Showing posts with label पुराणेतिहास. Show all posts
Showing posts with label पुराणेतिहास. Show all posts
Tuesday, 10 September 2013
Monday, 9 September 2013
भगवान श्रीकृष्णाचा वंश
भारतीय पुराणेतिहासात तसेच आधुनिक इतिहासात महत्त्व असलेले प्रमुख दोन क्षत्रिय वंश आहेत.
१. सूर्यवंश
२. चंद्रवंश.
सूर्यवंशात प्रभू रामाचा तर चंद्रवंशात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाला यादव, माधव, वाष्र्णेय अशी नावे आहेत. ही सर्व नावे वंशनिदर्शक आहेत. याचे विश्लेषण आपण लेखात पुढे पाहणारच आहोत.
चंद्रवंश हा भारतातील सर्वांत मोठा राजवंश आहे. सर्वांत यशस्वी राजवंश म्हणूनही याच्याकडेच अंगुलीनिर्देश करावा लागतो. ज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडले तो राजा भरत याच वंशातील आहे. महाभारतातील युद्धाला कारणीभूत असलेले कौरव-पांडव याच राजवंशातील आहेत. इतकेच नव्हे, तर भारती युद्धात सहभागी झालेले बहुतांश राजेही याच वंशातील आहेत. ययाति-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, पुरूरवा-उर्वशी अशा महानायक-नायिकांच्या जोड्या या चंद्रवंशाने भारताला दिल्या. कंस, जरासंध, दुर्योधन, शिशूपाल ही मोठी खलनायक मंडळीही याच वंशाने दिली. परशुरामाशी वैर घेणारे हैहय कुळातील राजे हे चंद्रवंशीच आहेत. नहुष हा चंद्रवंशातील पहिला ऐहिक पुरूष म्हणायला हवा. इंद्राची पत्नी शचि हिची इच्छा धरल्यामुळे नहुषाच्या नशिबी बदनामी आली. तथापि, तो अत्यंत पराक्रमी होता. त्याला ६ मुले होती. राजा ययाति हा त्याचा क्रमांक दोनचा मुलगा. वि. स. खांडेकरांनी आपल्या "ययाति" या कादंबरीत याचेच चरित्र वर्णिले आहे.
एखाद्या राजाला जेव्हा अनेक कर्तत्ववान मुले असतात, तेव्हा तो वंश विभागला जातो. वंशावळ स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक मुलाच्या नावे वंशावळ दिली जाते. ज्या वंशात जास्त राजकीय घडामोडी घडतात, तो वंश जास्त चर्चेत राहतो. मान्यता पावतो. त्यादृष्टीने चंद्रवंशाच्या दोन मुख्य शाखा ठरतात. पहिली शाखा ययातिचा थोरला मुलगा यदू याच्यापासून तर दुसरी शाखा ययातिचा धाकटा मुलगा पुरू याच्यापासून सुरू होते. भारताचा संपूर्ण पुराणेतिहास या दोघांच्या वंशाचा इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यदू हा शुक्राचार्याची कन्या देवयानी हिचा पूत्र होता. पुरू हा असूर कन्या शरमिष्ठा हिचा पूत्र होता. पुरूच्या वंशात कौरव-पांडव जन्मले. यदूच्या वंशात भगवान श्रीकृष्ण जन्मले. चंद्रवंशात यदूची शाखा सर्वांत मोठी आहे. यदूच्या वंशजांना यादव म्हटले जाते. यदूचे वंशज म्हणून यादव. यादववंश हा भारताच्या अनेक भागांत पसरलेला आहे. संपूर्ण उत्तर भारत, बंगाल, ओरिसा आणि महाराष्ट्र एवढ्या मोठ्या भूभागावर आजही यादव वंश आढळतो. महाराष्ट्रातील देवगिरीचे राजघराणे यादव वंशी होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई यादववंशीच होत. सिंदखेडच्या जाधव घराण्यात जिजाऊंचा जन्म झाला. जाधवराव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज समजले जातात. यादव राजे आपल्याला श्रीकृष्णाचे वंशज समजत. जिजाऊंचे पती शहाजीराजे मात्र सूर्यवंशातील आहेत.
भगवान श्रीकृष्ण ही चंद्रवंशातील सर्वांत महान व्यक्तिरेखा होय. श्रीकृष्णाला यादव, वाष्र्णेय, माधव अशा उपाध्या महाभारत आणि इतर ग्रंथांत लावलेल्या दिसून येतात. या सर्व उपाध्या श्रीकृष्णाच्या वांशिक परंपरा स्पष्ट करतात. यदूवंशातील हैहय कुळात पुढे वीतिहोत्र राजा झाला. वीतिहोत्र याचा पुत्र मधु. मधुने मोठा पराक्रम गाजविला. त्याच्या नावावरून या वंशाला पुढे माधव हे नाव पडले. म्हणून श्रीकृष्णाला माधव म्हटले जाते. राजा मधुला १०० मुले होती. त्याच्या थोरल्या मुलाचे नाव होते वृष्णि. वृष्णिच्या नावावरून या वंशाला वाष्र्णेय असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्ण हा वृष्णिचा १४ वा वंशज ठरतो.
Subscribe to:
Posts (Atom)