Thursday, 16 October 2014

गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!

गांधीजींना पुरस्कार न देणाऱ्या नोबेल समितीला सारे गुन्हे माफ..!

-सूर्यकांत पळसकर


बायबलमध्ये एका प्रसंगात शास्त्रांचा हवाला देत येशू म्हणतो की, ‘गवंड्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला!' उपेक्षेचे धनी असलेल्यांसाठी हे वचन प्रेरणादायी ठरावे. बालमजुरी आणि मुलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारे गांधीवादी समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा या वचनाची प्रकर्षाने आठवण झाली. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातील मलाला युसूफझई या तरुणीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे मलालाचे नाव जगातील कानाकोप-यात आधीच दुमदुमत होते. कैलाश सत्यार्थी मात्र भारतातही कोणाला माहिती नव्हते! त्यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला- कोण हे सत्यार्थी? नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे प्रचंड काम करणारा हा माणूस खरेच भारतात राहतो का? राहत असेल, तर आपल्याला कसा काय माहिती नाही? हा माणूस कधी टीव्हीवर दिसला नाही. वृत्तपत्रांतून झळकला नाही. सरकारी पुरस्कारांच्या यादीत कधी दिसला नाही. समाजसेवकांच्या भाऊगर्दीतही नजरेस आला नाही. अचानक त्याचे नाव नोबेलच्या पुरस्कारातच दिसले. अरे आहे तरी कोण हा माणूस?

नोबेलविजेत्या नायकाचे साधे नावही माहिती नसणे, हा काही लोकांचा दोष नाही. सकारात्मक काम करणा-यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणा-या व्यवस्थेचा हा दोष आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्यावरही शेकड्याने पुस्तके लिहिणारी, नाटके-सिनेमे काढणारी ही व्यवस्था गांधीवादी कैलाश सत्यार्थी यांना अनुल्लेखाने मारत राहिली. त्यामुळे त्यांचे नाव कोणाला माहिती असण्याचे कारणच नव्हते.

संस्कृतात भवभूती नावाचा एक मोठा नाटककार आहे. त्याच्या नाटकांना त्याच्या हयातीत कधी लोकमान्यता मिळाली नाही. लोकमान्यता नाही म्हणून भवभूती खंत करीत बसला नाही. व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून तो लिहीत राहिला. जाताना सांगून गेला, ‘पृथ्वी विशाल आहे आणि काळ अनंत आहे. कधी तरी, कोठे तरी माझ्या नाटकांना मान्यता मिळेलच!' आज भवभूती खरोखरच मोठा नाटककार म्हणून ओळखला जातो. भवभूतीचे वचन सत्यार्थी यांच्या नोबेलने पुन्हा एकदा खरे ठरले. भारतीय व्यवस्थेने नाकारलेला हा चौकोनी चिरा नोबेलवाल्यांनी हेरला. आज तो खरोखरच कोनशिला झाला आहे. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोनशिला होण्याची क्षमता असतानाही उपेक्षेच्या लाथा खाणाèयांची संख्या भारतात मोठी आहे. सगळ्यांचेच नशीब कैलाश सत्यार्थी यांच्यासारखे बलदंड नसते.

कैलाश सत्यार्थी यांना नोबेलच्या आधी जवळपास १२ पुरस्कार मिळाले असल्याचे आता समोर आले आहे. दुर्मिळ योगायोग पाहा, यातील एकही पुरस्कार भारतातील नाही. सगळे पुरस्कार युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथील विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्था यांनी हे पुरस्कार दिले आहेत. इंजिनिअर असलेल्या सत्यार्थी यांनी १९८० साली प्राध्यापकीला रामराम ठोकून ‘बचपन बचाओ आंदोलना'ची सुरुवात केली. १९८० ते २०१४ या ३४ वर्षांच्या काळात भारतात डावे-उजवे, सेक्युलर, हिंदुत्ववादी अशा सर्व पंथीयांची सरकारे आली. यापैकी कोणत्याही सरकारला त्यांच्या कार्याची महती कळाली नाही. या काळात पद्म आणि इतर पुरस्कार किती दिले गेले, याचा हिशेब काढणे अवघड आहे; पण यातील एकाही पुरस्कारावर सत्यार्थी यांचे नाव कोरले गेले नाही. भारत सरकारच्या पुरस्कारांतून इतकी वर्षे ‘सत्य' हरवत राहिले. तेच नोबेलवाल्यांना सापडले.

खरे कार्यकर्ते पुरस्कारांसाठी काम करीत नसतात, हे खरे असले तरी पुरस्कार कार्यकत्र्यांना हुरूप देतात. समाजाने कामाची दिलेली ती पोचपावती असते. सत्यार्थी यांच्या कामाची पोचपावती भारतीय समाजाने दिली नाही. पण, म्हणून सत्यार्थी यांचे काम थांबले नाही. ३४ वर्षांच्या काळात जगभरातील १४४ देशांत त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढविला. हा संपूर्ण कालखंड सोपा मात्र नव्हता. या काळात त्यांच्यावर दोन प्राणघातक हल्ले झाले.

सत्यार्थी आणि मलाला यांच्या नोबेल पारितोषिकाने दोन्ही देशांत एक विचित्र योगायोग जुळवून आणला आहे. पाकिस्तान पूर्णतः कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे, तर भारतात कट्टरपंथीयांची घोडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत गांधीजींनी सांगितलेल्या शांतता आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाणा-या या दोघांना नोबेल जाहीर झाले आहे. पाकिस्तानच्या मातीला सहिष्णुतेचा जागर तसाही अपरिचितच आहे. भारताचे मात्र तसे नाही. इथल्या मातीला बापूंच्या सहिष्णुतेचा सुगंध आहे. गांधीजींची हत्या होऊन ६६ वर्षे झाली. या संपूर्ण काळात गांधीविचार गाडून टाकण्यासाठी जातीय शक्तींनी आपले सर्व ‘चाणक्य' कामाला लावले होते. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर ‘चाणक्यां'च्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण हाय रे दैवा! गांधींचा विचार नोबेलचा धुमारा घेऊन पुन्हा जमिनीतून वर आला आणि त्याचे स्वागत करण्याची पाळी ‘चाणक्यां'वर आली. काव्यगत न्यायाचे यापेक्षा बळिवंत उदाहरण जगाच्या इतिहासात बहुधा सापडणार नाही. कट्टरपंथीयांच्या दृष्टीने मलाला आणि सत्यार्थी यांचे देश आणि धर्म एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही दोघांचे मिशन एक होते आणि मार्गही एकच होता. बापूंचा शांतीमार्ग. नोबेल पुरस्काराने आता त्यांना कायमस्वरूपी एकत्र आणले. भविष्यात जेव्हा जेव्हा सत्यार्थी यांचे नाव घेतले जाईल, तेव्हा तेव्हा मलालाचीही आठवण होईल. तसेच मलालाच्या आठवणीसोबत सत्यार्थींचे नावही ओठांवर येईल. दोन्ही देश आणि दोन्ही धर्मांनी शिक्षणासाठी तसेच दहशतवादाच्या विरुद्ध काम करावे, अशी अपेक्षा नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केली आहे. ती अनाठायी नाही.

अनेक वेळा नामांकन होऊनही नोबेल समितीने महात्मा गांधी यांना नोबेल दिले नाही. भारतातील एका साध्या गांधीवाद्याला शेवटी हा पुरस्कार त्यांनी दिला. नोबेल समितीला सर्व गुन्हे माफ..!

(लेखक लोकमत, औरंगाबादमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)
प्रसिद्धी : लोकमत १५ ऑक्टोबर २०१४ 


या विषयावरील सर्व लेख 

No comments:

Post a Comment