Wednesday, 26 November 2014

शून्य सेनेचे सेनापती!

सूर्यकांत पळसकर

'काळ प्रतिकूल आहे, तोपर्यंत शत्रूला डोक्यावर घेऊन नाचा. काळ अनुकूल होताच त्याला डोक्यावरूनच खाली आपटा', असे चाणक्याचे एक वचन असल्याचे सांगितले जाते. ‘सांगितले जाते, असे विधान यासाठी केले, की त्याची वैधता तपासण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. आपल्याला हवा असलेला विचार कोणा तरी ऐतिहासिक अथवा पौराणिक व्यक्तीच्या नावे खपवला, की त्याला वैधता प्राप्त होत असते! प्राचीन काळापासून ही खपवाखपवी आपल्याकडे सुरू आहे. चाणक्याच्या नावे तर अचाट विचार रोजच्या रोज प्रसृत होत असतात. त्यात भर म्हणजे चाणक्याचे पेटंट आरएसएसच्या नावे आहे. परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे चाणक्याने सांगितलेल्या मार्गावरून चालणे भाजपासाठी बंधनकारक आहे! हे सारे समजून घेतले, की भाजपा आपल्या मित्रपक्षांना डोक्यापर्यंत उचलून-उचलून का पटक्या देत आहे, याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज भासणार नाही; पण चाणक्याची शत्रूविषयक नीती आणि भाजपाची महाराष्ट्रातील राजकीय धोरणे यांचा मेळ घालताना अनेक पट्टीचे स्वयंसेवकही अवघडून गेले आहेत. वर दिलेला चाणक्य विचार हा शत्रूंसाठी आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेपासून शिवसंग्रामपर्यंतचे सर्व मित्रपक्ष काही पाकिस्तानातील नाहीत. मग त्यांना डोक्यावरून उचलून पटकायचे कारण काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा प्रश्नार्थींसाठी चाणक्याने सांगितलेला दुसरा एक विचार उपयुक्त ठरू शकेल. हा विचार म्हणतो, की ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नाही अन् कायमस्वरूपी शत्रू नाही!' शत्रू काय नुसते पाकिस्तानातच असतात? राजकारणातले विरोधक हे शत्रूच. त्यांच्यासोबत करायचा व्यवहार चाणक्याने सांगितलेल्या नीतीने करण्यातच खरा मुत्सद्दीपणा आहे, असा याचा अर्थ.

परिवारातील थिंक टँकवाले कोणत्याही प्रश्नांनी विचलित होत नाहीत. प्रत्येक कृतीच्या समर्थनार्थ विचारांचा पुरवठा ते करू शकतात. परिवाराच्या थिंक टँकचे सामर्थ्य खरोखरच अचाट आहे. ते बघून साक्षात चाणक्यही स्वर्गात हसला असेल. विशेषतः रिपाइं नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सध्या जी फजिती सुरू आहे, ती पाहून तर तो खदाखदा हसला असेल. या नेत्यांनी आधीच चाणक्य वाचला असता, तर अशी फसगत वाट्याला आली नसती! खरे म्हणजे, २५ वर्षांपासूनचा जिगरी दोस्त असलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने झुलवत-झुलवत झुरळासारखे झटकून टाकले, तेव्हाच आठवले-जानकरादी मित्रांनी सावध व्हायला हवे होते; पण तसे घडले नाही. भाजपासोबत महायुती करून त्यांनी निवडणूक लढविली. भाजपाने मोठ्या मनाने (?) त्यांना २५ जागा दिल्या. आठवले यांना त्यातल्या १४ जागा मिळाल्या होत्या. आठवले एवढे जोशात होते, की निवडणुकीनंतर सत्तेवर येणा-या सरकारमध्ये आपणच उपमुख्यमंत्री होणार, अशी घोषणाच त्यांनी करून टाकली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर महादेव जानकर अक्षरशः भारावून गेले होते. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांनी विधानभवनाच्या पायèयांवर लोटांगण घातले होते. भावनाविवश झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते; पण राजकारण हा सर्वाधिक क्रूर खेळ आहे, तो भावनेवर चालत नाही. शिवसेनेला फेकले त्याप्रमाणे आठवले-जानकरादी मित्रांनाही आता भाजपाने फेकून दिले आहे.

मटका आकड्यावर चालतो. लोकशाहीही आकड्यावरच चालते. ज्याचा आकडा मोठा तो शेर. शिवसेनेकडे किमान ६३ आमदारांचा आकडा तरी आहे. त्या बळावर ते विरोधी पक्ष म्हणून का होईना, पण ताठ उभे आहेत. बार्गेनिंगची शक्ती राखून आहेत. आठवले-जानकरादी नेत्यांचे तसे नाही. जानकरांकडे दौंडचे राहुल कुल यांच्या रूपाने एकुलता एक आमदार आहे. आठवले, शेट्टी, मेटे हे शून्य सेनेचे सेनापती ठरले आहेत. त्यांचा एकही आमदार विधानसभेत नाही. आठवले-जानकरादी नेत्यांकडे छोट्या-छोट्या जाती-समूहांची ताकद होती, ती भाजपाला मिळाली. त्यातून भाजपाची विधानसभेतील सदस्यसंख्या ४४ वरून १२२ झाली. याच्या बदल्यात भाजपाची मते मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात जायला हवी होती; मात्र ती गेली नाहीत. ही मते मित्रपक्षांऐवजी शिवसेनेच्या उमेदवाराकडे गेली. तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

रामदास आठवले यांच्या पक्षाने परवा याबद्दल नाराजी व्यक्त केली; पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. असल्या नाराज्या हवेच्या झुळकीसरशी उडून जातात. निवडणुकीआधीच आणाभाका पक्क्या करून घ्यायला हव्या होत्या किंवा निवडणूक संपल्यानंतर लगेच या मुद्याला तोंड फोडायला हवे होते; पण सरकारात आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा या नेत्यांना होती. त्या आशेपोटी ते गप्प बसले. ६३ आमदार असतानाही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणारा भाजपा शून्य सेनेच्या सेनापतींना सत्तेत खरेच वाटा देईल काय?

मित्रपक्ष ही राजकारणातील एक मोठी कटकट आहे, हा नवा विचार भाजपाने आत्मसात केला आहे. हा भाजपाचा अनुभवसिद्ध विचार आहे. वाजपेयी सरकार असल्यापासून मित्रपक्षांची कटकट भाजपा सोशीत आला आहे. त्यापासून मुक्ती मिळवायची, असा त्यांचा आताचा निर्धार दिसतो. मित्रपक्षांकडून शक्ती मिळवून बलवान व्हायचे, हे या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवायचे सूत्र दिसते. महाराष्टड्ढ विधानसभा निवडणुकीत त्याचेच प्रत्यंतर आले. हे सूत्र वापरताना भाजपाच्या खेळ्या मात्र अत्यंत सावध आहेत. ‘नाही म्हणायचे नाही आणि काही द्यायचेही नाही', अशी ही खेळी आहे. आपल्याला बोल लागणार नाही, याची काळजी मात्र हा पक्ष घेत आहे. मित्रपक्षांना सत्तेत वाटा देणार का, या प्रश्नावर ‘चर्चा सुरू आहे', असे ठेवणीतले उत्तर भाजपा नेत्यांकडून दिले जाते. हा सावधपणाचा भाग आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्यामुळे सावधपणेच पाहावे लागते.

(प्रसिद्धी : लोकमत २४ नोव्हेंबर २०१४)

No comments:

Post a Comment