Sunday, 8 September 2013

गणपती : वारक-यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता

सूर्यकांत पळसकर

‘‘... तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात...''

वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही. वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. वारकरी संतांनी गणपतीची गणना म्हसोबा, बिरोबा, जखाई-मसाई अशा मद्यमांस भक्षक उपदेवतांच्या यादीत ढकलेले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.

ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा मुख्य ग्रंथ. तो वारक-यांचा पहिला मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. भारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र या रुढीला फाटा देण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात. 

ज्ञानेश्वरीची ही पहिली ओवी अशी : 

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । 
जयजय स्ववेंद्या । आत्मरूपा ।।१।।

ज्ञानदेवांनी इथे गणपतीला बाजूला सारून विश्वनिर्मात्याला पहिले नमन केले आहे. विश्वनिर्मात्याला ते ओमकाराच्या रूपात पाहतात. ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायांपैकी कोणत्याही अध्यायाची सुरूवात गणेशस्तवनाने होत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गणपतीला दूर सारून ज्ञानेश्वर नवी परंपरा निर्माण करीत नाहीत. ही परंपरा आधीच वारक-यांत होती. तिचा अंगिकार ज्ञानेश्वर करतात. सनातन्यांनी छळ करून दूर लोटल्यानंतर ज्ञानेश्वर वारक-यांच्या चळवळीत शिरले, असे मानण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण परिस्थिती त्याच्या उलट आहे. ज्ञानेश्वरांचे घराणे किमान तीन पिढ्यांपासून वारकरी होते. ते वारकरी होते, म्हणून सनातन्यांनी विठ्ठलपंत आणि त्यांच्या मुलांचा छळ केला. हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. त्यामुळे त्याचा उहापोह येथे करीत नाही. याविषयावर मी नंतर लिहिणारच आहे. असो. ज्ञानेश्वरांनी गणपतीला दूर ठेवून वारक-यांच्या रूढ परंपरेचे पालन केले. ज्ञानेश्वरांच्या समकालीन संतांनीही गणेशाला पहिल्या वंदनाचा मान दिलेला नाही. 

गणपतीबाप्पाला बाजूला बसविण्याचा हा प्रघात वारकरी फक्त ग्रंथ लेखनात पाळतात असे नव्हे. इतर सर्वच 
क्षेत्रांत तो पाळला जातो. वारकरी भजनांची सुरूवात गणेश स्तवनाने होत नाही. ‘विठोबा रखुमाई' असा घोष आळवून वारकरी भजने सुरू होतात. ज्ञानोबांच्या ‘रूप पाहता लोचनी' या अभंगाला पहिल्या भजनाचा, तर तुकोबांच्या ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या अभंगाला दुस-या भजनाचा मान आहे. ही दोन भजने झाल्यानंतरच इतर भजने म्हटली जातात. किर्तनात आणि प्रवचनात हाच क्रम वापरला जातो. अखंड हरीनाम सप्ताहांत हाच क्रम आहे. गाथा भजनांत हाच क्रम आहे. या सर्वच ठिकाणी गणपतीबाप्पा कुठेही नाही. वारकरी धर्माने सर्वच ठिकाणी गणपतीला बाहेर बसवले आहे. 

तुकोबा हे वारकरी धर्माचे कळस असल्यामुळे त्यांची गणपतीविषयक भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. वारकरी धर्मात तुकोबांचा शब्द अंतिम समजला जातो. तुकोबांचा ‘नव्हे जोखाई' हा अभंग प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण अभंग आधी आपण पाहू या. 

नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

या अभंगातील ‘गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ' हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिले आहे. तुकोबा म्हणतात : 'आक्राळ विक्राळ पोट असलेला गणपती हा लाडू आणि मोदकांचा काळ आहे.' खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरे काहीही करीत नाही. म्हणजेच अध्यात्म मार्गात तो निरुपयोगी आहे.

महाराष्ट्र धर्मात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व उपदैवतांना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी आणण्याचे ऐतिहासिक कार्य वारकरी संतांनी केले. तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्टड्ढात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती'! तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात. 

तुकोबांनी केलेले गणपतीचे हे अवमूल्यन पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. पण केवळ मनाला आले म्हणून तुकोबांनी गणपतीचे अवमूल्यन केलेले नाही. त्यामागे निश्चित भूमिका आहे. तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या उपदेवतांच्या यादीत देवी-देवता या देवऋषांच्या उपयोगाच्या आहेत. गणपती आणि या देवी-देवतांमध्ये एक समानता आहे. हे सर्व देव कोणाचे तरी पोटपाणी चालवितात. तसेच येथे संचार अपेक्षित आहे. देवऋषाच्या अंगात देवीचा संचार होत असतो. भटजींच्या पूजेतही संचारच असतो. पण हा संचार अंगात न होता, सुपारीत होत असतो. कोणत्याही पुजेच्या आधी भटजी लाल सुपारी मांडतात. या सुपारीत गणपतीची स्थापना करतात. ही स्थापना म्हणजे संचारच. जखाई-मसाई देवऋषाचे पोटपाणी चालवितात. तर गणपती हा भटजीचे पोट चालवितो. देवऋषाला मोबदला म्हणून पैसा आणि धान्य दिले जाते. भटजींनाही रोख रक्कम आणि धान्याच्या स्वरूपात दक्षिणा दिली जाते. इथे देव हा पैसे मिळविण्याचे साधन ठरतो. वारकरी धर्म देवाला साधन मानित नाही. साध्य मानतो. देवाच्या नावे पैशांची देवाण घेवाण करण्यास वारकरी धर्म तीव्र विरोध करतो. तुकोबांनी तर ‘देती घेती नरका जाती' असे सांगून पैसे देणारा आणि घेणारा असा दोघांचाही निषेध केला आहे. 

‘कलौचंडी विनायकौ' असे पुरोहिती शास्त्रात एक वचन आहे. ‘कलियुगात देवी आणि गणपती यांची उपासना फलदायी ठरते.' असा या वचनाचा अर्थ आहे. या देवता देवऋषी आणि पुरोहित यांना खरोखरच ‘फल'दायी ठरल्या आहेत. तुकोबा गणपतीला जखाई-मसाईच्या रांगेत का उभे करतात, याचे कोडे येथे उलगडते.

3 comments:

 1. सूर्यकांतराव,

  आपण म्हणता की माऊलींनी गणपतीला बाजूला सारून विश्वनिर्मात्याला पहिले नमन केले आहे. मात्र ते पटत नाही. कारण ओंकार हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते. ओम नमोजी आद्या च्या पुढच्याच श्लोकात श्रीगणेशाची महती गणली आहे :

  । देवा तूचि गणेशु । सकालार्थमतिप्रकाशु ॥
  । म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ॥

  पहिल्या श्लोकात ज्यास नमन केलंय त्याचंच दुसऱ्या श्लोकात वर्णन आलंय. मलातरी पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात अर्थभेद जाणवला नाही. :-)

  मात्र तुकोबांना गणपती त्याज्य का वाटतो त्याचं तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण पटलं. देव भक्तांवरून ओळखला जातो. देवाची शास्त्रोक्त उपासना करून परमार्थ साधायचा असतो. त्याऐवजी ऐहिक संग्रहाच्या मागे लागणे चुकीचे आहे. तुकोबांच्या अभंगांतून हा बोध घेतला पाहिजे. :-)

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
  Replies
  1. गामा पहेलवान.
   विद्वत्तापूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

   पहिल्या ओवीत ज्ञानोबा विश्वाचे आद्य असलेल्या इश्वराला वंदन करतात. पुढच्या श्लोकात याच आद्यरूप इश्वराला म्हणतात की, तूच गणेशाचे रूप आहेस. त्यापुढच्या ओव्यांत ओमकाराचे रूपक आले आहे.

   कोणत्याही ग्रंथाची सुरूवात "श्रीगणेशायनम:" या पालुपदाने करण्याची परंपरागत पद्धतीला ज्ञानोबांनी फाटा दिला आहे. आपण असे का केले, याचे स्पष्टिकरण देण्यासाठी ज्ञानोबांनी या सर्व ओव्या रचल्या आहेत.

   Delete
  2. suryakant palaskar तुमचे म्हणणे पटले.
   अगदी बरोबर बोलला तुम्ही. गणपती हा देवच नाही हा भटजींनी चालवलेली अंधश्रध्दा आहे.

   Delete