Thursday, 30 January 2014

गांधी भाय!

अफ्रिकेतील कुली लोकेशन्स!

संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस' ने गांधीविचाराचा नवा अवतार जगापुढे पेश केला. एका ‘भाई'ची गांधीगिरी आपण या चित्रपटात पाहिली. पण गांधीजींनाही खरोखरच एकदा ‘भाई' व्हावे लागले होते. याची कहाणी रोचक तशीच हृदयद्रावक आहे. काळ आपले काम करीत असतो. भारतीय समाजाने हजारो वर्षे दीन-दलितांना अस्पृश्य ठेवले. याची किंमत भारतीयांना इंग्रजी राजवटीत चुकवावी लागली. उच्चवर्णीय भारतीय दलितांना अस्पृश्यतेचे चटके देत होते. गोरया इंग्रजांच्या दृष्टीने संपूर्ण भारतीय समाजच अस्पृश्य होता. गांधीजी दक्षिण अफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना या अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. दक्षिण अफ्रिकेत भारतीयांच्या वसाहती वेगळ्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यांना गोरयांच्या वसाहतीत घर मिळत नसे. या भारतीय वस्त्यांना 'कुली लोकेशन्स' म्हटले जाई. कुली म्हणजे हमाल. असेच एक कुली लोकेशन जोहान्सबर्गमध्ये होते. तेथे भारतीयांनी ९९ वर्षांच्या लीजवर प्लॉट खरेदी केले होते. पुढील काळात जोहान्सबर्गमध्ये येणारे भारतीय याच लोकेशनमध्ये एकवटत गेले. जागा मात्र तेवढीच राहिली. परिणामी येथील घरांत लोक जनावरांसारखे कोंबून कोंबून भरले गेले. ही वसाहत महानगरपालिकेच्या दृष्टीने अस्तित्वात नव्हतीच . तिथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. गांधीजींनी येथे राहणारया लोकांची तुलना निर्जन बेटावर अडकून पडलेल्या रॉबिन्सन क्रुसोशी केली आहे.१

कमाई न करणारा बॅरिस्टर
महानगरपालिकेच्या ‘क्रिमिनल निग्लिजन्स'मुळे जोहान्सबर्गच्या या कुली लोकेशनची अवस्था अमानवी झाली होती. या वसाहतीला सुविधा पुरविण्याऐवजी महानगरपालिकेने ही वसाहन राहण्यास अयोग्य ठरवून उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक प्रशासनाकडून तसा आदेशही मिळविला. महात्मा गांधी जोहान्सबर्गमध्ये आले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर आली. त्यांनी या अस्पृश्य भारतीयांसाठी न्यायालयात खटला लढविण्याचा निर्णय घेतला. गांधीजी बॅरिस्टर होते, तरी पैसे कमावणे हा हेतू त्यांनी कधीच मनात ठेवला नाही; त्यामुळे त्यांनी नाममात्र फीसमध्ये हे खटले चालविले. हा खटला लीज धारकाने जिंकला तर कायद्यानुसार लीजधारकास नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च मिळणे बंधनकारक होते. खटला जिंकल्यास पालिकेकडून मिळणारा न्यायालयीन खर्च लीज धारकांनी गांधीजींना देण्याचे मान्य केले. तसेच खटल्याचा निकाल काहीही लागला तरी १० पाऊंड गांधीजींना ते देणार होते. फीस अत्यंत कमी असल्यामुळे सर्व लीजधारकांची प्रकरणे गांधीजींकडेच आली. सुमारे ७० खटले गांधीजींनी चालविले. त्यापैकी फक्त एक खटला ते हरले. बाकीचे सर्व जिंकले त्यामुळे त्यांना १,६०० पाऊंडांची भरघोस कमाई झाली. त्यातला अर्धा पैसा गांधीजींनी याच कुली लोकेशनला हॉस्पिटल आणि इतर सोयींसाठी दिला.

गांधीजींच्या या निरिच्छ वृत्तीमुळे या सर्वांनाच गहिवरून आले. त्यांच्यात केवळ वकील आणि पक्षकार असे औपचारिक नाते राहिलेच नव्हते. गांधीजी त्यांच्यातीलच एक बनून गेले होते. या लीजधारकांपैकी एक होते अब्दुल्ला सेठ. खटल्याच्या काळात ते गांधीजींना साहेब कधीच म्हणत नसत. पण नुसतेच 'गांधी' म्हणून अवमानितही करीत नसत. ते त्यांना ‘गांधी भाय' म्हणत. हळूहळू सगळेच लीजधारक गांधीजींना 'भाई' म्हणू लागले. गांधीजी म्हणतात, मी अशा प्रकारे येथील भारतीयांचा ‘भाई' झालो.२

स्वतंत्र भारतातील बिहारी आज पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोप-यात जाताना दिसतात. मुंबईत बिहारींची संख्या खूप मोठी आहे. मुंबईत दक्षिण भारतीयांची संख्याही मोठी आहे. या लोकांना हाकलून लावण्यासाठी ठाकरयांची मुंबईतील हिंसक आंदोलने सर्वज्ञात आहेत. योगायोग पाहा जोहान्सबर्गच्या कुली लोकेशनमध्ये राहणारया भारतीयांत बहुतांश लोक बिहारी होते. तसेच काही जण दक्षिण भारतीय होते! जोहान्सबर्गच्या प्रशासनाने त्यांना हाकलण्याच्या प्रयत्न केला, तर गांधीजींनी त्यांना बेघर होण्यापासून वाचविले. ठाकरे आणि गांधी यांच्यातील हा फरक आहे.

- सूर्यकांत पळसकर, औरंगाबाद.

Foot Notes
1. My Experiments With Truth : M. K. Gandhi. Publisher : Cross Land Books, new dehli. 5 Th Repint feb 2010. Part : 4. Chapter : 14. Page : 302.

2. My Experiments With Truth : M. K. Gandhi. Publisher : Cross Land Books, new dehli. 5 Th Repint feb 2010. Part : 4. Chapter : 14. Page : 303.

No comments:

Post a Comment