Friday 13 October 2017

उत्तरेतील मराठीचा दिग्विजय!

सूर्यकांत पळसकर

जे इतिहासाला विसरतात, इतिहास त्यांना विसरतो. मराठी भाषिकांचे असेच झाले आहे. आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासाबद्दल मराठी भाषिकांएवढा अज्ञानी भाषिक समूह जगात दुसरा सापडणार नाही. भारतात आज बोलल्या जाणा-या भाषांत मराठी एवढा देदिप्यमान इतिहास (आणि कदाचित वर्तमानही) इतर कोणत्याही भाषेला नाही. तरीही दरवर्षी होणा-या साहित्य संमेलनात मराठी जगणार की मरणार याचे वांझोटे चिंतन न विसरता केले जाते. मराठीचा झेंडा पार पाकिस्तान ओलांडून पुढे अफगाणिस्तानापर्यंत फडकत होता, याची माहितीच मराठीच्या पढतपंडितांना नाही. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मराठीची पताका आजही डौलाने फडकत आहे, याचीही जाण त्यांना नाही. पंजाबातील घुमान येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्ताने तरी उत्तरेतील मराठीच्या दिग्विजयाची कहाणी समोर यायला हवी होती. तथापि, असे होताना दिसत नाही. घुमानच्या निमित्ताने उपसला जाणारा इतिहास संत नामदेवांभोवतीच घुटमळत आहे. घुमानला संत नामदेवांची समाधी आहे. त्यामुळेच तेथे संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे स्मरण होणे आवश्यकच आहे. तथापि, मराठी मातीशी सांधा असलेले घुमान हे उत्तरेतील एकमेव ठिकाण नाही. उत्तर भारतात अस्सल मराठमोळ्या महानुभाव पंथाचे प्रचंड मोठे काम आहे.  राजधानी दिल्लीसह, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या मोठ्या पट्ट्यात महानुभवांचे मठ, आश्रम आणि मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील काशी आणि इतर काही ठिकाणीही पंथाचे अस्तित्व आहे. महानुभाव पंथ उत्तर भारतात जयकृष्णी पंथ म्हणून ओळखला जातो. पंथाचे अनुयायी मराठी भाषिक नाहीत. तरीही पंथाचे रंगरूप मराठीच आहे. पुजाविधान मराठीतच आहे. पंथाचे ग्रंथही मराठीच आहेत. त्यानिमित्ताने या भागात मराठीचा जागर नित्यनेमाने सुरू असतो.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या अंतिम काळात महानुभाव पंथ उत्तरेत नेला असे मानले जाते. सर्वज्ञांच्या पश्चातही महानुभवांनी पंथप्रसारासाठी मोठे काम केलेले असावे, असे दिसते. अन्यथा आज उत्तरेत पंथाचे अस्तित्व इतक्या व्यापक प्रमाणात दिसले नसते. संत नामदेवांनी महाराष्ट्राचा भक्तिपंथ उत्तरेत नेला. महानुभावांनी मात्र मराठीलाच उत्तरेत नेले. इतकेच नव्हे, तर टिकवूनही ठेवले. पंथाची अधिकृत धर्मभाषा म्हणून मराठीला मान्यता मिळवून दिली. भारतात धर्मभाषा म्हणून मान्यता असलेली संस्कृत हीच एकमेव भाषा समजली जाते. महानुभावांनी मराठीला संस्कृताच्या बरोबरीचे स्थान दिले. बिगर मराठी अनुयायांनीही मराठीचा सन्मानाने स्वीकार केला. हे कार्य अद्वितीय आहे. यासाठी मराठी भाषा महानुभवांच्या सदैव ऋणात राहील.
पामिरच्या पठारापर्यंत
फडकावला मराठीचा झेंडा
सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या अंतिम काळातील हालचालींबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. तथापि, अंतिम समयी स्वामींनी उत्तरेकडे प्रयाण केले याबाबत सर्वांचे एकमत आहे. स्वामींनी ‘उत्तर पंथे बिजे केले’ असे पंथाचे वाङ्मय सांगते. आख्यायिकेनुसार, सर्वज्ञ प्रवास करीत थेट अफगाणिस्तानात पोहोचले. अंतिम समयी स्वामी अफगाणमधील लाल बदकशान किल्ल्यात होते. स्वामींचा विरह असह्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील दोन शिष्य त्यांना भेटायला लाल बदकशानमध्ये गेले. तथापि, स्वामींनी त्यांना भेटण्यास नकार दिला. स्वामी भेटतील या आशेवर दोन्ही शिष्य तेथेच मुक्कामी थांबले. स्वामींनी योगबलाच्या साह्याने दोघांची तेथून उचलबांगडी केली. एकाला महाराष्ट्रात आणून टाकले, तर दुस-याला पंजाबात सोडले. महाराष्ट्रातील हा शिष्य पुढे संतोषमुनी कपाटे नावाने, तर पंजाबातील शिष्य कृष्णराज पंजाबी या नावाने प्रसिद्ध झाला. चमत्काराचा भाग वगळता आख्यायिकेतील माहिती इतिहास-भुगोलाशी जुळणारी आहे. बदकशान हा अफगाणिस्तानातील एक प्रांत आहे. ताजिकिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमांना लागून असलेला हा प्रदेश प्राचीन काळापासून मौल्यवान लाल खड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या खड्याला माणिक असेही म्हणतात. इथले लाल खडे जगभरात विक्रीसाठी जात असत. महानुभावांच्या आख्यायिकेत बदकशान प्रांताच्या नावाआधी ‘लाल’ हा शब्द त्यामुळेच आला असावा. हा भाग प्राचीन काळातील रेशीम मार्गावर आहे. व्यापारी तांड्यांच्या प्रवासाचा हा मुख्य मार्ग होता. युरोपात जाण्या-येण्याचाही हा एकच मार्ग त्याकाळी उपलब्ध होता.  सर्वज्ञांच्या प्रवासाशी संबंधित आख्यायिकेला पोषक असेच हे भौगोलिक नेपथ्य आहे. महानुभावांनी आपल्या धर्माची ध्वजा अटकेच्याही पुढे पामिरच्या पठारापर्यंत नेली होती, असे दिसते. पाकिस्तानातही पंथाचे मोठे जाळे होते. कराची आणि रावळपिंडी येथे पंथाची प्रमुख ठाणी होती. फाळणीनंतर हा भाग पंथापासून हळूहळू दुरावला.
लाल बदकशानशी संबंधित आख्यायिकेला लिखित आधार नाही. तथापि, महानुभाव पंथात ही आख्यायिका परंपरेने चालत आली आहे. उत्तर भारतातील पंथाच्या सध्याच्या अस्तित्वाचे पुरावे, या आख्यायिकेला बळकटी देतात. स्वत: चक्रधर स्वामी या भागांत फिरले किंवा नाही, हे सिद्ध करणे कठीण असले तरी, त्यांचे प्रचारक या भागातून फिरले होते, हे निर्विवाद सत्य आहे.
महानुभावांचे वाङ्मय आता हिंदी आणि काही प्रमाणात इंग्रजीतही भाषांतरीत झाले आहे. तथापि, मराठी वाङ्मयाचे महत्त्व कमी झालेले नाही. उत्तर भारतातील सर्व महानुभाव आश्रमांतून मराठी शिकविली जाते. सर्व महंत आणि सेवाधा-यांना मराठी नीट समजते. बोलताही येते! महानुभावांचे उत्तरेतील मठ हे ख-या अर्थाने मराठी भाषा आणि संस्कृतीची मंदिरे आहेत. दुर्दैवाची बाब अशी की, याची माहितीच महाराष्टष्ट्रात कोणाला नाही. पंजाबातील घुमान येथे अखिल मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय झाला तेव्हा केवळ संत नामदेवांचीच आठवण महाराष्ट्राने जागवली. महानुभवांना महाराष्ट्र विसरून गेला. साहित्य संमेलनात तरी हे व्हायला नको. नामदेवांच्या समाधीमुळे पवित्र झालेल्या घुमानची माती महाराष्ट्राने आपल्या भाळावर लावायलाच हवीच; पण उत्तरेत एकच घुमान नाही, याचीही जाण ठेवायला हवी. महानुभाव वाङ्मयाचा घुमानच्या साहित्य संमेलनात योग्य सन्मान व्हायला हवा. ग्रंथदिंडीत महानुभाव ग्रंथा किमान ‘लिळाचरित्रा’चा तरी समावेश व्हायला हवा. एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
दिल्लीसह उत्त्तर भारतात
आजही आहेत महानुभाव मठ
राजधानी दिल्लीत अनेक मुख्य वसाहतींत महानुभवांची मंदिरे आहेत. अशोकनगर, गगनविहार एक्स्टेंशन, करोल बाग, पटेल नगर, प्रितमपुरा, रघुवीरनगर, रघुवीरनगर-गुजराती मोहल्ला, राजापुरी-उत्तमनगर, शक्तिनगर यांचा त्यामध्ये समावेश आहे. चांदणी चौक भागात पंथाचे जुने मंदीर होते. हिमालचल प्रदेशातील सोलन येथे पंथाचे मंदिर आहे. याशिवाय उत्तरेतील कुरुक्षेत्र, करनाल, फरिदाबाद, देहरादून, वृंदावन, सहारणपूर, मीरत, काशी या ठिकाणीही पंथाची मंदिरे आहेत.
पंजाबातील फगवाडा, लुधियाना, कपुरथळा, जालंधर चंदीगड, बटाला, अंबाला, अमृतसर येथे महानुभाव मंदिरे आहेत. उत्तरेतील सर्वाधिक महानुभाव ठाणी पंजाबातच आहेत. त्याखालोखाल क्रमांक लागतो जम्मूचा. जम्मूत महानुभवांची जवळपास १0 मंदिरे आहेत. प्रतापगड, रियासी डाक बंगला, रियासी चौक चबुतरा, वसंतनगर जानीपूर आणि निक्किया येथे ही मंदिरे आहेत.

(सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंजाबातील घुमान येथील साहित्य संमेलनानिमित्त लिहिलेला, पण काही कारणांनी अप्रकाशित राहिलेला लेख)