्मात्याला ते ओमकाराच्या रूपात पाहतात. ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायांपैकी कोणत्याही अध्यायाची सुरूवात गणेशस्तवनाने होत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गणपतीला दूर सारून ज्ञानेश्वर नवी परंपरा निर्माण करीत नाहीत. ही परंपरा आधीच वारक-यांत होती. तिचा अंगिकार ज्ञानेश्वर करतात. सनातन्यांनी छळ करून दूर लोटल्यानंतर ज्ञानेश्वर वारक-यांच्या चळवळीत शिरले, असे मानण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण परिस्थिती त्याच्या उलट आहे. ज्ञानेश्वरांचे घराणे किमान तीन पिढ्यांपासून वारकरी होते. ते वारकरी होते, म्हणून सनातन्यांनी विठ्ठलपंत आणि त्यांच्या मुलांचा छळ केला. हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. त्यामुळे त्याचा उहापोह येथे करीत नाही. याविषयावर मी नंतर लिहिणारच आहे. असो. ज्ञानेश्वरांनी गणपतीला दूर ठेवून वारक-यांच्या रूढ परंपरेचे पालन केले. ज्ञानेश्वरांच्या समकालीन संतांनीही गणेशाला पहिल्या वंदनाचा मान दिलेला नाही. 

गणपतीबाप्पाला बाजूला बसविण्याचा हा प्रघात वारकरी फक्त ग्रंथ लेखनात पाळतात असे नव्हे. इतर सर्वच 
क्षेत्रांत तो पाळला जातो. वारकरी भजनांची सुरूवात गणेश स्तवनाने होत नाही. ‘विठोबा रखुमाई' असा घोष आळवून वारकरी भजने सुरू होतात. ज्ञानोबांच्या ‘रूप पाहता लोचनी' या अभंगाला पहिल्या भजनाचा, तर तुकोबांच्या ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या अभंगाला दुस-या भजनाचा मान आहे. ही दोन भजने झाल्यानंतरच इतर भजने म्हटली जातात. किर्तनात आणि प्रवचनात हाच क्रम वापरला जातो. अखंड हरीनाम सप्ताहांत हाच क्रम आहे. गाथा भजनांत हाच क्रम आहे. या सर्वच ठिकाणी गणपतीबाप्पा कुठेही नाही. वारकरी धर्माने सर्वच ठिकाणी गणपतीला बाहेर बसवले आहे. 

तुकोबा हे वारकरी धर्माचे कळस असल्यामुळे त्यांची गणपतीविषयक भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. वारकरी धर्मात तुकोबांचा शब्द अंतिम समजला जातो. तुकोबांचा ‘नव्हे जोखाई' हा अभंग प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण अभंग आधी आपण पाहू या. 

नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

या अभंगातील ‘गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ' हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिले आहे. तुकोबा म्हणतात : 'आक्राळ विक्राळ पोट असलेला गणपती हा लाडू आणि मोदकांचा काळ आहे.' खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरे काहीही करीत नाही. म्हणजेच अध्यात्म मार्गात तो निरुपयोगी आहे.

महाराष्ट्र धर्मात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व उपदैवतांना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी आणण्याचे ऐतिहासिक कार्य वारकरी संतांनी केले. तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्टड्ढात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती'! तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात. 

तुकोबांनी केलेले गणपतीचे हे अवमूल्यन पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. पण केवळ मनाला आले म्हणून तुकोबांनी गणपतीचे अवमूल्यन केलेले नाही. त्यामागे निश्चित भूमिका आहे. तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या उपदेवतांच्या यादीत देवी-देवता या देवऋषांच्या उपयोगाच्या आहेत. गणपती आणि या देवी-देवतांमध्ये एक समानता आहे. हे सर्व देव कोणाचे तरी पोटपाणी चालवितात. तसेच येथे संचार अपेक्षित आहे. देवऋषाच्या अंगात देवीचा संचार होत असतो. भटजींच्या पूजेतही संचारच असतो. पण हा संचार अंगात न होता, सुपारीत होत असतो. कोणत्याही पुजेच्या आधी भटजी लाल सुपारी मांडतात. या सुपारीत गणपतीची स्थापना करतात. ही स्थापना म्हणजे संचारच. जखाई-मसाई देवऋषाचे पोटपाणी चालवितात. तर गणपती हा भटजीचे पोट चालवितो. देवऋषाला मोबदला म्हणून पैसा आणि धान्य दिले जाते. भटजींनाही रोख रक्कम आणि धान्याच्या स्वरूपात दक्षिणा दिली जाते. इथे देव हा पैसे मिळविण्याचे साधन ठरतो. वारकरी धर्म देवाला साधन मानित नाही. साध्य मानतो. देवाच्या नावे पैशांची देवाण घेवाण करण्यास वारकरी धर्म तीव्र विरोध करतो. तुकोबांनी तर ‘देती घेती नरका जाती' असे सांगून पैसे देणारा आणि घेणारा असा दोघांचाही निषेध केला आहे. 

‘कलौचंडी विनायकौ' असे पुरोहिती शास्त्रात एक वचन आहे. ‘कलियुगात देवी आणि गणपती यांची उपासना फलदायी ठरते.' असा या वचनाचा अर्थ आहे. या देवता देवऋषी आणि पुरोहित यांना खरोखरच ‘फल'दायी ठरल्या आहेत. तुकोबा गणपतीला जखाई-मसाईच्या रांगेत का उभे करतात, याचे कोडे येथे उलगडते.

Friday, 6 September 2013

स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!

सूर्यकान्त पळसकर 

वादग्रस्त साधू आसाराम बापू यांना एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक झाली. आसाराम हे त्या मुलीला घेऊन दीड तास एकांतात होते, अशी माहिती तपासातून समोर आली. त्याचे समर्थन करताना, आसाराम यांनी म्हटले की, ‘‘आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत एकांतात बसण्यात वाईट ते काय?'' 
विविध आखाड्यांच्या महंतांनी आसाराम यांच्या एकूणच वागणुकीला आक्षेप घेतला. दुसरे एक वादग्रस्त साधू रामेदव बाबा यांनी आसाराम यांना थेट विरोध केला नाही. पण त्यांनी धर्मशास्त्राचा हवाला देऊन एक वक्तव्य केले. रामदेव बाबा म्हणाले की, ‘‘साधूंनी स्त्रियांसोबत एकांतात बसू नये. साधूंनीच नव्हे, सर्वांनीच ही खबरदारी घ्यायला हवी. आपली माता, सासू, बहीण, मुलगी यांच्यासोबतही एकांतात बसू नये, असे धर्मशास्त्र सांगते.'' 

 रामदेव बाबा यांनी ज्या धर्मनियमाचा हवाला येथे दिला आहे, त्याचा उगम वैष्णव पंथियांचा मुख्य धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद्भागवतात आहे. राजा ययातिच्या तोंडी हा नियम आला आहे. राजा ययातिची गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ती पुन्हा येथे देत नाही. आपले म्हातारपण आपला धाकटा मुलगा पुरू याला देऊन तसेच त्याचे तारुण्य स्वत:कडे घेऊन ययाति कित्येक वर्षे लैंगिक सुखाचा उपभोग घेतो. लैंगिक सुख कितीही उपभोगले तरी मन भरत नाही, याची जाणीव शेवटी त्याला होते. तेव्हा तो पुरूचे तारुण्य त्याला परत करण्याचा व स्वत: सर्व:संग परित्याग करून वानप्रस्थ स्वीकारण्याचा निर्णय घेतो. आपला हा निर्णय तो आपली पत्नी भृगुनंदिनी देवयानी हिला सांगतो. यावेळी तो तिला मोठा उपदेश करतो. या उपदेशात माणसाच्या लैंगिक सुखाच्या तृष्णेविषयी दोन श्लोक आहेत. त्यात वरील नियम आला आहे. 

ययातिच्या तोंडी असलेले भागवतातील मूळ श्लोक असे : 

या दुस्त्यजा दुर्मीतिभिर्जीर्यतो या न जीर्यते । 
तां तृष्णा दु:खनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत ।। 
मात्रा स्वस्त्रा दुहिता वा नाविविक्तासनो भवते । 
बलवानिन्द्रियग्रामो विद्वासंसपि कर्षति ।। 
श्रीमद्भावगत, स्कंध : ९, अध्याय १९, श्लोक : १६ आणि १७. 

या श्लोकांचा अर्थ असा  : 
लैंगिक सुखाची तहान ही सर्व दु:खांचे उगमस्थान आहे. मंदबुद्धीचे लोक या तृष्णेचा त्याग करू शकत नाहीत. शरीर म्हातारे होते, पण लैंगिक सुखाची तृष्णा नित्य नवी होत जाते. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, त्याने लैंगिक तृष्णेचा त्वरित त्याग करायला हवा. ।।१६।। 
आपली माता, बहीण आणि कन्येसोबतही एकांत स्थानी एका आसनावर बसू खेटून बसू नये. इंद्रिये बलवान असतात. मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात. ।।१७।। 

शरीर म्हातारे झाले तरी शरीर सुखाची तहान म्हातारी होत नाही, उलट तिला नवे धुमारे फुटत राहतात, हा पहिल्या श्लोकातील उपदेश आसाराम बापू यांच्या वयाच्या पाश्र्वभूमीवर प्रभावी ठरावा. आसाराम यांचे वय आता ७१ वर्षांचे आहे. १६-१७ वर्षांच्या मुलीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इंद्रिये बलवान असतात, मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात, हे खरेच नाही का?