Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts
Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts

Monday, 30 July 2018

राजकारण, धर्मकारण आणि गुन्हेगारी

मानवी समाज हा राजकारण, धर्मकारण आणि गुन्हेगारी या तीन सत्तांनी नियंत्रित होतो. मानवी समाजात या तिन्ही सत्तांचा उदय एकाच वेळी झालेला आहे. राज्य, धर्म आणि गुन्हेगारी यांचा मिळून एक त्रिकोण आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता जुळ््या भावंडांसारख्या आहेत. यांच्यात कोणताच भेद नाही. या दोन्ही सत्तांपासून समान अंतरावर गुन्हेगारी आहे. गुन्हेगारी अशा बिंदूवर आहे, जेथे राज्य आणि धर्म यांच्या रेषा येऊन मिळतात आणि एक त्रिकोण सांधला जातो.

गुन्हेगारांची लंगडी सत्ता
गुन्हेगारी सत्ता ही ‘धाक’ या एकाच पायावर उभी आहे. त्यामुळे ही सत्ता लंगडी आहे. अधुरी आहे. परिपूर्ण नाही. राजकीय आणि धार्मिक सत्तांना मात्र धाक आणि आश्वासन असे दोन पाय आहेत. त्यामुळे या दोन्ही सत्ताच खºया अर्थाने सत्ता आहेत. धाक आणि आश्वासन यांना कोणतीच मर्यादा नसल्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील नेत्यांच्या हाती अमर्याद सत्ता एकवटली आहे. गुन्हेगारांना टिकून राहण्यासाठी नेहमीच राजकीय आणि धार्मिक नेत्यांचा आधार घ्यावा लागला आहे. दाऊद इब्राहिम स्वबळावर जगूच शकत नाही. राजसत्तेचे पाठबळ नसेल, तर त्याचे क्षणात एन्काउंटर होईल.

नरकाचा धाक अन् स्वर्गाचे आश्वासनराजकीय नेत्यांची सत्ता कायद्याचा धाक आणि लोककल्याणाचे आश्वासन यावर चालते. धार्मिक सत्ता नरकाचा धाक आणि स्वर्गाचे आश्वासन यावर चालते. राजकीय नेते कशाचेही आश्वासन देऊ शकतात. आधीचे आश्वासन लोकांनी विसरावे यासाठी दुसरे आश्वासन दिले जाते. भय आणि भूकेपासून देशाला मुक्त करण्याचे आश्वासन देऊन वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर १५-१६ वर्षांनी अशाच आशयाची आश्वासने देऊन मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. पण देश ना भयमुक्त झाला ना भूकमुक्त. उलट संपूर्ण देशावर सध्या भीतीचे सावट आहे. दिल्लीतील ताज्या भूकबळींनी भुकमुक्तीच्या घोषणेचीही पोलखोल केली आहे. गरिबी हटावच्या घोषणा तर या देशातील सर्व राजकीय नेत्यांनी दिल्या आहेत. गरिबी हटविणे हा या घोषणेमागील उद्देश नसतो, त्यांना सरकारला सत्तेवरून हटवायचे असते. संपूर्ण जगात हीच स्थिती आहे. कोणताही देश याला अपवाद नाही. 

सेवा करण्यासाठी कोणाला मंत्रीपद हवे आहे?
राजकीय आणि धार्मिक नेत्यांच्या तोंडी लोककल्याण हा परवलीचा शब्द म्हणजे नुसतेच शब्दांचे बुडबुडे आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी कोणाला मंत्रीपद हवे आहे? सेवाच करायची, तर मंत्रीपदच कशाला हवे? धर्मगुरू आणि पुरोहितांचेही तसेच आहे. यजमानाला पुण्य मिळावे म्हणून कोण भटजी अभिषेकाचे मंत्र म्हणतो? भटजींचा मतलब दक्षिणेपुरता आहे. आपल्याला जवळचे म्हणून भटजींचे उदाहरण दिले. सर्वच धर्मांत हीच स्थिती आहे.

खरोखर लोककल्याणाची तळमळ असलेले राजकीय आणि धार्मिक नेतेही या पृथ्वीतलावर होऊन गेले आहेत. पुढेही होतील. सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा गांधी यांसारखे राजकीय क्षेत्रातील नेते; तर बुद्ध-महावीर, नामेदव-तुकाराम, ख्रिस्त-मोहंमद यांसारखे धार्मिक क्षेत्रातील नेते ही याची काही मोजकी उदाहरणे आहेत. तथापि, असे सच्चे राजकीय-धार्मिक नेते हजार-पाचशे वर्षांतून एकदाच जन्म घेतात. त्यांच्या पश्चात खोटी माणसे पुन्हा या सत्तांचा ताबा घेतात.

खोटेपणाच्या पायावर उभा असलेला धर्म माणसाचे कोणतेही भले करू शकत नाही. राजकारण्यांकडून तर अपेक्षा करणेच चूक आहे.
-सूर्यकांत पळसकर