Friday, 2 May 2014

मोहन अब्दूल फर्नांडिस

दुपारी फटफटीवरून घरी परतत होतो. उन्ह असल्यामुळे लवकर घरी पोहोचण्याची घाई होती. एम-२ च्या कोपर्‍यावर एका माणसाने ‘लिफ्ट प्लिज' म्हणून हात दिला. मी गाडी थांबवली. ‘प्लिज ड्रॉप मी अ‍ॅट नेक्स्ट कार्नर', तो इंग्रजीत बोलला. त्याचे उच्चार स्पष्ट आणि सुटे होते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. औरंगाबादसारख्या छोटा जीव असलेल्या शहरात रस्त्यावर इंग्रजी बोलणारा गृहस्थ भेटणे ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे. 

त्याचा पेहराव मळका पण इंग्रजी होता. पांढर्‍या शर्टचा रंग खाकवट झाला होता. एवढ्या उन्हातही त्याने टाय बांधलेला होता. कोट मात्र काढून हातावर लटकावला होता. डोळ्यांवर जुन्या वळणाचा जाड फ्रेमचा चष्मा होता. चष्म्याच्या दांड्या कानाकडे थोड्या बारीक होत गेल्या होत्या. मिशा बर्‍याचशा फेंदारलेल्या होत्या. केसांत काळे आणि पांढरे अशी बेरड होती. केसांत तेल लावलेले होते. चेहरा घामेजलेला आणि रापलेला होता. 

मी काही न बोलता त्याला फटफटीवर बसवून घेतले. किलोमीटरभर अंतर कापल्यानंतर त्याला उतरावयाचे असलेल्या कोपर्‍यावर त्याने ‘प्लिज स्टॉप' म्हणून गाडी थांबवायला लावली. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. तो हातावरचा कोट सांभाळत उतरला. स्पष्ट आणि सुट्या शब्दांत ‘थँक यू' म्हणाला. जाण्यासाठी वळण्यापूर्वी ‘यूवर गुड नेम प्लिज' असे म्हणत त्याने मला नाव विचारले. मी नाव सांगितले. नंतर ‘व्हॉट डू यू डू' म्हणत उद्योगही विचारला. ‘मी पत्रकार आहे', असे मी म्हणालो. ‘ओऽऽ आयसी' असे म्हणत त्याने भुवया उंचावल्या. मग माझ्या पेपरचे नाव विचारून घेतले. सारे संभाषण तो इंग्रजीतूनच करीत होता. 

आता याने एवढी चौकशी केली आहे, तर आपणही काही तरी बोलून निरोप घ्यावा म्हणून त्याला नाव विचारले. तो म्हणाला, ‘मोहन अब्दूल फर्नांडिस.'

त्याचे नाव ऐकून मी त्याच्याकडे चमकून पाहिले. तो मात्र निर्विकार होता. पूर्वीच्याच स्पष्ट आणि सुट्या शब्दांत तो म्हणाला, ‘पीपल ऑलवेज फिल पझल्ड. येस, इट इज रिअली अ स्ट्रेंज नेम. मोहन हे माझे नाव आहे. अब्दूल हे माझ्या वडिलांचे नाव आहे... आणि फर्नांडिस हे आमचे आडनाव आहे.'

‘असे कसे', मी कुतुहलाने विचारले.

तो सांगू लागला, ‘एक्झाक्टली माझी आई हिंदू होती. तिने मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. पण दोघांनी एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ केली नाही. माझा जन्म झाल्यानंतर आईने माझे नाव मोहन ठेवले. मी ८ वर्षांचा असताना आम्ही सारेच ख्रिस्ती झालो. पण आम्ही आमची नावे बदलली नाही. फक्त आडनाव बदलले. म्हणून माझे नाव मोहन अब्दूल फर्नांडीस असे झाले.'

तो मराठीही स्पष्ट आणि सुट्या शब्दांत बोलत होता. त्याची शब्दांवर पकड होती. मात्र, चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते. इतका निर्विकार मनुष्य मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्याशी बोललेच पाहिजे, असे मला वाटले. माझी गाडी अजून चालूच होती. मी गाडी बाजूच्या झाडाखाली घेऊन बंद केली आणि स्टँडवर लावली. मग आम्ही बोलू लागलो. 

‘तुम्ही काय करता?', मी विचारले.
‘सध्या बेकार आहे. ते कोपर्‍यावरचे दुकान दिसतेय ना, तिथे मुलाखतीसाठी चाललो आहे.' त्याने बोट वळवून दुकान दाखविले. ते फर्निचरचे दुकान होते. त्याचा मालक माझ्या ओळखीचा होता. त्याच्याकडून आम्ही बरीच खरेदी केलेली होती. 
‘फर्निचरच्या दुकानात तुम्ही काय काम करणार?'
‘नो मॅन. एव्हरी वर्क हॅज इटस ओन स्टँडर्ड. माझ्या गरजा फार कमी आहेत. मी एकटाच राहतो. स्वत:च स्वयंपाक करतो. लष्कराने मला ही शिस्त दिली आहे.'

‘लष्कराने म्हणजे?'
‘मिलिटरी. मी मिलिटरीत होतो.' 

कुठल्याही कोनातून पाहिले तरी तो लष्करी सेवेतला माणूस वाटत नव्हता. हा नक्की खोटं बोलत असावा, असे मला वाटले. तो सांगत होता, ‘मी लष्करात धर्मगुरू होतो. दौंडच्या कॅम्पात मी अनेक वर्षे काम केले.'
‘लष्करात धर्मगुरू कसे काय?'
‘लष्करातील जवानांना आपापल्या धर्मानुसार प्रार्थना आणि इतर कर्मे करता यावीत यासाठी व्यवस्था असते. मी ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून तेथे होतो. आय वाज देअर फॉर ख्रिश्चन रेग्यूलर्स.'

ही माहिती मला नवीन होती. लष्करात अशी काही सोय आहे, याची मला माहिती नव्हती. आता माझ्यातील पत्रकार डोकावू लागला होता. मी त्याला विचारले.

‘हॅव यू एव्हर वर्क्ड फॉर मिशनरीज?'
‘एस. आय अ‍ॅम वर्किग फॉर मोअर दॅन २० इअर्स नाऊ.'
‘व्हाय आर यू डुइंग धिस. व्हॉट मेड यू टू प्रॉसेलिटाईज नेटिव्हज?'
‘सॉरी..?'
‘व्हॉट मेड यू टू ट्राय फॉर कन्हर्जन्स?'
‘नो. वुई डोन्ट मेक कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन ईज व्हेरी अग्ली वर्ड. प्रॉपर वर्ड इज प्रोपागेशन. प्रोपागेशन म्हणजे प्रसार.'
‘धर्मांतर हा खरोखरच कुरूप शब्द आहे. पण धर्मांतर करण्याची कृती त्यापेक्षाही कुरूप आहे.' 
‘तुमचे म्हणणे खरे आहे.'
‘मग तुम्ही धर्मांतरे का करता?'
‘मी सांगितले ना, आम्ही धर्मांतरे करीत नाही. आम्ही लोकांना फक्त सत्य सांगतो. सत्यासारखी पवित्र गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही' 
‘ सत्य काय आहे.'
‘सत्य हेच आहे की, येशू हा तारक आहे. त्याला शरण गेल्यानेच मनुष्याचे तारण होणार आहे.'

मोहन अब्दूल फर्नांडीस बोलत होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता. शब्द मात्र ठाम आणि निश्चित होते. मी आता थक्क झालो होतो. 

(मोहन अब्दूल फर्नांडीस याच्यासोबत झालेल्या पुढील चर्चेचा वृत्तांत दुसर्‍या लेखात.)

2 comments: