Thursday, 6 February 2014

सिंगूरच्या ‘ग्राऊंड झीरो'वर

  • सूर्यकांत पळसकर 

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …
सिंगूरचे  रेल्वे स्टेशन.
"… पृथ्वी कोठून आली याच्याशी शेतक-यांना काही कर्तव्य नाही! तिच्या जमिनीची वाटणी कशी झाली हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्थिर असो की फिरत, त्यामुळे शेतक-यांच्या जीवनात काय फरक होणार? तुम्हाला हवी तर पृथ्वी लटकावून ठेवा,  नाही तर खिळ्याने ठोकून टाका! शेतक-यांच्या दृष्टीने ती जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे..."  मॅक्झिम गोर्कीची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई'मधील हा उतारा. रशियातील बोल्शेविक क्रांतीचे हुंकार म्हणजे ‘आई'! या कादंबरीतील रिबिन नावाचे बंडखोर पात्र एके ठिकाणी वरील उद्गार काढते. डाव्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क रिबिनच्या या वक्तव्यात आहे. सिंगूरचा दौरा करीत असताना असे असंख्य रिबिन भेटले. त्यांच्या तोंडूनही असाच अंगार बाहेर पडत होता.  ‘शेतक-यांच्या दृष्टीने जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे'  टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूरला का उभा राहू शकला नाही, याचे उत्तर या एका वाक्यात मिळते.

सिंगूर येथील टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर असलेला केळीचा फड.
घरावर सावली धरणारी किमान २० फूट उंचीची अशी केळीची झाडे
मी प्रथमच पाहिली. 
प. बंगालमध्ये डावा विचार इतका खोलवर रुजलाय की, राज्याच्या कोणत्याही भागातील मूठभर माती घेऊन कानाला लावली, तर "लाल सलाम, लाल सलाम" असे शब्द कानी पडतील! सिंगूरमधला अनुभवही असाच होता. गावात पोहोचलो तेव्हा घराघरांवर फडफडणा-या लाल बावट्यांनी स्वागत केले. ग्रामीण पेहरावाचे छोटेसे गाव. रापलेला काळा रंग आणि आयुष्यभराच्या कष्टाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणारी माणसे. नॅनो प्रकल्पाबद्दल राग जसा येथे आढळून आला तसाच हा प्रकल्प उभा राहू शकला नाही या बाबत खंत आणि विषादही आढळून आल्या. टाटांचा प्रकल्प सिंगूरच्या नावे ओळखला जात असला तरी सिंगूर या गावापासून किमान अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर, कोलकता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प आहे. महामार्गाला लागताच आजूबाजूची पिके शेतीचा सुपीक पोत सांगायला सुरुवात करतात. टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर केळीचा मोठा फड डोलत होता. केळीच्या झाडांची उंची किमान २० फूट होती. घरावर सावली धरणारी केळीची झाडे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. असली शेती कोणता शेतकरी सहजासहजी सोडणार? गोर्कीची आठवण मला येथेच पहिल्यांदा झाली. नंतर या ना त्या कारणांनी गोर्की आठवतच राहिला.

सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाच्या
 प्रवेशद्वारावरील कडक बंदोबस्त. 
नॅनो प्रकल्पासाठी जवळपास १ हजार हेक्टर जमीन प. बंगाल सरकारने अधिगृहित केली होती. सिंगूर परिसरातील १० ते १५ गावांच्या शिवारातली ही जमीन आहे. येथे टाटांचा नॅनो प्रकल्प अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभा आहे. आता गेटवर झाडे-झुडपे वाढली आहेत. वातावरणात निर्जीवता आणि विषण्णता  जाणवली. शस्त्रधारी सुरक्षा जवानांचाच काय तो वावर. मुख्य दरवाजावर आम्हाला अडविण्यात आले. ‘आत जाण्यास कोणालाच परवानगी नाही', असे सांगून त्यांनी बंदुकीचा दस्ता उगाचच कुरवाळला. आम्ही काय ते समजलो.

टाटाची कमाई : सायकल स्टँड!
हा प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे जमिनी देणा-या गावांची दुर्दशा झाली आहे. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. आम्ही एका रिक्षामधून दोबंडी, बाबूरबेरी, बेराबेरी यांसारख्या काही गावांना भेटी दिल्या. सर्वच ठिकाणचे वातावरण सुतकी होते. प्रकल्प उभा राहिला नसला, तरी जमिनी टाटाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. कसायला जमिनी नाहीत आणि हाताला कामही नाही. ‘तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोटापाण्यासाठी अनेक लोकांनी गावे सोडली. जे लोक गावांतच थांबले ते कामासाठी कोलकत्यात जातात. या गावांपासून सिंगूर रेल्वे स्टेशन सरासरी ५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. तिथपर्यंत लोक सायकलीने जातात. सायकली सिंगूरमध्ये पार्किंग स्टँडवर लावतात आणि रेल्वेने कोलकत्याला पोहोचतात. सिंगूर गावात सायकली सांभाळणारे असे किमान ५० पार्किंग स्टँड उभे राहिले आहेत. टाटा प्रकल्पाची कमाई काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा लोक या स्टँडकडे बोट दाखवतात.

भाकपाच्या हुगळी जिल्हा
कमिटीचा सदस्य माणिक दास
भाकपाच्या हुगळी जिल्हा कमिटीचा सदस्य माणिक दास याचा स्वत:चा एक स्टँड सिंगूर स्टेशनजवळ आहे. त्याची भेट झाली. त्याच्या बोलण्यात आक्रमकता होती. विषाद होता. त्याने सांगितले की, "या भागात आमची (भाकपा आणि माकपा) ताकद होती. इथल्या बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात होत्या. तरीही आंदोलन आमच्या हातून निसटले. अधिगृहित करण्यात आलेल्या जमिनीवर १५ ते २० हजार लोकांची उपजीविका अवलंबून होती. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोक-यांची हमी दिली गेली नाही. प्रत्यक्ष टाटाच्या साईटवर काम करणारे मजूरही कंत्राटदारांनी बाहेरून आणलेले होते. जमिनी गेल्या, हाताला कामही नाही, त्यामुळे लोक बिथरले."

लढायचे कोणासाठी?
डावे कार्यकर्तेही नॅनोविरोधातील आंदोलनात सहभागी होते, असे अनेकांनी येथे सांगितले. हे कार्यकर्ते कोण, हे सांगायचे धाडस मात्र कोणीही दाखविले नाही, तसेच हे कार्यकर्तेही उघडपणे समोर आले नाहीत. एक छुपी दहशत येथे दिसून आली. माकपाच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा झाली.  "तुमचे स्वत:चे कार्यकर्ते का विरोधात गेले", असा थेट प्रश्न मी त्याला विचारला. तो म्हणाला, ‘त्यांच्याही जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. लढायचे कोणासाठी, कुटुंबासाठी की सरकारसाठी, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी कुटुंबाची निवड केली."

कुळांचा प्रश्न
माकपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, एके काळी जमिनदार असलेल्या श्रीमंतांच्या जमिनी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जमिनी स्थानिक कुळे कसतात. टाटासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला मूळ मालकांना मिळाला. कुळे निराधारच राहिली. आंदोलन झाले, तेव्हा ही कुळे लढण्यात आघाडीवर होती. कारण त्यांचे सर्वस्व गेले होते.

सिंगूरच्या गावकुसाला असलेल्या बटाट्याच्या
चाळीत काम करणारे मजूर. 
बटाट्याच्या चाळीतला संघर्ष
या परिसरात बटाटा मोठ्या प्रमाणात पिकतो. सिंगूरच्या गावकुसाला बटाट्यांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. या चाळींवरही कुळेच राबतात. आम्ही या चाळींची छायाचित्रे घेतली. हे कळताच कंत्राटदारांचे लोक धावून आले. त्यांनी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मदतनिसाने परिस्थिती निभावून नेली. ‘माझा पाहुणा आहे. हौस म्हणून फोटो काढले',  अशी थाप त्याने मारली. बटाट्याच्या चाळींमध्ये कुळांना बेठबिगारासारखे राबवून घेतले जाते, असे भाकपाचा एक कार्यकर्ता गौतम बॅनर्जी याने सांगितले.

फक्त नॅनोलाच विरोध का?
‘नॅनो फियास्को'नंतर प. बंगालच्या राजकारणाचा गुरुत्त्वमध्य सिंगूरला हलला आहे, असे या दौ-यात जाणवले. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. सिंगूर, नंदिग्राम आणि लालगड येथील संघर्षात या निवडणूक निकालाचे मूळ आहे, असे कोलकत्यात तज्ज्ञांशी बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर भाकपाचे प्रदेश सेक्रेटरी मंजू मुजुमदार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सिंगूरच्या परिसरात अनेक उद्योग आहेत. नॅनो प्रकल्पापासून अवघ्या १०-१५ कि.मी. अंतरावर बिर्लांचा ‘हिंदुस्थान मोटर्स' हा कारखाना आहे. तो सुखेनैव चालू आहे. नॅनोला केवळ राजकारण म्हणून विरोध झाला. उद्योगजगतातील टाटांच्या विरोधकांनीही नॅनोविरोधी आंदोलनाला रसद पुरविली"
सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाचे
सुरू न होऊ शकलेले पॉवर स्टेशन. 
प. बंगालात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. तुमची सलग सत्ता कायम राहील असे वाटते का, असा प्रश्न विचारला त्यावर ठामपणे ‘होय' असे उत्तर देण्याचे मंजू मुजुमदार यांनी टाळले. ते म्हणाले, "क्रांती हे आमचे ध्येय आहे. निवडणूक ही क्रांतीच्या मार्गातील एक लढाई आहे. ती आम्ही लढू".

भाकपाचा ‘होल टाईमर' गौतम बॅनर्जी.
अशा कार्यकत्र्यांच्या बळावरच
प. बंगालमधील  डाव्यांचे साम्राज्य अद्याप
टिकून  आहे. गौतम सोबत होता, म्हणून
 सिंगूर परिसरात मला फिरता आले. 
जमिनींचे काय होणार?
‘दीदींची (ममता बॅनर्जी) सत्ता आल्यावर आम्हाला जमिनी परत मिळणार आहेत", असे प्रकल्पग्रस्त लोक छातीठोकपणे सांगत होते. याविषयी मुजुमदार यांना छेडले. त्यावर ते म्हणाले, "तृणमूलवाल्यांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. १८९४ सालच्या भूसंपादन कायद्यान्वये ही जमीन अधिगृहित करण्यात आली आहे. या कायद्यात जमीन परत करण्याची तरतूदच नाही. जमिनी परत करायच्या असतील, तर केंद्र सरकारला कायदा बदलावा लागेल, तसेच आता जमिनीचे सपाटीकरण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. ही जमीन शेतीसाठी कशी वापरणार. कोणाची जमीन कुठे होती हे कसे शोधणार"

 प. बंगाल सरकारने नॅनो प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचे अखेर होणार तरी काय, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. या संपूर्ण दौ-यात त्याचे उत्तर मात्र कोठेच मिळाले नाही. प. बंगालमधील डाव्यांच्या सरकारचे काय होणार हा आणखी एक प्रश्न कोलकता सोडताना मनात येऊन गेला. त्याचे ठोस उत्तर हाती लागले नसले, तरी अंदाज मात्र येत होता. डाव्यांच्या या गडाला मोठे खिंडार पडले आहे. खिंडार पडले की, गड पडायला फार वेळ लागत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. 

No comments:

Post a Comment