Wednesday 8 January 2014

ट्रेन टू कोलकता

माणूस पायावर नव्हे, पोटावर चालतो!

  • सूर्यकांत पळसकर

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …

कोलकत्याचा मानबिन्दू हावडा पूल. हावडा स्टेशनवरील
 हॉटेलच्या खिडकीतून टिपलेले छायाचित्र.
 ‘वंग आमुचा खरा सहोदर' ही काव्यपंक्ती लहानपणी केव्हा तरी कानांवरून गेलेली. प. बंगालच्या दौ-यासाठी रेल्वेत पाऊल ठेवले तेव्हा ही ओळ अचानक ओठांवर आली. स्वातंत्र्यपूर्व काळात दोन्ही राज्यांतील क्रांतिकारी चळवळ आणि सामाजिक सुधारणांची चळवळ, अशी दुहेरी पाश्र्वभूमी या काव्यपंक्तीला आहे; मात्र गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत काळ बदलला. कोलकत्याच्या हावडा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ही काव्यपंक्ती अजूनही आपला अर्थ टिकवून आहे का, या प्रश्नावर येऊन ठेचकाळलो. पुढे संपूर्ण दौ-यात ठेचकाळतच राहिलो.

'सैन्य पायावर नव्हे, तर पोटावर चालते', असे पूर्वी म्हटले जायचे. हा नियम आता सामान्य माणसालाच जास्त लागू पडतो. ‘माणूस पायावर नव्हे पोटावर चालतो,' हे  कोलकत्याच्या प्रवासात जाणवले. गीतांजली एक्स्प्रेसच्या एस-६ डब्यातून प्रवास करीत होतो. डब्यात बंगाल्यांची संख्या अधिक होती. त्यातही पांढरपेशे अधिक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नोक-या करणारे हे लोक. माझ्या समोरच्या सीटवर औरंगाबादेतील गादिया विहारमध्ये राहणारे एक कुटुंब होते. मुंबईत नोकरी करणारे नीरज घोष गँगवे जवळच्या आडव्या सीटवर होते. एक कुटुंब भुसावळहून रेल्वेत चढले होते. पोटापाण्यासाठी दोन हजार कि.मी.पेक्षाही जास्त प्रवास करून हे लोक महाराष्ट्रात आले होते; पण घराची, गावाची ओढ सुटलेली नव्हती. उत्तर दिवाळीचा मोसम होता. सुट्या काढून  ते आपल्या गावी चाललेले होते. बंगालातच रोजगार मिळाला असता, तर हे लोक महाराष्ट्रात आले असते? कदाचित नाही.

बदल हवा बदल
गाडीने महाराष्ट्र सोडला. दिवस केव्हाच बुडाला होता. प्रवासी आडवे झाले होते. मीही माझ्या बर्थवर लवंडलो होतो. तरुणांचा एक गट मात्र दंगामस्ती करीत जागा होता. त्यांच्या गटात दोन तरुणीही होत्या. ते बंगाली आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. सहज चौकशी केली तेव्हा कळले की, ते बी.पी.एड.चे विद्यार्थी असून, वर्ध्याच्या चिंतामणी बी.पी.एड. कॉलेजात ते शिकत होते. दिवाळीच्या सुट्यांत ते घरी चालले होते. त्यांच्यातलाच एक सनातन बर्मन. उत्तर बंगालातील दक्षिण दिनाजपूरचा. आयुष्याची स्वप्ने त्याच्या नजरेत होती; पण मनात साशंकता होती. साध्या बी.पी.एड.च्या पदवीसाठी इतक्या दूर का आलास, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ‘आमच्या उत्तर बंगालच्या सहा जिल्ह्यांत फक्त तीन बी.पी.एड. कॉलेजेस आहेत. तेथे प्रवेश मिळाला नाही.' बंगालात शिक्षण आणि आरोग्याची फार दुरवस्था झाली आहे, अशी त्याची तक्रार होती. आम्ही शिकायला महाराष्ट्रात आलो, तसे इतर राज्यांतील विद्यार्थी बंगालात येतील, तो ‘शोनार दिवस' असेल, असे स्वप्न सनातनने बोलून दाखवले. प. बंगालातील डाव्या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरएसपीचा तो समर्थक होता. क्षिती गोस्वामी हा त्याचा आवडता नेता; पण त्याला ममता बॅनर्जींबद्दल आस्था होती. संपूर्ण बंगालच्या नेत्या म्हणून वावरण्यात ममता कमी पडतात. रेल्वेमंत्री एवढीच त्यांची ‘इमेज' आहे, असे मत त्याने व्यक्त केले. ‘बदल हवा, त्याशिवाय बंगालचा उद्धार होणार नाही,' असे तो कोलकत्यात उतरताना म्हणाला. 

जुन्यांनो दूर व्हा!
सनातन बर्मन बोलण्यात चतुर होता. राजकारणात जाशील का, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला- ‘विचार केला नाही; पण नवीन नेतृत्व उदयास येत नाही, अशी एक तक्रार नेहमी कानावर येते. माझे जुन्यांना एवढेच सांगणे आहे की, तुम्ही बाजूला व्हा, नवे नेते आपोआप तयार होतील!' सनातनचे वक्तव्य म्हणजे डाव्यांसाठी इशारा आहे, असे मला वाटून गेले. 

‘बिहारी' कोलकता
मुनसिन्ग यादव. मूळचा बिहारातील मधुबनीचा
असलेला मुनसिन्ग १९७० सालापासून कोलकत्यात
आहे. असे हजारो बिहारी लोक कोलकत्यात
पोटापाण्यासाठी आलेले आहेत.
कोलकत्यात प्रवास करीत असताना मुनसिंग यादव भेटला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून आलेला. १९७० साली पोटापाण्यासाठी घर सोडले. कोलकत्यात टॅक्सी चालवतो. ७७ पर्यंत जुटाच्या कारखान्यात नोकरी करायचा. कारखाना बंद पडला, तेव्हापासून टॅक्सीचे स्टिअरिंग हाती आले. गावाकडे पत्नी, ग्रॅज्युएशन करणारा मुलगा, दीड बिघा शेती आणि १ बैल आहे. तो म्हणाला, ‘बिहारातले लोक पोटामागे धावताना भारतभर पांगले आहेत. गावाकडे शेती करायला मजूर मिळत नाही. म्हणून खरीप (जून) आणि रबी (दिवाळी) अशा दोन्ही पेरण्यांच्या वेळी गावाकडे जातो. दिवाळीला गेलो की, पेरणीबरोबरच भाताची काढणीही करून घेतो. बाकी वर्षभर कोलकत्यात असतो. दोन बैल ठेवायला परवडत नाही, म्हणून एकच ठेवलाय. एक शेजा-याचा आहे. बैल महाग झालेत. वर्षभर टॅक्सी चालवली तरी एका बैलाची किंमत वसूल होत नाही.'

१० दिवसांच्या काळात मी कोलकत्यात भरपूर प्रवास केला; परंतु एकही बंगाली टॅक्सीवाला मला भेटला नाही. बहुतांश टॅक्सीवाले बिहार, झारखंडमधून आलेले होते. कोलकत्यात बिहारींची संख्या मोठी आहे. मी तेथे होतो तेव्हा छठ महोत्सव सुरू होता. संपूर्ण कोलकता शहरातील वाहतूक छठवाल्या बिहारी बायकांच्या वाहनांनी ठप्प केलेली होती. एकेदिवशी हावडा पूल ओलांडण्यासाठी मला ४५ मिनिटे लागली, एवढे ट्रॅफिक जॅम होते.

मुंबई-कोलकता कनेक्शन!
छोटू यादव. मुंबईत सागर डान्सबारमध्ये काम करायचा.
डान्सबार बंद झाल्यानंतर कोलकत्यातील हॉटेलात काम करतो.
मी थांबलो होतो त्या ‘भीमसेन हॉटेल'ची इमारत इंग्रजी राजवटीतली होती. ते चालवणारा मालक परप्रांतीय होता, तसेच बहुतांश स्टाफही परप्रांतीयच होता. त्यातलाच एक छोटू यादव. तो पाटणाजवळच्या एका खेड्यातून आलेला. आधी मुंबईत होता. विरार भागात कुठेतरी सागर नावाच्या डान्सबारमध्ये काम करायचा. आर.आर. पाटलांनी डान्सबारबंदी आणली तेव्हा त्याची नोकरी गेली. मुंबईहून त्याने थेट कोलकत्याची ‘ट्रेन' पकडली. ‘मुंबईत होतो तेव्हा चांगली कमाई व्हायची. आता दिवस ढकलतोय', अशी खंत त्याने व्यक्त केली. छोटूचा बाप कोलकत्यातील जुटाच्या कारखान्यात कामाला होता. कारखाना बंद पडल्यानंतर तो गावाकडे परतला. छोटूचे शिक्षण त्यामुळे होऊ शकले नाही. कळायला लागले तेव्हापासून तो पडेल ती कामे करतोय.

मी कोलकता सोडले त्याच्या आदल्या दिवशी छोटूने दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी ट्रेन पकडली. कोलकत्याला येणा-या आणि कोलकता सोडणा-या ट्रेन हाऊसफुल्लच असतात. दोन्ही ट्रेनमधली ही सारी गर्दी ‘पोटा'च्या पायांनी चालत असते; पण दोन्हींत एक सूक्ष्म फरक असतो. कोलकत्यात येणा-यांत छोटू यादव, मुनसिंग यादव यांच्या वर्गातील लोकांची संख्या अधिक असते, तर कोलकता सोडणारे -विशेषत: मुंबईच्या मार्गावर धावणारे लोक- सनातन बर्मन, नीरज घोष यांच्या वर्गातले असतात. हा प्रवास उलटा व्हावा, ही सनातनने व्यक्त केलेली भावना बहुतांश बंगाली माणसांत मला जाणवली. बंगाली राजकारण्यांना ती केव्हा जाणवेल कोणास ठावूक?

No comments:

Post a Comment