Sunday 9 February 2014

संसद हे मंदिर होते

  • सूर्यकांत पळसकर। दि. १२ (औरंगाबाद)
रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. त्यांची विशेष मुलाखत.... प्रसिद्धी : लोकमत , रवि, १३ मे २०१२ .
रिशंग किशिंग : पहिल्या
लोकसभेचे सदस्य
नाव रिशंग किशिंग. वय वर्षे ९१. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही कार्यकाळातील पाच पिढय़ांचे राजकारण पाहिलेले अनुभव समृद्ध व्यक्तिमत्व. तथापि, एवढीच त्यांची ओळख नाही. ते आहेत, पहिल्या लोकसभेचे सदस्य. आजही ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मनिपूरचे ते प्रतिनिधित्व करतात. संसदेचे संपूर्ण ६0 वर्षांचे कामकाज पाहणारे आणि अनुभवणारे असे हे आधुनिक भारताचे भीष्म पितामह होय. नवी दिल्लीतील तालकटोरा रोडवरील साध्याशा घरात त्यांचा निवास आहे. भिंतीवर त्यांच्या लग्नाचे एक छायाचित्र दिसते. साधासाच सोफा आणि रोपांच्या काही कुंड्या बैठकीच्या खोलीला घनगंभीर वातावरण निर्माण करून देतात. संसदेच्या विषयीच्या त्यांच्या आठवणी पावन आणि पवित्र आहेत. आज राजकारणाचा आखाडा बनलेली संसद पाहिली की, त्यांना वेदना होतात. आमच्या पिढीतील लोकांच्या दृष्टीने संसद ही नुसतीच इमारत नव्हती. ते मंदिर होते. लोकशाहीच्या या मंदिरात आम्ही श्रद्धनेच पाऊल ठेवायचो, असे ते भक्तिभावाने नमूद करतात. रिशंग कैशिंग यांच्याशी केलेली ही बातचीत.

पहिल्या लोकसभेत काम करण्याचे अत्यंत दुर्मिळ असे भाग्य तुम्हाला लाभले आहे. पहिल्या लोकसभेतील कामकाज आणि आताच्या लोकसभेतील कामकाज यात कोणता फरक तुम्ही पाहता?
- मतभेद हे राजकारणाचे अविभाज्य अंग असते. आज जसे मतभेद आहेत, तसेच ते तेव्हाही होतेच. परंतु, काळाच्या ओघात शिस्त हरवली आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही.

स्वातंत्र्य लढय़ातील दिग्गज नेत्यांसोबत तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल सांगा.
- मी जेव्हा लोकसभेत दाखल झालो. तेव्हा स्वातंत्र्य लढय़ातील सर्व मोठी नेतेमंडळी लोकसभेत होती. देशाचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाल नेहरू, पहिले लोकसभाध्यक्ष जी. व्ही. मावळंकर, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, एन. सी. चटर्जी, आचार्य कृपलानी अशी थोर थोर मंडळी त्यात होती. लोकसभेत प्रवेश करताच मंदिराच्या गाभार्‍यात आल्यासारखे वाटायचे. तसेच गांधीटोपी घातलेले लोकसभाध्यक्ष मंदिरातील संतासारखे वाटायचे. 

लोकसभेत वादाचे प्रसंग तेव्हाही आले असतीलच..
- वादाशिवाय राजकारण नसते. मला आठवते. राज्यांची निर्मिती केली जात होती, तेव्हा लोकसभेत वादळी चर्चा व्हायची. पण त्यात कधी आरडा ओरडा झाल्याचे, गोंधळ झाल्याचे मला आठवत नाही. हा विषय अत्यंत संवेदनक्षम होता. अनेक नेत्यांच्या, खासदारांच्या प्रदेशांचे तुकडे झालेले होते. अनेकांचा प्रदेश इतर राज्यांना जोडला गेलेला होता. गोंधळ करण्यासाठी त्यांना अत्यंत ठोस कारण होते. तरीही याविषयावरच्या सर्व चर्चा शांततेतच पार पडल्या. आता असे चित्र दिसतच नाही. थोडक्या थोडक्या गोष्टींवरून गोंधळ होतात. कामकाज बंद पडते. 

तेव्हा लोकसभाध्यक्ष सदस्यांना कसे शांत करीत ? 
- अध्यक्षांच्या कोणत्याही निर्णयाचा सदस्य आदर करीत. सर्वच सदस्य स्वच्छ ह्रदयाचे होते. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम होते. सभागृहात वाद झडल्यानंतर आम्ही एकत्र यायचो. सभागृहातील चर्चा आणि भाषणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकली जायची. आताच्या सारख्या शाऊटिंग ब्रिगेड्स तेव्हा सभागृहात नव्हत्याच. घोषणाबाजी आणि वेलमध्ये धावण्याचे प्रकारही अजिबात नव्हते.

तुम्ही राजकारणात कसे काय आलात?
- १९४९ साली मी कोलकत्यातील सेंट पॉल्स कॅथेड्रल कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलो. फायरब्रँड समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या ध्येयवादाने मला प्रेरणा दिली. मी त्यांच्या सोश्ॉलिस्ट पार्टीत सामील झालो. १९५२ साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली. पार्टीने मला बाह्य मनिपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही निवडणूक जिंकून मी लोकसभेत दाखल झालो. 

अलिकडे झटपट पक्ष बदलणारे नेतेही दिसतात. तुमच्या काळीही ते होते का?
- बदल तेव्हाही होत पण ते तात्विकच असत. त्यात स्वार्थ नसे. मी स्वत:ही पक्ष बदलला होता. १९६२ साली मी दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेलो. ही निवडणूकही मी सोश्ॉलिस्ट पार्टीकडूनच जिंकली. तथापि, त्याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले. माझे मणिपूर हे राज्य चीन सीमेवर असल्यामुळे त्याला जबर धोका होता. अशा परिस्थितीत सरकारचे हात मजबूत असायला हवेत, असे मला जाणवले. त्यामुळे मी तडक प. नेहरूंकडे गेलो. मला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी ती मान्य केली. 

तुम्ही इंदिरा गांधींसोबतही काम केले आहे. महिला पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन कसे कराल?
इंदिराजी आपला शब्द पाळित. त्या वचनाच्या पक्क्या होत्या, असे त्यांचे एका ओळीतील वर्णन मी करीन. जनता पक्षाचे सरकार असतानाची गोष्ट आहे. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मनिपुरात एक खोटा खटला दाखल करण्यात आला होता. त्यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना इंफाळला बोलावण्यात आले. तेथे त्यांना तीन दिवस कैदेत राहायचे होते. त्या आल्या. तिकिटांची व्यवस्था करण्याचे काम त्यांनी मलाच सांगितले होते. त्यांनी मनिपुरात जाऊ नये, असे लोकांचे म्हणणे होते. त्या ज्या हॉटेलात थांबल्या होत्या, दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना मनिपूरला जायचे होते. त्यांनी आदल्या संध्याकाळी लोकांना सांगितले की, मी येथेच काही दिवस थांबणार आहे. सकाळी त्या मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडल्या आणि थेट विमानतळावर गेल्या. तेथेही लोक होते. विमानाजवळ येताच त्यांनी अक्षरश: साडी खोचली आणि त्या विमानाच्या दिशेने पळत सुटल्या. 

तुमच्या समाजवादी नेत्यांविषयी काय सांगाल?
जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. हे खरोखरच महान नेते होते. त्यांचेही माझ्यावर आतोनात प्रेम होते. 

तुमचे वय आता ९१ वर्षे झाले आहे, तरीही तुम्ही उत्साहाने काम करता. तुम्हाला ही ऊर्जा कोठून मिळते?
मी स्वत:ला लोकांसाठी सर्मपित केले आहे. लोकांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. कर्तव्याची ही जाणीव मला कार्यप्रवण करते. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मला या देशाची सेवा करायची आहे.

No comments:

Post a Comment