Sunday 8 September 2013

पाच महासती

सूर्यकान्त पळसकर

भारतीय धर्म परंपरेत सात चिरंजीव आणि पाच महासती सांगितल्या जातात. महासतींना पंचकन्या असे म्हटले जाते. अहिल्या, द्रोपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी अशी त्यांची नावे आहेत. या पौराणिक महिलांविषयी एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे.

अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।

अर्थ : अहल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांचे नित्य स्मरण केल्याने महापापांचा नाश होतो.

या पाचही जणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. पण, सौंदर्य हा सतीत्वाचा निकष नाही. सती या शब्दाचा पारंपरिक अर्थ आहे परम पवित्र स्त्री. अशी स्त्री जी आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे. त्यांना कन्या म्हटले जाते हे वरील संस्कृतात स्पष्टपणे दिसते. कन्या म्हणजे कौमार्यभंग न झालेली मुलगी अर्थात कुमारिका. महासती किंवा कन्या या दोन्ही नामांच्या अर्थाच्या दृष्टीने वरील पाचही पौराणिक महिलांचे चरित्र पूर्ण विरुद्ध आहे. या पाचांपैकी कोणीही कुमारिका नाही. त्या सर्वच विवाहित महिला आहेत. तरीही त्यांचा उल्लेख महिला असा न करता कन्या असा केला गेला आहे. तसेच पाचही जणींचे एकापेक्षा जास्त पुरूषांशी शारिरिक संबंध आले आहेत. इतकेच नव्हे, तर कुंती ही कुमारी माता आहे. तरीही त्यांना महासतसी असे संबोधले जाते. त्यांनी भारतीय जनमानसात मानाचे आणि पवित्र स्थान मिळविले आहे. त्यांना महासती आणि पंचकन्या या उपाध्या कोणत्या निकषांच्या आधारे दिल्या गेल्या, हा येथे मुख्य प्रश्न आहे.

पाच जणींच्या चरित्रात काही समान गोष्टी आहेत.
  • या पाचही जणी धाडसी आणि बंडखोर आहेत. धोपट मार्गावरून चालण्याचे त्या नाकारतात. त्यांच्या काळात रूढ असलेल्या परंपरा मोडून त्या कणखरपणे उभ्या राहतात. 
  • परंपरांचा संबंध पाप-पुण्याशी जोडलेला आहे. त्या दृष्टीने पाहता, या महिला प्रसंगी पापाचरण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत, असे दिसते.

  • परंपरांच्या छातीवर पाय दिल्यामुळे या महिलांना खडतर आयुष्याचा सामना करावा लागतो. पण, त्या संकटांसमोर रडत बसत नाहीत. कणखरपणे सामना करतात.

  • धोपट मार्ग सोडून वेगळी वाट निवडल्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. मात्र, त्याबाबत त्या खंत करीत नाहीत.
आता या पाच जणींच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करू या.

अहिल्या
संस्कृतात हिचे नाव अहल्या असे आहे. मराठीत ते अहिल्या असे रूढ आहे. ती गौतम ॠषीची पत्नी होती. दोघांना एक मुलगा झाला. तिच्या सौंदर्याने देवांचा राजा इंद्र मोहित झाला. चंद्राशी संगनमत करून त्याने तिचा उपभोग घेतला. चंद्राने कोंबडा बनून पहाटेपूर्वीच बांग दिली. तांबडे फुटले आहे, असे गृहित धरून गौतम ॠषी गंगेवर स्नानाला निघून गेले. इकडे इंद्र गौतमाचे रूप घेऊन अहिल्येच्या कुटीत शिरला. दोघांनी अंगसंग केला. आपण ज्याला कुटीत घेत आहोत, तो गौतम नसून देवराज इंद्र आहे, असे अहिल्येला कळले होते किंवा नाही? हा मुद्दा वादाचा आहे. एक परंपरा मानते की, अहिल्येला ते माहिती नव्हते. दुस-या परंपरेच्या मते हा गौतम नाही, हे तिला कळले होते. आपल्यावर बोल येऊ नये, म्हणून ती ‘नाथ आपण इतक्या लवकर कसे काय परतलातङ्क असा प्रश्न करून इंद्राला कुटीत घेते. वेषांतर केल्यामुळे अहिल्येला गौतम आणि इंद्र यांच्यातील फरक कळला नसेल, हे गृहीत धरणे बरेच कठीण आहे. अंधार असल्यामुळे अहिल्येला नीट दिसले नसेल, असे मानले तरी अंगसंग करताना तरी तिला हा आपला पती नाही, हे कळलेच असणार. परपुरूषाशी अंगसंग करणे हे पाप आहे, याची जाणीव तिला नव्हती, असेही नव्हे. तरीही इंद्रालाला अडवित नाही.

इंद्रासोबतच्या शय्यागमनाची मोठी किंमत तिला मोजावी लागते. तिच्या नशिबी शिळा होऊन पडून राहण्याचे दु:ख येते. शिळा म्हणजे पाषाण. हे एक रूपक आहे. अहिल्या शिळा झाली म्हणजे पाषाणासारखे कठीण आयुष्य तिच्या वाट्याला आले.

द्रोपदी
द्रौपदी ही द्रुपद राजाची कन्या होती. महाभारतातील युद्धाला तीच एकमेव कारण होती. ती अत्यंत महत्त्वाकांक्षी होती. त्या काळी भारतात धनुष्य बाण हे सर्वांत मोठे शस्त्र होते. कारण दुरून मारा करण्याची शक्ती त्या काळी केवळ धनुष्य बाणातच होती. भारतवर्षांत सर्वांत श्रेष्ठ धनुर्धारी आपला पती व्हावा, अशी तिची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तिने स्वयंवर रचले. मत्सयंत्राचा पण मांडला. त्याकाळचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाने हा पण जिंकला. पुढे अर्जुनासोबत त्याच्या इतर ५ भावांची पत्नी होण्याची वेळ आली तेव्हा द्रौपदी मागे हटली नाही. द्रौपदीच्या काळात भारतात बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्या काळात तिने बहुपतित्व स्वीकारले. ही प्रचंड धाडसाची गोष्ट होती. कौरवांच्या सभेत तिचे वस्त्रहरण होते, तेव्हा ती प्रचंड संतापते. ती मान खाली घालून रडत बसत नाही. आपल्या भाषणाने सभेत बसलेल्या महावीरांना लज्जित व्हायला भाग पाडते. कौरवांचा नाश करण्यासाठी आपल्या पाच पतींना उद्युक्त करते. कौरवांचा नाश होत नाही, तोपर्यंत वेणी घालणार नाही, असा पण ती करते. पुढे संपूर्ण १२ वर्षांच्या वनवासाच्या काळात ती आपले केस बांधित नाही. तिचे मोकळे केस पांडवांना धुमसत ठेवतात. शेवटी कौरवांचा नाश होतो, तेव्हा ती भीमाच्या हातांनी वेणी घालून घेते. भारती युद्धात तिला मोठी किंमत मोजावी लागते. तिचे पाच पूत्र युद्धात मारले जातात.

कुंती
पाच महासतींपैकी कुंती सर्वाधिक बंडखोर आहे. कुंतीच्या कथेमधील अतक्र्य आणि चमत्कारांचा भाग बाजूला काढल्यास जे कथाभाग उरतो, तो प्रचंड विस्फोटक आहे. ती कुमारी माता आहे. कर्ण हा तिचा लग्नाच्या आधीचा मुलगा आहे. तिचे दुर्दैव पाहा. लग्न झाल्यानंतर ती आपल्या नव-यापासून शरीर सुख घेऊ शकत नाही. पंडू हा आजारी आणि अशक्त असतो. पण ती डगमगत नाही. त्यातून ती मार्ग काढते. ती ५ मुलांना जन्म देते. इतकेच नव्हे, तर या मुलांचा जन्म धर्मसंमत ठरविते. कुमारी माता होण्याची मोठी किंमत तिला मोजावी लागते. तिचा मोठा मुलगा कर्ण हा तिचाच दुसरा मुलगा अर्जुन याच्याकडून मारला जातो.

तारा
भारतीय पुराणेतिहासात दोन तारा आहेत. एक तारा ही देवांचा पुरोहित बृहस्पती याची पत्नी आहे, तर दुसरी रामायणातील वानरराज वाली याची पत्नी आहे. दोघींचे आयुष्य खडतर आहे. दोघींचेही अपहरण होते. दोघीही अत्यंत धोरणी आहेत. दोघींपैकी महासती तारा कोणती, याबाबत काहीच स्पष्टता नाही. येथे आपण दोन्ही तारांचा विचार करू या.

१. पुराणांमधील तारा : ही देवांचा पुरोहित बृहस्पती याची पत्नी आहे. भारतातील सर्वांत मोठा क्षत्रिय वंश असलेल्या चंद्रवंशाची ती जननी आहे. ती सौंदर्यवती होती. तिचे सौंदर्य पाहून चंद्र तिच्यावर भाळतो. बृहस्पतीच्या अनुपस्थितीत चंद्र तिचे अपहरण करतो. आपली पत्नी आपल्याला परत मिळावी यासाठी बृहस्पती देवांकडे दाद मागतो. मात्र, तिच्या मुद्यावर देवांमध्ये मतभेद होतात. काही देव बृहस्पतीच्या बाजूने तर काही चंद्राच्या बाजूने होतात. असूर चंद्राची बाजू घेतात. यावरून देव आणि असूरांत घनघोर युद्ध होते. ॠषि अंगिरा शिष्टाई करून ब्रह्मदेवाला मध्यस्थी करायला लावतात. ब्रह्मदेव चंद्राची कान उघाडणी करून बृहस्पतीची पत्नी परत करण्यास सांगतो. चंद्र ताराला बृहस्पतीच्या स्वाधीन करतो. पण, तोपर्यंत उशीर झालेला असतो. ताराच्या पोटात चंद्राचा गर्भ आधीच राहिलेला असतो. ताराला चंद्रापासून मुलगा होतो. त्याचे नाव बुध. तो प्रचंड बुद्धीमान असतो, म्हणून त्याचे नाव बुध असे ठेवले जाते. बुधाची पत्नी इला. बुध आणि इलेचा मुलगा पुरूरवा. पुरूरवा हा पुराणेतिहासातील पहिला चंद्रवंशी राजा होय. त्याचे लग्न उर्वशीशी होते.
१. रामायणातील तारा : ही वालीची पत्नी आहे, ती  अत्यंत मुत्सद्दी आहे. वालीचा प्रभू रामचंद्रांकडून वध झाल्यानंतर ताराचा मुत्सद्दीपणा प्रखरपणे नजरेत भरतो. वाली ठार झाल्यानंतर ती वालीचा भाऊ सुग्रीव याच्याशी लग्न करते. वालीपासून तिला आधीच एक मुलगा असतो. त्याचे नाव अंगद. राज्याचा वारस अंगद होणार असेल, तरच मी तुझ्याशी लग्न करीन, अशी अट ती सुग्रीवासमोर ठेवते. सुग्रीव ती मान्य करतो. पुढे किश्किंधेचे राज्य अंगदाला मिळते. 

मंदोदरी
मंदोदरी ही लंकापती रावणाची पट्टराणी आहे. महासतींमध्ये प्रभूरामचंद्राची पत्नी सीता हिचा समावेश करण्याऐवजी मंदोदरीचा समावेश करण्यात आला आहे. ही बाब अत्यंत विचक्षण आहे. मंदोदरी हिच्याबद्दल असंख्य आख्यायिका आहेत. रावण सीतेचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन येतो, तेव्हा रावणाला ती खडे बोल सुनावते. कदाचित मंदोदरीमुळे सीता लंकेत सुरक्षित राहू शकली असावी. रामासोबतच्या युद्धात तिचा पती रावणच नव्हे, तर इंद्रजितासह तिचे सारे पुत्र मारले जातात. युद्धानंतर ती रावणाचा धाकटा भाऊ विभिषण याच्याशी लग्न करते. विभिषणाच्या राज्यातही तीच पट्टराणी असते.

3 comments:

  1. सुंदर..अभ्यासपूर्ण विवेचन.

    ReplyDelete
  2. आदरणीय सर,
    लेख फारच सुंदर आहे. खूप आवडला. "अश्रू हा स्त्रियांचा दागिणा आहे", असे मी लहानपणी कुठे तरी वाचले होते. हा विचार मनावर पक्का बिंबलेला होता. तुमचा लेख वाचल्यानंतर या विचारांना धक्का बसला. अनेक वर्षे मनात सिद्धांतासारखा जपलेला विचार क्षणार्धात खोटा असल्याचे जाणवते, तेव्हा खरोखरच धक्का बसतो. या लेखात वर्णिलेल्या महिला मुळमुळू रडणा-या नव्हत्या हे तुम्ही दाखवून दिले आहे. आपल्या शास्त्रालाही रडणे मंजूर नाही. या स्त्रिया प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. त्या नुसत्याच महत्त्वाकांक्षी नाहीत, तर महत्त्वाकांक्षा वास्तवात आणण्यासाठी लागणारा धोरणीपणा त्यांच्याकडे आहे. प्रसंगी बंडखोरी करण्याचे हिंमत आहे. परिस्थिती कोणतीही असो, तिचा आपल्या ध्येयासाठी लाभ उठविण्याची धमक त्यांच्यात आहे. त्या संधीसाधू आहेत, असे क्षणभर वाटून जाते. पण संधीचे सोने करण्यात वाईट काय असा विचार आपण दुस-या बाजूने करू शकतो. आपले पूर्वज खरोखर महान होते. त्यांनी धाडसी स्त्रियांना महासतींचा दर्जा दिला.
    पळसकर सर उत्कृष्ट लेख वाचायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete