Sunday 8 September 2013

प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते

सूर्यकांत पळसकर

महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जोरदार धुमशान सुरू आहे.पण श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. मुळात प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंध झाल्याशिवाय श्रद्धाळू होताच येत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत ‘मामेकं शरणं’ असा स्पष्ट आदेशच दिला आहे. श्रीकृष्णाचा हा आदेश ‘फार बुद्धी चालवू नकोस’ या पातळीवरचा आहे. श्रद्धेत बुद्धीवर भावनेचा कंट्रोल असतो. बुद्धी वापरली तर देवळातली मूतीं दगड ठरते. भावना वापरली तर मात्र हाच दगड ठेव ठरतो.हे द्वंद्व तुकोबांनी फार सुंदर पद्धतीने मांडले आहे. तुकोबा म्हणतात :

पाषाण देव पाषाण पायरी ।
पूजा एका वरी पाय ठेवी ।।

मंदिराची पायरी आणि गाभा-यातील मूर्ती दोन्ही दगडाच्याच आहेत. पण, आपण एका दगडावर पाय ठेवतो आणि दुस-याची पूजा करतो. गाभा-यातील दगड हा दगड नसून देव आहे, असे “मानावे” लागते. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा आंधळीच आहे. डोळस किंवा विज्ञानवादी श्रद्धा नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही.

श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे ठरवायचे कोणी? त्याचे निकष काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा, या विष्यीच्या व्याख्या भ्रामक आहेत. आपल्या देवघरातील देवाला साजूक तुपातला नैवेद्य ठेवणे आणि गावकुसाबाहेरच्या मरी आईला बक-याच्या सागुतीचा नैवेद्य ठेवणे या दोन गोष्टींत ‘भावा’च्या पातळीवर कोणताही फरक नाही. पण, श्रद्धा-अंधश्रद्धेचा विषय येतो, तेव्हा यात आपण फरक करतो. देवघरातील देवाचा साजूक तुपातला नैवेद्य श्रद्धा ठरतो, तर म्हसोबाचा बोकडाचा नैवेद्य अंधश्रद्धा! हा दाभोळकर-मानव यांच्या प्रचार तंत्राचा परिणाम आहे का? नैवेद्य म्हणजे आपल्या नित्याच्या जेवणातील देवासाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेला भाग. ज्याचा जो आहार असेल, तोच नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवणे हे नैसगिंक आहे. प्रभूरामाने लंकेवर स्वारी करण्यापूवीं रामेश्वराला मांसाचाच नैवेद्य दाखविला होता.

जादूटोणा विरोधी कायदा श्रद्धेच्या विरोधात नाही; जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे करणे आदी गोष्टींच्या विरोधात आहे, असे म्हटले जाते. जादूटोणा, जारण-मारण, अंगात येणे, अंगारे-धुपारे आदि सर्व गोष्टी अंनिसने अंधश्रद्धेच्या यादीत टाकल्या आहेत. हा निकष तंतोतंत पाळायचे म्हटले तर आपले सगळे वेद, उपनिषदे, पुराणे अंधश्रद्धेच्या यादीत जाऊन निषिद्ध ठरतील. “अंगात संचार होणे” याचे एकच उदाहरण येथे आपण पाहू या. अंगात येणे, हा प्रकार भारतातील आदिवासी टोळ्यांतील एक प्रथा आहे, असे मानले जाते. पण, ते काही खरे नाही. वैदिक वाङ्मयात संचार होण्याशी संबंधित शेकडो कथा आहेत. बृहदारण्यक उपनिषदातली एक कथा येथे पुराव्यासाठी देतो.

गंधर्वगृहिता पतंचलकन्या!
विदेह देशाचा राजा जनक याने एकदा महायज्ञ केला. कुरू आणि पांचाल देशांतील ब्राह्मण यज्ञाला जमले. जमलेल्या ब्राह्मणांपैकी प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ कोण आहे, हे जाणण्याची जनकाला इच्छा झाली. त्याने प्रत्येक शिंगाला एक पाद बांधलेल्या १ हजार गायी गोशाळेत बांधल्या. (पाद म्हणजे सोन्याचे नाणे.) जनक म्हणाला : ‘ब्राह्मणहो, तुमच्यामध्ये जो ब्रह्मिष्ठ (ब्राह्मणांत सर्वश्रेष्ठ) असेल त्याने या गायी घेऊन जावे!’ कोणाही ब्राह्मणास हिंमत होईना. तेव्हा याज्ञवल्क्याने आपल्या सामश्रवा नामक शिष्याला गायी घेऊन जाण्याची आज्ञा केली. तो गायी नेऊ लागला, तेव्हा इतर ब्राह्मणांना क्रोध आला. ते त्याची परीक्षा घेण्यासाठी धावले. प्रश्न विचारू लागले. जनकाचा होता अश्वल याने आधी प्रश्न केले. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्याने दिली. नंतर जरत्कारूगोत्रोत्पन्न आर्तभाग याने प्रश्न केले. याज्ञवल्क्याने त्यालाही गप्प केले. त्यानंतर लह्याचा पुत्र भुज्यु याने प्रश्न केले. भुज्यु म्हणाला : ‘याज्ञवल्क्या, आम्ही मद्रदेशामध्ये प्रवास करीत होतो. आम्ही कपिगोत्री पतंचलाच्या घरी गेलो. त्याच्या मुलीच्या अंगामध्ये एक गंधर्व येत असे. आम्ही त्या गंधर्वाला विचारले की, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी अंगिरसगोत्री सुधन्वा आहे.’

या कथेतील भुज्यूच्या निवेदनाशी संबंधित मूळ श्लोक असे :

अथ हैनं भुज्युर्लाह्यायनि पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच ।
मद्रेषु चरका पर्यव्रजाम ते पतंचलस्य काप्यस्य गृहानैम ।
तस्यासीद्दुहिता गन्धर्वगृहिता, तमपृच्छाम कोऽसीति ।
सोऽब्रवीत सुधन्वाऽन्गिरस…।
-बृहदारण्यकोपनिषद. अध्याय तिसरा. ब्राह्मण तिसरे. श्लोक पहिला.

पतंचल ब्राह्मणाच्या मुलीच्या अंगात येत असे. ती ‘गन्धर्वगृहिता’ म्हणजे गंधर्वाने पछाडलेली होती. गंधर्व तिच्या मुखातून बोलत असे. असा हा कथाभाग आहे. अशा कथांचे काय करायचे? तुकोबांनी दिलेला दगडाचा दृष्टांत या कथांनाही लागू होतो. त्यांच्यावर पाय देऊन पुढे जायचे की पूजा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझा देव दुसर्यासाठी दगड ठरतो, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जो वाद सुरु आहे, त्यच्या मुळाशी हीच समस्या आहे.

6 comments:

  1. 100% Agree. Very good.

    ReplyDelete
  2. अपयश ही जशी यशाची पहिली पायरी म्हटली जाते, तशी श्रद्धा ही सुद्धा अंधश्रद्धेची पहिली पायरी आहे. हे विधान किती लोकांना कितपत समजेल, उमजेल याबद्दल मला शंकाच वाटते. परंतु हे विधान १००% खरे आहे. कोणती तरी अदृश्य, अज्ञात शक्ती, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा असून तो या जगाचा निर्माता, नियंता, पालनकर्ता, संहारकर्ता, कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं असा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आहे. अशा विचाराला, या कल्पनेला श्रद्धा म्हटले जाते, या विचाराने प्रेरित होऊन जर त्या ईश्वराकडे काही मागणे केले तर त्यास श्रद्धायुक्त प्रार्थना म्हटले जाते, त्यासाठी केल्या जाणाऱ्या कृतींना, कर्मकांडांना पूजा म्हटले जाते, त्या काल्पनिक देवास आपणच नाव ठेवून त्याचा जयघोष कारीत नाचणे-गाणे यास भक्ती म्हणतात. या कृतींना धर्माच्या ठेकेदारांनी श्रेष्ठ कर्म ठरविले आहे. परंतु कोणती तरी तशीच अदृश्य शक्तिमान उर्जा असून ती आपले वाईट, अकल्याण अहित करीत असते, ती भूत, हडळ, शैतान, समंध, प्रेतात्मा आदि स्वरुपात असते, (ख्रिश्चन त्यास शैतान म्हणतात. एकदा मी चर्चमध्ये गेलो असता एक स्त्री तिला पूर्वी शैतानाने किती त्रास दिला होता ते हमसून हमसून रडत सांगत होती. नंतर मात्र येशूला शरण गेल्यावर त्याच्या कृपेने शैतानापासून सुटका मिळाली असल्याचे तिने सांगितले. शेवटी सर्वांनी मनोभावे येशूला शरण जावे असे तिने पोटतिडकीने सांगितले.) असा एखाद्याचा विचार, कल्पना मात्र अंधश्रद्धा ठरविली जाते. त्या वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे, ते अकल्याण होऊ नये म्हणून त्याच्या श्रद्धेनुसार त्यांनी केलेले क्रियाकर्म, तोडगे, गंडे-दोरे, तावीज इत्यादि कर्मे निषिद्ध समजली जातात, अशा लोकांना अडाणी, हीन दर्जाचे, मूर्ख समजले जाते. हा कोणता न्याय, तर्क, विवेक आहे? या जगात दुष्ट शक्ती नाही हे जर सिद्ध झाले नसेल तर सुष्ट शक्ती आहेत हे तरी कुठे सिद्ध झाले आहे? मग हे काय गौडबंगाल आहे? हा दुटप्पीपणा नाही का? ही न्याय्य विचारसरणी आहे कि दांभिकपणा? या न्याय कि अन्यायबुद्धीत मानवाचे मनन करण्याचे, विवेकाचे लक्षण कोठे दिसते?

    ReplyDelete
    Replies
    1. तुकोबांनी दिलेला दगडाचा दृष्टांत या कथांनाही लागू होतो. त्यांच्यावर पाय देऊन पुढे जायचे की पूजा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझा देव दुसर्यासाठी दगड ठरतो, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यावरून जो वाद सुरु आहे, त्यच्या मुळाशी हीच समस्या आहे.

      Delete
  3. तत्वामधे हां प्रश्न आपण उत्तम रित्या निकालात काढलात. पण व्यवहाराचे काय मग? ज्या (अंध:)श्रद्धा मानवी जीवनावर सरळ सरळ आक्रमण करतात. त्यांना चाप लावण्यासठि हां कायदा करायचा आहे . असं समिति चं म्हणणं आहे. हे आपणास माहिती नाही काय?
    एखाद्या बाईनि "देवी माझ्या अंगात येते,आणि माझ्या कुटुंबाचं भलं करते!" अशी श्रद्धा व्यक्त केलि..तर तिला समिति हात-लावत नाही. तिथे फ़क्त आणि फ़क्त(वैचारिक) प्रबोधानच केलं जातं. पण उद्या हिच बाई ,तिच्या अंगात-येणाय्रा देवीचा हवाला देऊन (जाणता/अ जाणता..कसेही) जर नरबळि मागायला लागली. गुप्तधनाचे "पत्ते" काढायला लागली. लोकांना अंगारे धुपारे उतारे देऊन मार्ग-दर्शन करवायला लागली. (जे कोणत्याही पातळिवरचं असतं!) तर तिला मात्र कायाद्याचा आधार घेऊन जेरबंद करावी लागेल. ---- या महत्वाच्या आणि मूलभूत फरकाचा आपण सदर लेखनात विचार केलेला दिसत नाही. असं का बरं?

    ReplyDelete