Wednesday 15 October 2014

नोबेल, गांधी आणि सत्यार्थी!

नोबेल पारितोषिक पावन झाले 

-सूर्यकांत पळसकर 

महात्मा गांधी यांना ६ वेळा नॉमिनेशन मिळूनही नोबेल पारितोषिक नाकारण्याचे पाप नोबेल समितीने केले होते. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल देऊन आता समितीने या पापाचे क्षाळण केले, असे समजायला हरकत नाही. कैलाश सत्यार्थी हे गांधीवादी आहेत. या पूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग, तिबेटींचे नेते दलाई लामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी  नेत्या ऑन सॉन स्यू की या गांधीवाद्यांना नोबेल मिळाले आहे. पण हे सारे विदेशी होते. कैलाश सत्यार्थी यांच्या रूपाने भारतीय गांधीवाद्यालाही हा पुरस्कार आता मिळाला. एवढे नोबेल मिळविणारा गांधीविचार हा जगातील एकमेव विचार आहे.

१९३७ साली गांधीजींचे पहिल्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन झाले. त्यापुढच्या सलग दोन वर्षी त्यांना पुन्हा नॉमिनेशन मिळाले. १९४७ सालीही त्यांना नॉमिनेशन मिळाले. पण प्रत्येकवेळी समितीने त्यांना पारितोषिक नाकारले. गांधी हे विचारांनी "राष्ट्रवादी" आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दैवदुर्विलास पाहा, गांधी हे "राष्ट्रवादी" नाहीत, असा आरोप करीत नथुराम गोडसे याने त्यांची पुढच्याच वर्षी हत्या केली. गांधीजींचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते की, रुढ विचारांच्या चौकटीत ते बसतच नव्हते. म्हणूनच नोबेलवाल्यांना ते कडवट राष्ट्रवादी वाटत होते, तर हिन्दुत्वाद्यांना ते राष्ट्रवादी वाटतच नव्हते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९४८ साली त्यांना मरणोत्तर नोबेल देण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला होता. पण, त्यात नियम आडवे आले. गांधीजींचा कोणत्याही संघटनेशी कायदेशीरित्या संबंध नव्हता. कोणत्याही संघटनेचे साधे सदस्यत्वही त्यांच्या नावे नव्हते. त्यांच्या मागे कोणतीही संपत्ती नव्हती. कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते; त्यामुळे त्यांना कोणी रितसर वारसच नव्हता. मग नोबेलचे स्मृतीचिन्ह आणि रक्कम देणार कोणाला? गांधींचे हे नोबेलही हुकले. पण नोबेल समितीने एक केले, त्या वर्षी कोणालाच नोबेल दिले नाही. "शांततेचे नोबेल पारितोषिक देता येईल, असा कोणीही जिवंत माणूस पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही", असे नोबेल समितीने त्या वर्षी जाहीर केले. ही गांधीजींना श्रद्धांजलीच होती.

पण, बरेच झाले, गांधींना नोबेल मिळाले नाही ते. संतवृत्तीने जगलेल्या या महापुरुषाने आयुष्यात सर्व प्रकारच्या लौकिक उपाध्या नाकारल्या. नियतीने त्यांना नोबेलच्या उपाधीपासूनही दूर ठेवले. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल मिळाल्याने गांधीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आज नोबेल पारितोषिकही पावन झाले आहे. 

No comments:

Post a Comment