Sunday, 18 January 2015

जगात काय चालले ते तरी पाहा!

सूर्यकांत पळसकर


७ हजार वर्षांपूर्वी भारतात आजच्या अमेरिकेकडील विमानांपेक्षाही अधिक प्रगत विमाने होती, असा दावा मुंबईत भरलेल्या १०२ व्या विज्ञान परिषदेत करण्यात आला. यासंबंधीचा एक शोधनिबंध भारतीय हवाई दलाचे एक माजी अधिकारी कॅ. आनंद जयराम बोडस यांनी परिषदेत सादर केला. विज्ञानाचे काय व्हायचे ते होईल, पण या निबंधाने बोडस हे जगभरात प्रसिद्ध झाले. एएफपी या जागतिक वृत्तसंस्थेने त्यांची दखल घेऊन त्यांचे छायाचित्र आणि वृत्तांत जारी केला. या परिषदेत भारतातील ७ हजार वर्षांपूर्वीच्या पौराणिक प्रगतीच्या नावाने बेंडकुळ्या फुगवून दाखविल्या जात होत्या, तेव्हा युरोप अमेरिकेत नेमके काय सुरू होते, हे पाहणे अत्यंत मनोरंजक ठरेल.
अमेरिकेच्या लास वेगास शहरात ‘कंझुमर्स इलेक्ट इलेक्ट्रॉनिक्स शो'मध्ये सादर करण्यात आलेले क्वॉडकॉप्टर. 
जानेवारी २०१५ च्या पहिल्या आठवड्यात मुंबईत १०२ वी विज्ञान परिषद झाली.  त्याच आठवड्यात अमेरिकेच्या लास वेगास शहरात ‘कंझुमर्स इलेक्ट्रॉनिक्स शो' झाला. या शोमध्ये पुराणांतील दंतकथांनाही लाजवतील अशी शेकडो इलेक्ट्रॉनिक उपकरणे सादर करण्यात आली. या शोमध्ये क्वॉडकॉप्टर नावाचे हेलिकॉप्टरच्या पुढचे उपकरण सादर करण्यात आले. लहान मुलांच्या खेळण्यात शोभणारे हे उपकरण चालक रहित ड्रोन विमानच आहे. ते आकाशात १८ मिनिटे उडू शकते. त्यात व्हिडिओ शुटिंग आणि स्थिर छायाचित्रण करण्याची सोय आहे. पोलिस आणि लष्करासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. युरोप-अमेरिकेतील शास्त्रज्ञ पुढच्या पिढीतील विमाने विकसित करण्यासाठी धडपडत असताना आपले शास्त्रज्ञ ७ हजार वर्षांपूर्वीच्या नसलेल्या विमानांचा शोध घेत आहेत.
अमेरिकेच्या लास वेगास शहरात ‘कंझुमर्स इलेक्ट इलेक्ट्रॉनिक्स शो'मध्ये सादर करण्यात आलेले सौर ऊर्जेवर चालणारे स्कूटर.
 लास वेगासमधील याच इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे स्कूटर सादर करण्यात आले. या स्कूटरला अत्याधुनिक सोलार पॅनलचे छत बसविण्यात आले आहे. हे सोलार पॅनल ९० वॅट वीजेची निर्मिती करते. त्यावर स्कूटर एका दिवसात १५ किमी धावू शकते. सूर्यप्रकाश हे मोफतचे इंधन आहे. त्याचा वापर वाहने चालविण्यासाठी कसा करता येईल, याची खटपट युरोप-अमेरिकेतील शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. युरोप अमेरिकेच्या तुलनेत भारतात १०० पट अधिक सूर्यप्रकाश आहे. मात्र, त्याचा वापर करून वाहने पळविता येऊ शकतात, हे आपल्या शास्त्रज्ञांच्या गावीही नाही.
सिएटलमधील एका कंपनीने मानवी मल-मुत्रापासून काढलेले
शुद्ध पाणी पिताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स.
याच आठवड्यात आणखी एक क्रांतीकारी घटना अमेरिकेत घडली. मानवी मल-मूत्रातील पाणी पिता येईल, इतके शुद्ध करण्याचा प्रयोग सिएटलमधील एका कंपनीने यशस्वी केला. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांनी हे पाणी प्राशनही केले. बिल गेट्स यांनी या संशोधन प्रकल्पाला आर्थिक पुरवठा केला आहे. त्यांची ही सारी खटपट भारतासारख्या तिस-या जगातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी चालली आहे. भारतातील अब्जाधीशांना असा एखादा प्रकल्प हाती घेण्याचे का सूचले नाही? किमानपक्षी सरकारला तरी का सूचले नाही?

भारत आणि पाश्चात्य देशांतील मूलभूत फरक यातून दिसून येतो. आपल्या नजरा सातत्याने भूतकाळात (नसलेले) वैभव शोधत आल्या आहेत. या उलट युरोप-अमेरिकेने भविष्यातील तंत्रज्ञान शोधण्यावर भर दिला आहे. जगात आज उपलब्ध असलेले बहुतांश तंत्रज्ञान पाश्चात्यांनीच शोधले आहे. या शोधांतील भारताचा वाटा शून्य आहे. हे शून्य भरुन काढण्यासाठी एक वर्ग मिथकांना वास्तव समजून मिथ्या दावे करीत आहे. उद्या  अधिक ताकदवान क्वाडकॉप्टरे विकसित होतील, सौरउर्जेवर वाहने धावायला लागतील.  त्यावेळी भारतात काय होईल? हळूच आणखी एखादा कॅ. बोडस पुराणांतील संदर्भ शोधून काढील. "आमच्याकडे ७ हजार वर्षांपूर्वीच क्वॉडकॉप्टर उडत होते. १० हजार वर्षांपूर्वीच सौरउर्जेवर वाहने धावत होती"! असा दावा करील.   भविष्यातील या बोडसाच्या विधानावर शास्त्रज्ञ म्हणविणारी मंडळीही टाळ्या वाजवतील. 

No comments:

Post a Comment