Tuesday, 1 December 2015

संत काशीनाथ महाराज यांचे देहावसान

जेजुरी : कोल्हाटी समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे व संत गाडगेमहाराज यांचे शिष्य संत काशीनाथ महाराज यांचे मंगळवारी दुपारी येथील विठ्ठल मंदिरात देहावसान झाले. ते १०० वर्षांचे होते. दुपारी १ वाजता जेजुरीतील विठ्ठल मंदिरातून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचे शिष्य प्रल्हाद लाखे यांनी दिली. बुधवारी सकाळी ९ वाजता महाराजांवर येथील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१५ आॅगस्ट १९१५ रोजी संत काशीनाथ महाराज ऊर्फ काशीनाथ बयाजी मोहोरकर यांचा जन्म झाला. तत्कालीन कोल्हाटी समाजातील मुलींच्या पायात चाळबंधने, लग्नानंतर कुंकू न लावणे आदी रुढी, तसेच अन्य अंधश्रद्धा त्यांच्या आईला मान्य नसल्याने त्याविरुद्ध आपल्या मुलानेच पुढाकार घ्यावा, अशी तिची इच्छा होती. त्यानुसार काशीनाथ महाराजांनी आजन्म ब्रह्मचारी राहून कोल्हाटी समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले. 

त्यांनी संत गाडगेमहाराजांचे १९५० मध्ये पंढरपूर येथे शिष्यत्व स्वीकारले. तेव्हापासून विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारून काशीनाथ महाराजांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता- शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा-व्यसनाचे दुष्परिणाम आणि देवाचे नामस्मरण समाजाला शिकवले.

जेजुरीत त्यांनी कोल्हाटी समाजाच्या वस्तीमध्येच विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारून त्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे केंद्र बनविले. स्वत: निरक्षर असूनही त्यांनी समाजामध्ये शिक्षणप्रसारक व समाजसुधारक म्हणून मोठे कार्य केले. अखिल भारतीय कोल्हाटी समाजाने त्यांना राष्ट्रीय संत ही उपाधी २० मे २००७ रोजी हभप किसन महाराज साखरे यांच्या हस्ते बहाल केली.

No comments:

Post a Comment