Showing posts with label संत तुकाराम. Show all posts
Showing posts with label संत तुकाराम. Show all posts

Friday, 19 December 2014

गीता आणि गाथा!

-सूर्यकांत पळसकर


श्रीमद्भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याविषयीचे सूचक विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. गीता कोणी वाचत नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यावर नुकतीच व्यक्त केली. भारत हा बहुभाषिक आणि बहुपंथीय देश आहे. त्यामुळे भारताचा अधिकृत राष्ट्रीय ग्रंथ कोणता व्हावा, याचा निर्णय घेणे सोपे नाही. गीता हा निःसंशय महान ग्रंथ आहे.  तथापि, राष्ट्रीय ग्रंथाचा बहुमान मिळावा, असे इतरही अनेक ग्रंथ या देशात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हा त्यातीलच एक ग्रंथ होय. 

सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय ग्रंथाचा मुद्दा काढला, त्याच्या सुमारे दीडशे वर्षे आधी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्स्टड्ढक्शन सर अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांना भारताचे ‘राष्ट्रीय कवी' असे म्हटले होते. राष्ट्रीय कवीच्या रचनांना राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळणे नैसर्गिकच म्हणायला हवे. तुकोबांना राष्ट्रीय कवी म्हणणारे ग्रँटसाहेब काही लहान असामी नव्हते. अमेरिकेत जन्मलेले ग्रँट ब्रिटिश साम्राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षणतज्ज्ञ होते. लंडनच्या एडिनबर्ग विद्यापीठात ते प्राचार्य होते. ब्रिटिश सरकारने नंतर त्यांना भारतात पाठविले. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर, प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि विधान परिषदेचे सदस्य अशा अनेक जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. मुंबईत असतानाच तुकोबांचे अभंग त्यांच्या वाचनात आले. अभंग वाचून ग्रँटसाहेब भारावून गेले. जानेवारी १८६७च्या ‘फोर्टनाईटली रिव्ह्यू'मध्ये त्यांनी तुकोबांवर एक निबंध प्रसिद्ध केला. तुकोबांच्या काही अभंगांची पद्य भाषांतरेही त्यांनी केली. ग्रँटसाहेब श्रद्धावंत ख्रिश्चन होते. त्यांचा बायबलचा उत्तम अभ्यास होता. तुकोबांच्या अभंगांची बायबलमधील डेव्हिडच्या गीतांशी तुलना करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. बायबलमधील ही गीते ‘डेव्हीड्स साम्स' (David’s psalms) म्हणून प्रसिद्ध आहेत. ही गीते अत्यंत भावगर्भ आहेत. तोच भाव ग्रँटसाहेबांना तुकोबांच्या अभंगांत दिसून आला. ‘सतत देवाच्या जवळ राहिलेल्या व्यक्तीच्या भावनांचा सहज उद्गार', असे वर्णन त्यांनी तुकोबांच्या अभंगांचे केले.

ग्रँटसाहेबांच्या आधीपासून ब्रिटिश अधिका-यांना तुकोबांच्या अभंगांनी आकर्षित केले होते. त्या काळी महाराष्ट्रात ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात काम करीत होते. तुकोबांच्या अभंंगांचा वापर करून एतद्देशीय लोकांना ख्रिस्तचरणी आणता येईल, असे अनेक मिशन-यांना वाटत असे. त्या काळी नुकतेच ख्रिश्चन झालेले रे. नारायण वामन टिळक यांचेही असेच मत होते. टिळक हे मूळचे चित्पावन ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी धर्मांतराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते. ब्रिटिश मिशनरी मरे मिचेल (Dr. Murray Mitchell) यांनी याच उद्देशाने तुकोबांच्या अभंगांचा अभ्यास केला. १८४९ साली मरे यांनी महिपतीच्या लिखाणाधारे तुकोबांचे संक्षिप्त चरित्र लिहिले. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात ते छापून आले. मरे यांनी तुकोबांच्या अभंगांचा इतका अभ्यास केला, की त्यांना स्वतःलाच अभंग रचता यायला लागले! अर्थात हा सारा खटाटोप धर्मांतरासाठी होता. ग्रँटसाहेबांना मिशन-यांच्या या कारवाया कळल्या होत्या. याचा समाचार त्यांनी आपल्या लेखात घेतला. ग्रँटसाहेबांनी लिहिले की, ‘ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी वसत आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे पटवून देणे दुरापास्त आहे!'

आज तुकोबांची जी गाथा महाराष्टड्ढात उपलब्ध आहे, त्याचे सारे श्रेय ग्रँटसाहेबांनाच जाते. सर बार्टल फ्रिअर हे तेव्हाचे मुंबई प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. महाराष्ट्रात विखुरलेले तुकोबांचे अभंग एकत्रित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी २४ हजारांचे अनुदान ग्रँटसाहेबांनी गव्हर्नर बार्टल साहेबांकडून मंजूर करून घेतले. विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांची संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रकल्पावर देखरेख करण्याची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित यांच्यावर सोपविण्यात आली. १८६९ साली तुकोबांच्या गाथेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर चार वर्षांनी १८७३ साली दुसरा भाग प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात त्या काळी उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिखितांचा अभ्यास करून हा गाथा प्रसिद्ध झाला. उपलब्ध हस्तलिखितांतील पाठभेदांची नोंदही संपादकांनी करून ठेवली आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने हाच गाथा पुनप्र्रकाशित केला. काही अभंगांचा अपवाद वगळता वारक-यांमध्येही हाच गाथा प्रचलित आहे. अशा प्रकारे तुकोबांचे अभंग जतन करण्याचे महान काम सर अलेक्झांडर ग्रँट यांनी करवून घेतले. या प्रकल्पासाठी ब्रिटिश सरकारने दिलेल्या २४ हजार रुपयांची किंमत आजच्या हिशेबाने किती तरी मोठी होईल. ही मदत केवळ तुकोबांवरील प्रेमातून त्यांनी केली. गो-या साहेबांचे तुकोबांवरचे हे प्रेम त्या काळी महाराष्ट्रातील विद्वान म्हणविणा-या अनेकांच्या पोटदुखीचा विषय झाले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या निरपेक्ष बुद्धीच्या पंडिताने यावर केलेले भाष्यही बघण्याजोगे आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले की, ‘…जो बिचारा शूद्रकवी आपल्या लंगोटेबहाद्दर व घोंगडीवाल्या भक्तमंडळीतच काय तो रमायचा, किंवा फार झाले तर हरदासांच्या कथाप्रसंगी सत्कार पावायचा, त्यास एकाएकी अरबी गोष्टीतील अबू हसनसारखे मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले... असो झाली ती गोष्ट बरीच झाली.'

तुकोबांच्या अभंगांच्या प्रेमात पडलेल्या ब्रिटिश अधिकारी लेखक, कवी यांची यादी मोठी आहे. जे. नेल्सन फ्रेझर यांनी तुकोबांच्या अभंगांचे ‘पोएम्स ऑफ तुकाराम' या नावाने भाषांतर केले. फ्रेझर यांचाच ‘द लाइफ अँड टीचिंग ऑफ तुकाराम' हा अभ्यासग्रंथही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने हा ग्रंथ पूर्ण होण्याआधीच फ्रेझर यांचे निधन झाले. जेम्स एफ. एडवर्ड्स यांनी नंतर तो पूर्ण केला. १९२२ साली हा ग्रंथ दोघांच्या नावे प्रसिद्ध केला. एडवर्ड्स यांचाही बायबलचा सखोल अभ्यास होता. या सा-या गो-या साहेबांनी आपला धर्म विसरून तुकोबांवर प्रेम केले. अभंगांच्या अभ्यासासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली. भारत सरकारने असेच प्रेम दाखवून तुकोबांना ‘राष्ट्रकवी' म्हणून गौरवायला हवे. 
(लेखक औरंगाबाद लोकमतचे मुख्य उपसंपादक आहेत.)
(प्रसिद्धी : लोकमत १९ डिसेंबर २०१४)



Thursday, 2 October 2014

गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

१ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त लोकमतच्या
संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला माझा लेख.… 

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश
देणारी तीन माकडे  गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली
आहेत, हे कोणालाच माहिती नसते.
सत्य, अहिंसा आणि सर्वोदय (सर्वांचे कल्याण) हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार आहे. महात्मा गांधी यांचे संपूर्ण वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन या तीन शब्दांत सामावलेले आहे. महात्मा गांधी यांनी हे शब्द आणि विचार तीन वेगवेगळ्या ग्रंथांमधून घेतले आहेत. भगवान श्रीकृष्णाची ‘श्रीमद्भगवद्गीता', व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश विचारवंत जॉन रस्कीन याचे ‘अन्टू धिस लास्ट' आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‘अभंग गाथा' हे ते तीन ग्रंथ होत.  गीतेमधून गांधीजींनी सत्य घेतले, जॉन रस्कीनच्या पुस्तकातून सर्वोदयाचा विचार घेतला; तर तुकोबांच्या गाथ्यामधून अहिंसा घेतली. ही ढोबळ विभागणी आहे; कारण वेगवेगळ्या दिसणारया या तिन्ही विचारांत अद्वैैताचे नाते आहे. गांधीजींचे जीवन आकाश केवळ या तीनच ग्रंथांनी व्यापले आहे, असे मात्र नव्हे. इतरही अनेक ग्रंथांनी तसेच व्यक्तींनी गांधीजींच्या जीवनविचारांवर प्रभाव टाकलेला आहे. वरील तीन ग्रंथांचे महत्त्व एवढ्याचसाठी आहे, की हे ग्रंथ बापूंच्या जीवनविचारांचा मुख्य प्रवाह आहेत. या प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळतात, अनेकदा हे उपप्रवाह मुख्य प्रवाहाएवढे मोठेही दिसतात, तरीही ते मुख्य प्रवाहाची जागा घेऊ शकत नाहीत. 

लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना बापूंचा गीतेसोबतचा पहिला परिचय झाला. मात्र, मूळ गीतेने नव्हे, तर भाषांतराने! सर एडविन अरनॉल्ड यांनी ‘द साँग सिलेस्टिअलङ्क या नावाने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला होता. हे पुस्तक तेव्हा ब्रिटनमध्ये गाजत होते. बापूंच्या परिचयातील दोन थिऑसॉफिस्ट भावांनी त्यांना हे भाषांतर भेट दिले. गांधीजींचे लंडनमधील ते दुसरे वर्ष होते. या कोवळ्या वयात गांधीजींना या पुस्तकाने झपाटून टाकले. ‘सत्याचे ज्ञान देणारे अद्वितीय पुस्तकङ्क अशा शब्दांत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले आहे. नंतरच्या काळात ‘गीताङ्क हे पुस्तक आणि ‘सत्यङ्क हा विचार गांधीजींनी आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडून घेतला. 

गीता मूळ संस्कृतातून अथवा किमान मायबोली गुजरातीतून वाचण्याऐवजी इंग्रजीतून वाचावी लागत असल्याबद्दल मात्र गांधीजींना तेव्हा वाईट वाटले होते. देशी भाषांविषयीचा हाच स्वाभिमान गांधीजींनी आयुष्यभर जपला. देशी भाषांचे महत्त्व विशद करताना गांधीजी तुकोबांच्या अभंगांचे उदाहरण नेहमी देत. २० ऑक्टोबर १९१७ साली भडोच येथे भरलेल्या दुसèया गुजरात शिक्षण परिषदेत गांधीजी म्हणाले होते की, ‘तुकारामांनी मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याच्याशी इंग्रजीला काहीही देणे-घेणे नाही.ङ्क 
जॉन रस्कीन यांचे ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तकही गांधीजींना असेच योगायोगाने वाचायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी एकदा जोहान्सबर्ग ते नाताळ असा प्रवास करीत होते. त्यांचे एक मित्र पोलक यांनी त्यांना रेल्वे स्थानकावर ‘अन्टू धिस लास्टङ्क हे पुस्तक वाचायला दिले. २४ तासांच्या प्रवासात गांधीजींनी हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचून काढले. या पुस्तकाचा नंतर गांधीजींनी ‘सर्वोदयङ्क या नावाने अनुवाद केला. या अनुवादाने एक नवी विचारधाराच भारताला दिली. त्यालाच सर्वोदयवाद असे म्हणतात. या पुस्तकाचा गाभा गांधीजींनी तीन वाक्यांत सांगितला आहे. ही वाक्ये अशी : 
१. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे. 
२. वकील काय किंवा केस कापणारा सलूनवाला काय, सर्वांच्या कामाची किंमत सारखीच आहे. 
३. साधे अंगमेहनतीचे शेतकèयाचे जीवन हेच खरे जीवन आहे.

हा विचार खरोखरच क्रांतिकारक होता; पण नवा नव्हता! रस्कीनचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या २०० वर्षे आधी तुकोबांनी हा विचार भारतीय समाजाला देऊन ठेवला होता. रस्कीनची वाक्ये तुकोबांच्या अभंगांचा अनुवादच वाटतात. ‘तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे।।' हे तुकोबांचे वचन आणि ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे,' हे रस्कीनचे वचन यात शब्दाचाही फरक नाही. रस्कीनला वकील आणि सलूनवाला यांच्या कामाची किंमत सारखीच वाटते. तुकोबांना स्वतःचा पुत्र आणि नोकर यांची माणूस म्हणून असलेली किंमत सारखीच वाटते.  म्हणूनच ते ‘दया करणे जे पुत्राशी । तेचि दासा आणि दासी ।।' असे वचन लिहून जातात. 

तुकोबांच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या विचारांची वैश्विकता बघून गांधीजी भारावून गेले. त्यामुळेच गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला. हे १६ अभंग निवडताना सर्वोदयाचा विचारच गांधीजींनी केंद्रस्थानी ठेवला. 

‘गीता' आणि ‘अन्टू धिस लास्ट' या पुस्तकांतून गांधीजींनी आपल्या जीवनाचा सैद्धांतिक आधार शोधला. तुकोबांच्या अभंगांतून मात्र त्यांनी जीवनाचे प्रात्यक्षिक घेतले. तुकोबांचा विचार गांधीजी साक्षात जगले. दुर्दैवाने गांधीजी आणि तुकोबांचे हे अद्वैताचे नाते, समाजासमोर आलेच नाही. ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका' असा संदेश देणारी गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहीत असतात. मात्र, ही माकडे गांधीजींनी तुकोबांच्या अभंगातून घेतली आहेत, हे कोणालाच माहिती नसते. तुकोबांच्या खालील अभंगांतून गांधीजींनी तीन माकडांची ही कल्पना उचलली आहे : 

पापाची वासना नको दावू डोळा।
त्याहुनि आंधळा बराच मी ।।१।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी । 
बधिर करोनि ठेवी देवा ।।२।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याजहुनि मुका बराच मी ।।३।।...

गांधीजींनी अनुवादित केलेल्या १६ अभंगांत या अभंगाचाही समावेश आहे. अनुवादात हा अभंग दुसèयाच क्रमांकावर आहे, यावरून गांधीजींची त्यावरील श्रद्धा लक्षात यावी. अअर्ध्या  जगावर राज्य असलेल्या इंग्रजांशी लढताना महात्मा गांधी यांनी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर केला नाही. त्याऐवजी सत्याग्रह आणि उपोषण ही नवी हत्यारे त्यांनी वापरली. ही हत्यारे गांधीजींनी तुकोबांकडूनच घेतली आहेत.  

-सूर्यकांत पळसकर
(लेखक औरंगाबाद लोकमतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)


लोकमतच्या वेब साईटवर लेखाची लिंक :
गांधीजींच्या जीवनातील तीन ग्रंथ

Sunday, 8 September 2013

गणपती : वारक-यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता

सूर्यकांत पळसकर

‘‘... तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात...''

वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही. वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. वारकरी संतांनी गणपतीची गणना म्हसोबा, बिरोबा, जखाई-मसाई अशा मद्यमांस भक्षक उपदेवतांच्या यादीत ढकलेले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.

ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांचा मुख्य ग्रंथ. तो वारक-यांचा पहिला मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. भारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र या रुढीला फाटा देण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात. 

ज्ञानेश्वरीची ही पहिली ओवी अशी : 

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । 
जयजय स्ववेंद्या । आत्मरूपा ।।१।।

ज्ञानदेवांनी इथे गणपतीला बाजूला सारून विश्वनिर्मात्याला पहिले नमन केले आहे. विश्वनिर्मात्याला ते ओमकाराच्या रूपात पाहतात. ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायांपैकी कोणत्याही अध्यायाची सुरूवात गणेशस्तवनाने होत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गणपतीला दूर सारून ज्ञानेश्वर नवी परंपरा निर्माण करीत नाहीत. ही परंपरा आधीच वारक-यांत होती. तिचा अंगिकार ज्ञानेश्वर करतात. सनातन्यांनी छळ करून दूर लोटल्यानंतर ज्ञानेश्वर वारक-यांच्या चळवळीत शिरले, असे मानण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण परिस्थिती त्याच्या उलट आहे. ज्ञानेश्वरांचे घराणे किमान तीन पिढ्यांपासून वारकरी होते. ते वारकरी होते, म्हणून सनातन्यांनी विठ्ठलपंत आणि त्यांच्या मुलांचा छळ केला. हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. त्यामुळे त्याचा उहापोह येथे करीत नाही. याविषयावर मी नंतर लिहिणारच आहे. असो. ज्ञानेश्वरांनी गणपतीला दूर ठेवून वारक-यांच्या रूढ परंपरेचे पालन केले. ज्ञानेश्वरांच्या समकालीन संतांनीही गणेशाला पहिल्या वंदनाचा मान दिलेला नाही. 

गणपतीबाप्पाला बाजूला बसविण्याचा हा प्रघात वारकरी फक्त ग्रंथ लेखनात पाळतात असे नव्हे. इतर सर्वच 
क्षेत्रांत तो पाळला जातो. वारकरी भजनांची सुरूवात गणेश स्तवनाने होत नाही. ‘विठोबा रखुमाई' असा घोष आळवून वारकरी भजने सुरू होतात. ज्ञानोबांच्या ‘रूप पाहता लोचनी' या अभंगाला पहिल्या भजनाचा, तर तुकोबांच्या ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या अभंगाला दुस-या भजनाचा मान आहे. ही दोन भजने झाल्यानंतरच इतर भजने म्हटली जातात. किर्तनात आणि प्रवचनात हाच क्रम वापरला जातो. अखंड हरीनाम सप्ताहांत हाच क्रम आहे. गाथा भजनांत हाच क्रम आहे. या सर्वच ठिकाणी गणपतीबाप्पा कुठेही नाही. वारकरी धर्माने सर्वच ठिकाणी गणपतीला बाहेर बसवले आहे. 

तुकोबा हे वारकरी धर्माचे कळस असल्यामुळे त्यांची गणपतीविषयक भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. वारकरी धर्मात तुकोबांचा शब्द अंतिम समजला जातो. तुकोबांचा ‘नव्हे जोखाई' हा अभंग प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण अभंग आधी आपण पाहू या. 

नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।

या अभंगातील ‘गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ' हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिले आहे. तुकोबा म्हणतात : 'आक्राळ विक्राळ पोट असलेला गणपती हा लाडू आणि मोदकांचा काळ आहे.' खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरे काहीही करीत नाही. म्हणजेच अध्यात्म मार्गात तो निरुपयोगी आहे.

महाराष्ट्र धर्मात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व उपदैवतांना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी आणण्याचे ऐतिहासिक कार्य वारकरी संतांनी केले. तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्टड्ढात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती'! तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात. 

तुकोबांनी केलेले गणपतीचे हे अवमूल्यन पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. पण केवळ मनाला आले म्हणून तुकोबांनी गणपतीचे अवमूल्यन केलेले नाही. त्यामागे निश्चित भूमिका आहे. तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या उपदेवतांच्या यादीत देवी-देवता या देवऋषांच्या उपयोगाच्या आहेत. गणपती आणि या देवी-देवतांमध्ये एक समानता आहे. हे सर्व देव कोणाचे तरी पोटपाणी चालवितात. तसेच येथे संचार अपेक्षित आहे. देवऋषाच्या अंगात देवीचा संचार होत असतो. भटजींच्या पूजेतही संचारच असतो. पण हा संचार अंगात न होता, सुपारीत होत असतो. कोणत्याही पुजेच्या आधी भटजी लाल सुपारी मांडतात. या सुपारीत गणपतीची स्थापना करतात. ही स्थापना म्हणजे संचारच. जखाई-मसाई देवऋषाचे पोटपाणी चालवितात. तर गणपती हा भटजीचे पोट चालवितो. देवऋषाला मोबदला म्हणून पैसा आणि धान्य दिले जाते. भटजींनाही रोख रक्कम आणि धान्याच्या स्वरूपात दक्षिणा दिली जाते. इथे देव हा पैसे मिळविण्याचे साधन ठरतो. वारकरी धर्म देवाला साधन मानित नाही. साध्य मानतो. देवाच्या नावे पैशांची देवाण घेवाण करण्यास वारकरी धर्म तीव्र विरोध करतो. तुकोबांनी तर ‘देती घेती नरका जाती' असे सांगून पैसे देणारा आणि घेणारा असा दोघांचाही निषेध केला आहे. 

‘कलौचंडी विनायकौ' असे पुरोहिती शास्त्रात एक वचन आहे. ‘कलियुगात देवी आणि गणपती यांची उपासना फलदायी ठरते.' असा या वचनाचा अर्थ आहे. या देवता देवऋषी आणि पुरोहित यांना खरोखरच ‘फल'दायी ठरल्या आहेत. तुकोबा गणपतीला जखाई-मसाईच्या रांगेत का उभे करतात, याचे कोडे येथे उलगडते.