Thursday, 6 February 2014

सिंगूरच्या ‘ग्राऊंड झीरो'वर

  • सूर्यकांत पळसकर 

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …
सिंगूरचे  रेल्वे स्टेशन.
"… पृथ्वी कोठून आली याच्याशी शेतक-यांना काही कर्तव्य नाही! तिच्या जमिनीची वाटणी कशी झाली हेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पृथ्वी स्थिर असो की फिरत, त्यामुळे शेतक-यांच्या जीवनात काय फरक होणार? तुम्हाला हवी तर पृथ्वी लटकावून ठेवा,  नाही तर खिळ्याने ठोकून टाका! शेतक-यांच्या दृष्टीने ती जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे..."  मॅक्झिम गोर्कीची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई'मधील हा उतारा. रशियातील बोल्शेविक क्रांतीचे हुंकार म्हणजे ‘आई'! या कादंबरीतील रिबिन नावाचे बंडखोर पात्र एके ठिकाणी वरील उद्गार काढते. डाव्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्क रिबिनच्या या वक्तव्यात आहे. सिंगूरचा दौरा करीत असताना असे असंख्य रिबिन भेटले. त्यांच्या तोंडूनही असाच अंगार बाहेर पडत होता.  ‘शेतक-यांच्या दृष्टीने जमीन त्याला खाऊ घालते तेच महत्त्वाचे आहे'  टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूरला का उभा राहू शकला नाही, याचे उत्तर या एका वाक्यात मिळते.

सिंगूर येथील टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर असलेला केळीचा फड.
घरावर सावली धरणारी किमान २० फूट उंचीची अशी केळीची झाडे
मी प्रथमच पाहिली. 
प. बंगालमध्ये डावा विचार इतका खोलवर रुजलाय की, राज्याच्या कोणत्याही भागातील मूठभर माती घेऊन कानाला लावली, तर "लाल सलाम, लाल सलाम" असे शब्द कानी पडतील! सिंगूरमधला अनुभवही असाच होता. गावात पोहोचलो तेव्हा घराघरांवर फडफडणा-या लाल बावट्यांनी स्वागत केले. ग्रामीण पेहरावाचे छोटेसे गाव. रापलेला काळा रंग आणि आयुष्यभराच्या कष्टाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणारी माणसे. नॅनो प्रकल्पाबद्दल राग जसा येथे आढळून आला तसाच हा प्रकल्प उभा राहू शकला नाही या बाबत खंत आणि विषादही आढळून आल्या. टाटांचा प्रकल्प सिंगूरच्या नावे ओळखला जात असला तरी सिंगूर या गावापासून किमान अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर, कोलकता-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प आहे. महामार्गाला लागताच आजूबाजूची पिके शेतीचा सुपीक पोत सांगायला सुरुवात करतात. टाटा प्रकल्पाच्या अगदी समोर केळीचा मोठा फड डोलत होता. केळीच्या झाडांची उंची किमान २० फूट होती. घरावर सावली धरणारी केळीची झाडे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिली. असली शेती कोणता शेतकरी सहजासहजी सोडणार? गोर्कीची आठवण मला येथेच पहिल्यांदा झाली. नंतर या ना त्या कारणांनी गोर्की आठवतच राहिला.

सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाच्या
 प्रवेशद्वारावरील कडक बंदोबस्त. 
नॅनो प्रकल्पासाठी जवळपास १ हजार हेक्टर जमीन प. बंगाल सरकारने अधिगृहित केली होती. सिंगूर परिसरातील १० ते १५ गावांच्या शिवारातली ही जमीन आहे. येथे टाटांचा नॅनो प्रकल्प अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभा आहे. आता गेटवर झाडे-झुडपे वाढली आहेत. वातावरणात निर्जीवता आणि विषण्णता  जाणवली. शस्त्रधारी सुरक्षा जवानांचाच काय तो वावर. मुख्य दरवाजावर आम्हाला अडविण्यात आले. ‘आत जाण्यास कोणालाच परवानगी नाही', असे सांगून त्यांनी बंदुकीचा दस्ता उगाचच कुरवाळला. आम्ही काय ते समजलो.

टाटाची कमाई : सायकल स्टँड!
हा प्रकल्प अर्धवट राहिल्यामुळे जमिनी देणा-या गावांची दुर्दशा झाली आहे. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. आम्ही एका रिक्षामधून दोबंडी, बाबूरबेरी, बेराबेरी यांसारख्या काही गावांना भेटी दिल्या. सर्वच ठिकाणचे वातावरण सुतकी होते. प्रकल्प उभा राहिला नसला, तरी जमिनी टाटाच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. कसायला जमिनी नाहीत आणि हाताला कामही नाही. ‘तेल गेले, तूप गेले हाती आले धुपाटणे' अशी त्यांची अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोटापाण्यासाठी अनेक लोकांनी गावे सोडली. जे लोक गावांतच थांबले ते कामासाठी कोलकत्यात जातात. या गावांपासून सिंगूर रेल्वे स्टेशन सरासरी ५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. तिथपर्यंत लोक सायकलीने जातात. सायकली सिंगूरमध्ये पार्किंग स्टँडवर लावतात आणि रेल्वेने कोलकत्याला पोहोचतात. सिंगूर गावात सायकली सांभाळणारे असे किमान ५० पार्किंग स्टँड उभे राहिले आहेत. टाटा प्रकल्पाची कमाई काय असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा लोक या स्टँडकडे बोट दाखवतात.

भाकपाच्या हुगळी जिल्हा
कमिटीचा सदस्य माणिक दास
भाकपाच्या हुगळी जिल्हा कमिटीचा सदस्य माणिक दास याचा स्वत:चा एक स्टँड सिंगूर स्टेशनजवळ आहे. त्याची भेट झाली. त्याच्या बोलण्यात आक्रमकता होती. विषाद होता. त्याने सांगितले की, "या भागात आमची (भाकपा आणि माकपा) ताकद होती. इथल्या बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात होत्या. तरीही आंदोलन आमच्या हातून निसटले. अधिगृहित करण्यात आलेल्या जमिनीवर १५ ते २० हजार लोकांची उपजीविका अवलंबून होती. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोक-यांची हमी दिली गेली नाही. प्रत्यक्ष टाटाच्या साईटवर काम करणारे मजूरही कंत्राटदारांनी बाहेरून आणलेले होते. जमिनी गेल्या, हाताला कामही नाही, त्यामुळे लोक बिथरले."

लढायचे कोणासाठी?
डावे कार्यकर्तेही नॅनोविरोधातील आंदोलनात सहभागी होते, असे अनेकांनी येथे सांगितले. हे कार्यकर्ते कोण, हे सांगायचे धाडस मात्र कोणीही दाखविले नाही, तसेच हे कार्यकर्तेही उघडपणे समोर आले नाहीत. एक छुपी दहशत येथे दिसून आली. माकपाच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा झाली.  "तुमचे स्वत:चे कार्यकर्ते का विरोधात गेले", असा थेट प्रश्न मी त्याला विचारला. तो म्हणाला, ‘त्यांच्याही जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. लढायचे कोणासाठी, कुटुंबासाठी की सरकारसाठी, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी कुटुंबाची निवड केली."

कुळांचा प्रश्न
माकपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, एके काळी जमिनदार असलेल्या श्रीमंतांच्या जमिनी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जमिनी स्थानिक कुळे कसतात. टाटासाठी दिलेल्या जमिनींचा मोबदला मूळ मालकांना मिळाला. कुळे निराधारच राहिली. आंदोलन झाले, तेव्हा ही कुळे लढण्यात आघाडीवर होती. कारण त्यांचे सर्वस्व गेले होते.

सिंगूरच्या गावकुसाला असलेल्या बटाट्याच्या
चाळीत काम करणारे मजूर. 
बटाट्याच्या चाळीतला संघर्ष
या परिसरात बटाटा मोठ्या प्रमाणात पिकतो. सिंगूरच्या गावकुसाला बटाट्यांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत. या चाळींवरही कुळेच राबतात. आम्ही या चाळींची छायाचित्रे घेतली. हे कळताच कंत्राटदारांचे लोक धावून आले. त्यांनी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मदतनिसाने परिस्थिती निभावून नेली. ‘माझा पाहुणा आहे. हौस म्हणून फोटो काढले',  अशी थाप त्याने मारली. बटाट्याच्या चाळींमध्ये कुळांना बेठबिगारासारखे राबवून घेतले जाते, असे भाकपाचा एक कार्यकर्ता गौतम बॅनर्जी याने सांगितले.

फक्त नॅनोलाच विरोध का?
‘नॅनो फियास्को'नंतर प. बंगालच्या राजकारणाचा गुरुत्त्वमध्य सिंगूरला हलला आहे, असे या दौ-यात जाणवले. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला यश मिळाले. सिंगूर, नंदिग्राम आणि लालगड येथील संघर्षात या निवडणूक निकालाचे मूळ आहे, असे कोलकत्यात तज्ज्ञांशी बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर भाकपाचे प्रदेश सेक्रेटरी मंजू मुजुमदार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, "सिंगूरच्या परिसरात अनेक उद्योग आहेत. नॅनो प्रकल्पापासून अवघ्या १०-१५ कि.मी. अंतरावर बिर्लांचा ‘हिंदुस्थान मोटर्स' हा कारखाना आहे. तो सुखेनैव चालू आहे. नॅनोला केवळ राजकारण म्हणून विरोध झाला. उद्योगजगतातील टाटांच्या विरोधकांनीही नॅनोविरोधी आंदोलनाला रसद पुरविली"
सिंगूर येथील टाटाच्या नॅनो प्रकल्पाचे
सुरू न होऊ शकलेले पॉवर स्टेशन. 
प. बंगालात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. तुमची सलग सत्ता कायम राहील असे वाटते का, असा प्रश्न विचारला त्यावर ठामपणे ‘होय' असे उत्तर देण्याचे मंजू मुजुमदार यांनी टाळले. ते म्हणाले, "क्रांती हे आमचे ध्येय आहे. निवडणूक ही क्रांतीच्या मार्गातील एक लढाई आहे. ती आम्ही लढू".

भाकपाचा ‘होल टाईमर' गौतम बॅनर्जी.
अशा कार्यकत्र्यांच्या बळावरच
प. बंगालमधील  डाव्यांचे साम्राज्य अद्याप
टिकून  आहे. गौतम सोबत होता, म्हणून
 सिंगूर परिसरात मला फिरता आले. 
जमिनींचे काय होणार?
‘दीदींची (ममता बॅनर्जी) सत्ता आल्यावर आम्हाला जमिनी परत मिळणार आहेत", असे प्रकल्पग्रस्त लोक छातीठोकपणे सांगत होते. याविषयी मुजुमदार यांना छेडले. त्यावर ते म्हणाले, "तृणमूलवाल्यांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. १८९४ सालच्या भूसंपादन कायद्यान्वये ही जमीन अधिगृहित करण्यात आली आहे. या कायद्यात जमीन परत करण्याची तरतूदच नाही. जमिनी परत करायच्या असतील, तर केंद्र सरकारला कायदा बदलावा लागेल, तसेच आता जमिनीचे सपाटीकरण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. ही जमीन शेतीसाठी कशी वापरणार. कोणाची जमीन कुठे होती हे कसे शोधणार"

 प. बंगाल सरकारने नॅनो प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचे अखेर होणार तरी काय, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता. या संपूर्ण दौ-यात त्याचे उत्तर मात्र कोठेच मिळाले नाही. प. बंगालमधील डाव्यांच्या सरकारचे काय होणार हा आणखी एक प्रश्न कोलकता सोडताना मनात येऊन गेला. त्याचे ठोस उत्तर हाती लागले नसले, तरी अंदाज मात्र येत होता. डाव्यांच्या या गडाला मोठे खिंडार पडले आहे. खिंडार पडले की, गड पडायला फार वेळ लागत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. 

राष्ट्रपिता ही पदवी सरोजिनी नायडूंची देण!

लोकमतच्या रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजीच्या
अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण. 
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही बिरुदावली कोणी लावली, हा प्रश्न सध्या देशभरात गाजतो आहे. यासंबंधी कोणत्याही प्रकारचा ठोस लिखित पुरावा भारत सरकारकडे उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. तथापि, त्या काळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्या तसेच ‘भारत कोकिळा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींना उद्देशून राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला आहे.

लखनौ येथील इयात्ता सहावीची विद्यार्थिनी ऐश्वर्या पराशर हिने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात एक याचिका दाखल करून ‘गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली' अशी माहिती विचारली होती. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाकने गृहमंत्रालयाकडे पाठविली. नंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे पाठविण्यात आली. तथापि, या सर्व प्रवासात राष्टड्ढपिता ही बिरुदावली गांधीजींना कोणी लावली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आमच्याकडील कागदपत्रांद्वारे तुम्हीच संशोधन करा, असे पत्र पुरातत्व विभागाने ऐश्वर्याला पाठविले. शेवटी तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना ही बिरुदावली पहिल्यांदा लावली, असा प्रवाद आहे. या बिरुदावलीचे श्रेय कोणी सुभाषचंद्र बोस यांनाही देतात. तथापि, यासबंधीचा ठोस लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नाही.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी सदर प्रतिनिधीने राज्यातील जुन्या जाणत्या लोकांकडे विचारणा केली, तेव्हा सरोजिनी नायडू यांचे नाव समोर आले. तथापि, त्यासाठी ठोस लिखित पुरावा उपलब्ध नव्हता. जुन्या पुस्तकांत काही उल्लेख सापडू शकतात, हे गृहीत धरून प्रतिनिधीने औरंगाबादेतील फुटपाथवर जुनी पुस्तके विकणा-या लोकांकडे धांडोळा घेतला. तेव्हा, अद्भूत योगायोग जुळून आला आणि प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या ‘रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' पुस्तकाच्या मराठी अनुवादाची एक जीर्ण प्रत हाती लागली. महात्मा गांधी यांना सरोजिनी नायडू यांनी राष्ट्रपिता हे संबोधन सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. प्रतिनिधीच्या हाती आलेल्या या पुस्तकाची सुरूवातीची आणि शेवटची काही पाने गायब आहेत. त्यामुळे त्याचा प्रकाशक कोण हे कळू शकलेले नाही.


२८ मार्च १९४७ रोजी मिळाले राष्ट्रपिता संबोधन
गांधीजींना राष्ट्रपिता हे संबोधन कसे प्राप्त झाले, याची माहिती असलेला पुस्तकातील तपशील असा : ब-याच लोकांची अशी कल्पना आहे की, गांधीजींना ‘राष्ट्रपिता ही बिरुदावली प्रथम नेहंनी लावली. ते बरोबर नाही. श्रीमती सरोजिनी नायडूंनी हा शब्दप्रयोग प्रथम आमलात आणला. त्यावेळचा प्रसंग असा : २८ मार्च ते २ एप्रिल १९४७ या काळात नवी दिल्लीत आशियायी परिषद भरली होती. श्रीमती नायडू परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गांधीजी झपझप पावले टाकीत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना श्रीमती सरोजिनी नायडूंनी आपल्या पल्लेदार स्वरात त्यांचे आगमन घोषित करताना गांधींचा उल्लेख ‘आमचे राष्ट्रपिता' या शब्दांत केला.

अजोड भक्ती 
सरोजिनी नायडू यांची महात्मा गांधींवरील भक्ती किती अजोड होती, याचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केल्यानंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. मथाई यांनी लिहिले आहे : शोकसागरात बुडालेल्या काँग्रेसजनांना उद्देशून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, ‘‘अरे बाबांनो, महात्म्याला शोभेल असेच मरण बापूंना आले आहे. वृद्ध होऊन, अपचनासारख्या विकाराने त्यांना मृत्यू यायला हवा होता की काय?'

नेहरुंचा गांधीजींविषयीचा पितृभाव
नेहंनाही महात्मा गांधी यांच्याबद्दल पित्यासमान भक्ती होती. नेहंच्या या भावनेला मथाई ‘फादर कॉम्प्लेक्सङ्क असे नाव देतात. महात्मा गांधी यांच्याजवळ नेहरू आपले मन पूर्णतः रिकामे करीत. एखाद्या लहान मुलाने आपल्या पित्याला आपली सर्व रहस्ये सांगावी, अशी ही भावना होती. शुक्रवार दि. ३० जानेवारी १९५८ रोजी सायंकाळी ५.१७ वा. गांधीजींजी हत्या झाली. नेहरू सैरभैर झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांच्या भावना इतक्या अस्सल आणि उत्कट होत्या की, कोणतीही पूर्व तयारी न करता, नेहंनी आकाशवाणीवरून त्या दिवशी राष्टड्ढाला उद्देशून भाषण केले. त्यांच्या भाषणाचे पहिले वाक्य होते : ‘द लाईट हॅज गॉन आऊट ऑफ अवर लाईफ...' नेहरुंचे हे भाषण याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. पंतप्रधान नेहरू यांचे निवासस्थान १७, यॉर्क रोड हे होते. नेहरुंच्या निवासस्थानातील चूल त्या संध्याकाळी पेटली नाही. नेहरूंपासून नोकरापर्यंत कोणीही त्या रात्री जेवले नाही, अशी माहिती मथाई देतात.

एम. ओ. मथाई यांच्या 'रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज'
या पुस्तकाचे मुखपृष्ठ. या छायाचित्रात 
नेहरूंसोबत मथाई (उभे असलेले) दिसत आहेत.
कोण होते मथाई?
दक्षिण भारतातून आलेले एम ओ मथाई स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ‘युनायटेड स्टेट्स आर्मीङ्कच्या सेवेत होते. १९४६ साली ते युएस आर्मीचा राजीनामा देऊन नेहंचे स्वीय सहायक म्हणून सेवेत रूजू झाले. ते २४ तास नेहंसोबत असत. नेहंच्या प्रत्येक निर्णयाचे ते साक्षीदार होते, असे मानले जाते. कालांतराने त्यांच्यावर ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्रङ्क बनल्याचे आरोप झाले. कम्युनिस्टांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे १९५९ साली त्यांनी नेहंच्या स्वीय सहायक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य चेन्नईत घालवले. १९८१ साली वयाच्या ७२ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले. मथाई यांनी नेहंशी संबंधित दोन पुस्तके लिहिली. १. रिमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज (१९७८) २. माय डेज विथ नेहरू (१९७८). मात्र ही दोन्ही पुस्तके वादग्रस्त ठरली. त्यात त्यांनी अनेक स्फोटक गोष्टी लिहिल्या होत्या. विशेषतः त्यांचे पहिले पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरले. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्यावर बंदी घातली.

- सूर्यकांत पळसकर

Thursday, 30 January 2014

गांधी भाय!

अफ्रिकेतील कुली लोकेशन्स!

संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस' ने गांधीविचाराचा नवा अवतार जगापुढे पेश केला. एका ‘भाई'ची गांधीगिरी आपण या चित्रपटात पाहिली. पण गांधीजींनाही खरोखरच एकदा ‘भाई' व्हावे लागले होते. याची कहाणी रोचक तशीच हृदयद्रावक आहे. काळ आपले काम करीत असतो. भारतीय समाजाने हजारो वर्षे दीन-दलितांना अस्पृश्य ठेवले. याची किंमत भारतीयांना इंग्रजी राजवटीत चुकवावी लागली. उच्चवर्णीय भारतीय दलितांना अस्पृश्यतेचे चटके देत होते. गोरया इंग्रजांच्या दृष्टीने संपूर्ण भारतीय समाजच अस्पृश्य होता. गांधीजी दक्षिण अफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना या अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. दक्षिण अफ्रिकेत भारतीयांच्या वसाहती वेगळ्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यांना गोरयांच्या वसाहतीत घर मिळत नसे. या भारतीय वस्त्यांना 'कुली लोकेशन्स' म्हटले जाई. कुली म्हणजे हमाल. असेच एक कुली लोकेशन जोहान्सबर्गमध्ये होते. तेथे भारतीयांनी ९९ वर्षांच्या लीजवर प्लॉट खरेदी केले होते. पुढील काळात जोहान्सबर्गमध्ये येणारे भारतीय याच लोकेशनमध्ये एकवटत गेले. जागा मात्र तेवढीच राहिली. परिणामी येथील घरांत लोक जनावरांसारखे कोंबून कोंबून भरले गेले. ही वसाहत महानगरपालिकेच्या दृष्टीने अस्तित्वात नव्हतीच . तिथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. गांधीजींनी येथे राहणारया लोकांची तुलना निर्जन बेटावर अडकून पडलेल्या रॉबिन्सन क्रुसोशी केली आहे.१

कमाई न करणारा बॅरिस्टर
महानगरपालिकेच्या ‘क्रिमिनल निग्लिजन्स'मुळे जोहान्सबर्गच्या या कुली लोकेशनची अवस्था अमानवी झाली होती. या वसाहतीला सुविधा पुरविण्याऐवजी महानगरपालिकेने ही वसाहन राहण्यास अयोग्य ठरवून उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक प्रशासनाकडून तसा आदेशही मिळविला. महात्मा गांधी जोहान्सबर्गमध्ये आले तेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर आली. त्यांनी या अस्पृश्य भारतीयांसाठी न्यायालयात खटला लढविण्याचा निर्णय घेतला. गांधीजी बॅरिस्टर होते, तरी पैसे कमावणे हा हेतू त्यांनी कधीच मनात ठेवला नाही; त्यामुळे त्यांनी नाममात्र फीसमध्ये हे खटले चालविले. हा खटला लीज धारकाने जिंकला तर कायद्यानुसार लीजधारकास नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च मिळणे बंधनकारक होते. खटला जिंकल्यास पालिकेकडून मिळणारा न्यायालयीन खर्च लीज धारकांनी गांधीजींना देण्याचे मान्य केले. तसेच खटल्याचा निकाल काहीही लागला तरी १० पाऊंड गांधीजींना ते देणार होते. फीस अत्यंत कमी असल्यामुळे सर्व लीजधारकांची प्रकरणे गांधीजींकडेच आली. सुमारे ७० खटले गांधीजींनी चालविले. त्यापैकी फक्त एक खटला ते हरले. बाकीचे सर्व जिंकले त्यामुळे त्यांना १,६०० पाऊंडांची भरघोस कमाई झाली. त्यातला अर्धा पैसा गांधीजींनी याच कुली लोकेशनला हॉस्पिटल आणि इतर सोयींसाठी दिला.

गांधीजींच्या या निरिच्छ वृत्तीमुळे या सर्वांनाच गहिवरून आले. त्यांच्यात केवळ वकील आणि पक्षकार असे औपचारिक नाते राहिलेच नव्हते. गांधीजी त्यांच्यातीलच एक बनून गेले होते. या लीजधारकांपैकी एक होते अब्दुल्ला सेठ. खटल्याच्या काळात ते गांधीजींना साहेब कधीच म्हणत नसत. पण नुसतेच 'गांधी' म्हणून अवमानितही करीत नसत. ते त्यांना ‘गांधी भाय' म्हणत. हळूहळू सगळेच लीजधारक गांधीजींना 'भाई' म्हणू लागले. गांधीजी म्हणतात, मी अशा प्रकारे येथील भारतीयांचा ‘भाई' झालो.२

स्वतंत्र भारतातील बिहारी आज पोटापाण्यासाठी देशाच्या कानाकोप-यात जाताना दिसतात. मुंबईत बिहारींची संख्या खूप मोठी आहे. मुंबईत दक्षिण भारतीयांची संख्याही मोठी आहे. या लोकांना हाकलून लावण्यासाठी ठाकरयांची मुंबईतील हिंसक आंदोलने सर्वज्ञात आहेत. योगायोग पाहा जोहान्सबर्गच्या कुली लोकेशनमध्ये राहणारया भारतीयांत बहुतांश लोक बिहारी होते. तसेच काही जण दक्षिण भारतीय होते! जोहान्सबर्गच्या प्रशासनाने त्यांना हाकलण्याच्या प्रयत्न केला, तर गांधीजींनी त्यांना बेघर होण्यापासून वाचविले. ठाकरे आणि गांधी यांच्यातील हा फरक आहे.

- सूर्यकांत पळसकर, औरंगाबाद.

Tuesday, 28 January 2014

अद्भूत ज्योतिषशास्त्र

‘रुद्र कौल तत्तीय' हा ग्रंथ सध्या वाचतो आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रावरील हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृतात आहे. त्याचे संस्कृत भाषेत भाषांतर झालेले आहे. संस्कृतातील सूत्र ग्रंथांसारखी याची रचना आहे. ‘रुद्र कौल तत्तीय'च्या प्रभावातूनच संस्कृतातील सूत्र ग्रंथ निर्माण झाले असावेत, असे दिसते. 

रुद्र कौलात ग्रहता-यांचा सूक्ष्म वेध घेतलेला आहे. ‘निर्णयसिन्धू'वरही या ग्रंथाचा प्रभाव आहे, असे जाणवते. आज भारतात ग्रहता-यांवर आधारित ज्योतिषशास्त्रापेक्षा या ग्रंथातील ज्योतिष अगदी भिन्न आहे. 

महाराष्ट्रात कौल लावण्याची जी पद्धत आज अस्तित्त्वात आहे, तिच्याशी ही ज्योतिषपद्धती बरीचशी मिळती जुळती आहे. रुद्र कौल ज्योतिषविद्येचे अवशेष म्हणून कौल लावण्याच्या पद्धतीकडे पाहता येईल. 

रुद्र म्हणजे शिव. शैवांमध्ये कौलमत प्रसिद्धच आहे. प्राचीन महाराष्ट्रात शैवांचा प्रभाव होता. लेण्यांमध्ये कोरलेल्या शिवालायांतून हे दिसून येते. शिव हा आदिम देव आहे. त्याच प्रमाणे रुद्र कौल ज्योतिष हेही सर्वांत जुने ज्योतिषशास्त्र आहे. 

Wednesday, 8 January 2014

ट्रेन टू कोलकता

माणूस पायावर नव्हे, पोटावर चालतो!

  • सूर्यकांत पळसकर

२०१० च्या दिवाळीत मी पश्चिम बंगालमधील सिंगूरचा दौरा केला होता. फियास्को झालेल्या टाटाच्या नॅनो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. या दौ-यावर आधारित दोन लेख मी तेव्हा लिहिले होते. ते लोकमतच्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. …

कोलकत्याचा मानबिन्दू हावडा पूल. हावडा स्टेशनवरील
 हॉटेलच्या खिडकीतून टिपलेले छायाचित्र.
 ‘वंग आमुचा खरा सहोदर' ही काव्यपंक्ती लहानपणी केव्हा तरी कानांवरून गेलेली. प. बंगालच्या दौ-यासाठी रेल्वेत पाऊल ठेवले तेव्हा ही ओळ अचानक ओठांवर आली. स्वातंत्र्यपूर्व काळात दोन्ही राज्यांतील क्रांतिकारी चळवळ आणि सामाजिक सुधारणांची चळवळ, अशी दुहेरी पाश्र्वभूमी या काव्यपंक्तीला आहे; मात्र गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत काळ बदलला. कोलकत्याच्या हावडा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ही काव्यपंक्ती अजूनही आपला अर्थ टिकवून आहे का, या प्रश्नावर येऊन ठेचकाळलो. पुढे संपूर्ण दौ-यात ठेचकाळतच राहिलो.

'सैन्य पायावर नव्हे, तर पोटावर चालते', असे पूर्वी म्हटले जायचे. हा नियम आता सामान्य माणसालाच जास्त लागू पडतो. ‘माणूस पायावर नव्हे पोटावर चालतो,' हे  कोलकत्याच्या प्रवासात जाणवले. गीतांजली एक्स्प्रेसच्या एस-६ डब्यातून प्रवास करीत होतो. डब्यात बंगाल्यांची संख्या अधिक होती. त्यातही पांढरपेशे अधिक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नोक-या करणारे हे लोक. माझ्या समोरच्या सीटवर औरंगाबादेतील गादिया विहारमध्ये राहणारे एक कुटुंब होते. मुंबईत नोकरी करणारे नीरज घोष गँगवे जवळच्या आडव्या सीटवर होते. एक कुटुंब भुसावळहून रेल्वेत चढले होते. पोटापाण्यासाठी दोन हजार कि.मी.पेक्षाही जास्त प्रवास करून हे लोक महाराष्ट्रात आले होते; पण घराची, गावाची ओढ सुटलेली नव्हती. उत्तर दिवाळीचा मोसम होता. सुट्या काढून  ते आपल्या गावी चाललेले होते. बंगालातच रोजगार मिळाला असता, तर हे लोक महाराष्ट्रात आले असते? कदाचित नाही.

बदल हवा बदल
गाडीने महाराष्ट्र सोडला. दिवस केव्हाच बुडाला होता. प्रवासी आडवे झाले होते. मीही माझ्या बर्थवर लवंडलो होतो. तरुणांचा एक गट मात्र दंगामस्ती करीत जागा होता. त्यांच्या गटात दोन तरुणीही होत्या. ते बंगाली आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. सहज चौकशी केली तेव्हा कळले की, ते बी.पी.एड.चे विद्यार्थी असून, वर्ध्याच्या चिंतामणी बी.पी.एड. कॉलेजात ते शिकत होते. दिवाळीच्या सुट्यांत ते घरी चालले होते. त्यांच्यातलाच एक सनातन बर्मन. उत्तर बंगालातील दक्षिण दिनाजपूरचा. आयुष्याची स्वप्ने त्याच्या नजरेत होती; पण मनात साशंकता होती. साध्या बी.पी.एड.च्या पदवीसाठी इतक्या दूर का आलास, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ‘आमच्या उत्तर बंगालच्या सहा जिल्ह्यांत फक्त तीन बी.पी.एड. कॉलेजेस आहेत. तेथे प्रवेश मिळाला नाही.' बंगालात शिक्षण आणि आरोग्याची फार दुरवस्था झाली आहे, अशी त्याची तक्रार होती. आम्ही शिकायला महाराष्ट्रात आलो, तसे इतर राज्यांतील विद्यार्थी बंगालात येतील, तो ‘शोनार दिवस' असेल, असे स्वप्न सनातनने बोलून दाखवले. प. बंगालातील डाव्या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरएसपीचा तो समर्थक होता. क्षिती गोस्वामी हा त्याचा आवडता नेता; पण त्याला ममता बॅनर्जींबद्दल आस्था होती. संपूर्ण बंगालच्या नेत्या म्हणून वावरण्यात ममता कमी पडतात. रेल्वेमंत्री एवढीच त्यांची ‘इमेज' आहे, असे मत त्याने व्यक्त केले. ‘बदल हवा, त्याशिवाय बंगालचा उद्धार होणार नाही,' असे तो कोलकत्यात उतरताना म्हणाला. 

जुन्यांनो दूर व्हा!
सनातन बर्मन बोलण्यात चतुर होता. राजकारणात जाशील का, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला- ‘विचार केला नाही; पण नवीन नेतृत्व उदयास येत नाही, अशी एक तक्रार नेहमी कानावर येते. माझे जुन्यांना एवढेच सांगणे आहे की, तुम्ही बाजूला व्हा, नवे नेते आपोआप तयार होतील!' सनातनचे वक्तव्य म्हणजे डाव्यांसाठी इशारा आहे, असे मला वाटून गेले. 

‘बिहारी' कोलकता
मुनसिन्ग यादव. मूळचा बिहारातील मधुबनीचा
असलेला मुनसिन्ग १९७० सालापासून कोलकत्यात
आहे. असे हजारो बिहारी लोक कोलकत्यात
पोटापाण्यासाठी आलेले आहेत.
कोलकत्यात प्रवास करीत असताना मुनसिंग यादव भेटला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून आलेला. १९७० साली पोटापाण्यासाठी घर सोडले. कोलकत्यात टॅक्सी चालवतो. ७७ पर्यंत जुटाच्या कारखान्यात नोकरी करायचा. कारखाना बंद पडला, तेव्हापासून टॅक्सीचे स्टिअरिंग हाती आले. गावाकडे पत्नी, ग्रॅज्युएशन करणारा मुलगा, दीड बिघा शेती आणि १ बैल आहे. तो म्हणाला, ‘बिहारातले लोक पोटामागे धावताना भारतभर पांगले आहेत. गावाकडे शेती करायला मजूर मिळत नाही. म्हणून खरीप (जून) आणि रबी (दिवाळी) अशा दोन्ही पेरण्यांच्या वेळी गावाकडे जातो. दिवाळीला गेलो की, पेरणीबरोबरच भाताची काढणीही करून घेतो. बाकी वर्षभर कोलकत्यात असतो. दोन बैल ठेवायला परवडत नाही, म्हणून एकच ठेवलाय. एक शेजा-याचा आहे. बैल महाग झालेत. वर्षभर टॅक्सी चालवली तरी एका बैलाची किंमत वसूल होत नाही.'

१० दिवसांच्या काळात मी कोलकत्यात भरपूर प्रवास केला; परंतु एकही बंगाली टॅक्सीवाला मला भेटला नाही. बहुतांश टॅक्सीवाले बिहार, झारखंडमधून आलेले होते. कोलकत्यात बिहारींची संख्या मोठी आहे. मी तेथे होतो तेव्हा छठ महोत्सव सुरू होता. संपूर्ण कोलकता शहरातील वाहतूक छठवाल्या बिहारी बायकांच्या वाहनांनी ठप्प केलेली होती. एकेदिवशी हावडा पूल ओलांडण्यासाठी मला ४५ मिनिटे लागली, एवढे ट्रॅफिक जॅम होते.

मुंबई-कोलकता कनेक्शन!
छोटू यादव. मुंबईत सागर डान्सबारमध्ये काम करायचा.
डान्सबार बंद झाल्यानंतर कोलकत्यातील हॉटेलात काम करतो.
मी थांबलो होतो त्या ‘भीमसेन हॉटेल'ची इमारत इंग्रजी राजवटीतली होती. ते चालवणारा मालक परप्रांतीय होता, तसेच बहुतांश स्टाफही परप्रांतीयच होता. त्यातलाच एक छोटू यादव. तो पाटणाजवळच्या एका खेड्यातून आलेला. आधी मुंबईत होता. विरार भागात कुठेतरी सागर नावाच्या डान्सबारमध्ये काम करायचा. आर.आर. पाटलांनी डान्सबारबंदी आणली तेव्हा त्याची नोकरी गेली. मुंबईहून त्याने थेट कोलकत्याची ‘ट्रेन' पकडली. ‘मुंबईत होतो तेव्हा चांगली कमाई व्हायची. आता दिवस ढकलतोय', अशी खंत त्याने व्यक्त केली. छोटूचा बाप कोलकत्यातील जुटाच्या कारखान्यात कामाला होता. कारखाना बंद पडल्यानंतर तो गावाकडे परतला. छोटूचे शिक्षण त्यामुळे होऊ शकले नाही. कळायला लागले तेव्हापासून तो पडेल ती कामे करतोय.

मी कोलकता सोडले त्याच्या आदल्या दिवशी छोटूने दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी ट्रेन पकडली. कोलकत्याला येणा-या आणि कोलकता सोडणा-या ट्रेन हाऊसफुल्लच असतात. दोन्ही ट्रेनमधली ही सारी गर्दी ‘पोटा'च्या पायांनी चालत असते; पण दोन्हींत एक सूक्ष्म फरक असतो. कोलकत्यात येणा-यांत छोटू यादव, मुनसिंग यादव यांच्या वर्गातील लोकांची संख्या अधिक असते, तर कोलकता सोडणारे -विशेषत: मुंबईच्या मार्गावर धावणारे लोक- सनातन बर्मन, नीरज घोष यांच्या वर्गातले असतात. हा प्रवास उलटा व्हावा, ही सनातनने व्यक्त केलेली भावना बहुतांश बंगाली माणसांत मला जाणवली. बंगाली राजकारण्यांना ती केव्हा जाणवेल कोणास ठावूक?

Tuesday, 26 November 2013

बिन जातीचे व्हा!



''काळ बदलला की ताळ (ताल) बदलतो...'' काँग्रेसच्या बाबतीत ही म्हण उत्तर प्रदेशात खरी ठरू पाहत आहे. जातीनिरपेक्षता हा काँग्रेसचा आणि काँग्रेस नेतृत्वाचा खरा चेहरा आहे. हा चेहरा एकेकाळी काँग्रेसची खरी शक्ती होती (आजही आहे.). उत्तर प्रदेशात मात्र जातीनिरपेक्षा चेहरा काँग्रेसला जाचक ठरू लागला आहे, असे दिसते.  २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशापयशाचा आढावा घेण्याचे काम सध्या सर्वच पक्षांत सुरू आहे. तसेच ते काँग्रेसमध्येही सुरू आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी अर्थात ‘आरजी' यांच्या नेतृत्वाखाली अशीच एक आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी एकच मुद्दा मांडला, की काँग्रेसला जातीय चेहरा नसल्यामुळे उत्तर प्रदेशात हार पत्करावी लागली. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, चेहरा नाही कसा? मी ब्राह्मण आहे आणि काँग्रेचा जनरल सेक्रेटरी आहे. (आरजी यांचे मूळ वाक्य असे : (I am a Brahmin and general secretary of the party.)

जाती-धर्म पणाला लावण्याचे मूळ पाप भाजपाचे

आरजी यांचे हे वक्तव्य अधिकृत नाही. झिरपत आलेल्या माहितीवरून प्रसार माध्यमांनी ते प्रसिद्ध केले आहे. आरजींचे हे वक्तव्य खरे मानायचे की खोटे हा प्रश्न आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बैठकीत आरजी काय बोलले या पेक्षा काँग्रेसला कोणता संदेश बाहेर पाठवायचा, हे महत्वाचे ठरते. काँग्रेसकडून अधिकृतरित्या या कथित वक्तव्याचा इन्कार आलेला नाही. याचा सोपा अर्थ असा आहे की, प्रसारमाध्यमांत ज्या बातम्या आल्या त्याला काँग्रेसचा आक्षेप नाही. काँग्रेसला अपेक्षित असाच संदेश बाहेर आला आहे. आरजी यांच्या वक्तव्यावर भाजपाने अपेक्षेप्रमाणे आकांडतांडव केले. भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसला दुषणे दिली. (जावडेकर यांची मूळ टीका अशी : Now this is crossing all limits that Rahul Gandhi has started informing what his caste is...That he is a Brahmin. Congress has lost all patience after losing the mandate in Uttar Pradesh elections.) वस्तुत: भारतीय राजकारणात जाती आणि धर्म पणाला लावणयचे मूळ पाप भाजपाचेच आहे. राजकारणात गैरसोयीच्या गोष्टी विसरायच्या असतात. जावडेकर भाजपाचे पाप विसरले, ते याच न्यायाने! हिंदुत्ववाद आणि राममंदिराचे आंदोलन पेटवून भाजपाने एकेकाळी उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता उपभोगली आहे. भाजपाने जे पेरलेल्या विकृतीचा विकास उत्तर प्रदेशात आता दिसू लागला आहे. भाजपाच्या  पे-याची ही विकसित आवृत्ती आता खुद्द भाजपाच्या हातूनही निसटली आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपालाही उत्तर प्रदेशात दारुण पराभव पाहावा लागला आहे.

अपवित्र आणि विषारी सत्य 

काँग्रेसच नव्हे, तर इतर सर्व पक्ष आणि प्रसार माध्यमे २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण जातींच्या चौकटीतच करीत आहेत. मायावती दलित आहेत, म्हणून दलित समाज त्यांच्या सोबत आहे. सतीशचंद्र मिश्रा हे ब्राह्मणांचे नेते मायावतींसोबत आहेत, म्हणून ब्राह्मण समाज मायावतींसोबत आहे. मुलायमसिंग हे जातीने यादव आहेत, म्हणून यादव समाज त्यांच्यासोबत आहे. आजमखान यांच्यासारखे मान्यताप्राप्त मुस्लिम नेते सपासोबत आहेत, म्हणून मुस्लिम समाज सपासोबत आहे. अजित सिंग जाट आहेत, म्हणून जाट समाज त्यांच्या सोबत आहे. इ. स्वरूपाची अत्यंत साधी-सोपी समीकरणे मांडली जात आहेत. दुर्दैवाने ती सत्य आहेत. सत्य हे नेहमीच पवित्र असते असे नव्हते. सत्य हे अपवित्र आणि विषारीही असू शकते. उत्तर प्रदेशात ते दिसले.  काँग्रेसच्या नेत्यांनी आरजी यांच्या बैठकीत ते सांगितले. सगळ्या जाती आपापल्या जातीच्या नेत्यांच्या मागे गेल्या आहेत. काँग्रेसच्या मागे यायला जातीच उरलेल्या नाही!

जाती लाभ देतात अन् मर्यादाही

अपवित्र असले, विषारी असले, म्हणून सत्य नाकारता येत नाही. भारतीय राजकारणच नव्हे तर समाजकारण आणि धर्मकारण अशा सर्वच व्यवस्था प्राचीन काळापासून जातींभोवती फिरत राहिल्या आहेत. जातींचे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. मोठ्या समाज घटकांतून आलेल्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांना चटकन अनुयायी  मिळतात. झटपट यश मिळते. तथापि, असे नेतृत्व जातीची आणि प्रदेशाची चौकट मोडू शकत नाही. मुलायम सिंग, लालूप्रसाद, नितिशकुमार, शरद यादव, शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, करुणानिधी, फारुख अब्दुल्ला, अजित सिंग, पी. ए. संगमा, एच. डी. देवेगौडा हे नेते याचे उत्तम उदाहरण आहेत. ही माणसे खरोखरच वजनदार आहेत. या नेत्यांनी आपापल्या प्रदेशात राजकीय घराणी जन्माला घातली आहेत. तथापि, हे नेते आणि त्यांची घराणी प्रदेश आणि जातीच्या भिंती तोडून "अखिल भारतीय"  होऊ शकली नाहीत. होऊ शकणार नाहीत. 


अखिल भारतीय होण्याची ताकद असलेले एकच घराणे या देशात आहे. ते म्हणजे "गांधी-नेहरू" घराणे. या घराण्याला ही ताकद त्यांच्या बिनजातीच्या आणि बिनधर्माच्या चेह-याने दिली आहे. या घराण्याला कोणतीच जात राहिलेली  नाही. नेहरू हे या घराण्याचे मूळ पुरूष. ते काश्मिरी ब्राह्मण होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी पारशी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. इंदिरा गांधींचे थोरले पुत्र राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी इटालीच्या, कॅथालिक ख्रिश्चन आहेत. धाकटे पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी या शीख समाजातील आहेत. राजीव गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांचा विवाह भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मीय रॉबर्ट वधेरा यांच्याशी झाला आहे. अशा परिस्थितीत गांधी-नेहरू घराण्याची कोणती जात गृहीत धरायची? कुठल्याही जातीचा आणि धर्माचा आणि वंशाचा चेहरा नसल्यामुळे नेहरू-गांधी घराणे सर्व जाती-धर्मांसाठी स्वीकारार्ह ठरले. त्यांचा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष ठरला. 

ज्या बिनजातीच्या चेह-याने काँग्रेसला अखिल भारतीय ओळख दिली, तोच चेहरा आता काँग्रेसला उत्तर प्रदेशात अडचणीचा वाटू लागला आहे असे दिसते. १९४७ ते २०१२ या ६५ वर्षांच्या काळात आपल्या समाज व्यवस्थेने केलेली ही प्रगती समजायची का? 

आपली समाज रचना खरोखरच अद्भूत आहे. गुंतागुंतीची आहे. ती दोन पातळ्यांवर काम करते. एका पातळीवर ती जाती आणि धर्मांच्या बंदिस्त भिंतीत वावरते. जातींचे लाभ व्यक्तींना देते. त्याचवेळी दुस-या बाजून ती या  भिंती  तोडूही पाहते. त्यासाठी अधिक मोठे लाभ देते. गुरुत्वाकर्षणासारखे  हे आहे. गतीमुळे गृहगोलांच्या गाभ्यात गुरुत्वाकर्षण तयार होते. ते गृहाला आत खेचू पाहते. हीच गती गृहागोलाच्या बाह्य परिघाला बाहेर फेकू पाहते. "मोठा आवाका प्राप्त करण्यासाठी बिनजातीचे व्हा", असा संदेश आपली समाज व्यवस्था देते. 

थोडक्या लाभासाठी काँग्रेसला आपला अखिल भारतीय चेहरा गमावणे परवडणार नाही. हे जसे काँग्रेच्या हिताचे नाही, तसेच देशाच्याही हिताचे नाही. अखिल भारतीय चेहरा असलेला एकच पक्ष आणि एकच घराणे या देशात आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

...................................................................................
आरजी यांच्या वक्तव्या विषयीची मूळ लिन्क :

-सूर्यकांत पळसकर  

Tuesday, 12 November 2013

टाटा मोटर्स की पश्चिम बंगाल में लौटने की इच्छा

सिंगूर की जमीन पर बने रहना चाहती है कंपनी 

टाटा मोटर्स ने आज उच्चतम न्यायालय को सूचित किया कि वह पश्चिम बंगाल में सिंगूर में उसके कारखाने के लिए आबंटित  एकड़ जमीन अपने पास रखना चाहती है और नैनो परियोजना के अगले विस्तार के दौर में वह प्रदेश में लौटना चाहती है.
     न्यायमूर्ति एच एल दत्तू और न्यायमूर्ति रंजना प्रकाश देसाई की खंडपीठ के समख टाटा मोटर्स की ओर से वरिष्ठ अधिवक्ता हरीश साल्वे ने कहा, ‘‘मुझे सर्वोच्च स्तर से यह कहने का निर्देश मिला है कि हम वहां :पश्चिम बंगालः लौटने के इच्छुक हैं।ङ्कङ्क साल्वे ने यह बात इस परियोजना को गुजरात स्थानांतरित करने के बाद की स्थिति में  सिंगूर में आबंटित भूमि के बारे में कंपनी का दृष्टिकोण स्पष्ट करने संबंधी शीर्ष अदालत के सवाल के जवाब में यह बात कही। 
       न्यायाधीशों ने पूछा था, ‘‘सिंगूर में जमीन कार विनिर्माण परियोजना के लिये भूमि प्राप्त की गयी थी। अब यह मकसद रहा नहीं क्योंकि आप पहले ही वहां से अन्यत्र चले गये हैं। आप अब यह नहीं कह सकते कि इस भूमि में आपकी अभी भी दिलचस्पी है.ङ्कङ्क        न्यायाधीशों का कहना था, ‘‘यह भूमि किसानों को वापस दी जानी चाहिए थी और हम पश्चिम बंगाल सरकार को इस मसले पर हलफनामा दाखिल करने के लिये कह सकते हैं कि भूमि अधिग्रहण के वक्त जिस राशि का आपने भुगतान किया था, वह आपको लौटा दी जाये।ङ्कङ्क        टाटा मोटर्स के जवाब पर पश्चिम बंगाल सरकार के वकील ने कहा कि वह यह जमीन किसानों को लौटाने का अनुरोध करेंगे।
        इन दलीलों का संज्ञान लेते हुये न्यायालय ने कहा कि चूंकि कंपनी भूमि अपने पास रखना चाहती है, इसलिए उसे राज्य सरकार की याचिका का गुणदोष के आधार पर निर्णय करना होगा। न्यायालय ने इसके साथ ही इस मामले की सुनवाई अगले साल अप्रैल के लिये स्थगित कर दी।
        न्यायालय सिंगूर भूमि पुनर्वास और विकास कानून, ० निरस्त करने के कलकत्ता उच्च न्यायालय के पिछले साल  जून के निर्णय के खिलाफ पश्चिम बंगाल  सरकार की याचिका पर सुनवाई कर रहा है. इस कानून के तहत टाटा मोटर्स को दी गयी ०० एकड़ जमीन वापस लेने का अधिकार सरकार को दिया गया था।